केसांमुळे एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य अधिक खुलते. आपण आकर्षक दिसाव असं प्रत्येकालाच वाटत असते, त्यामुळे केसांची विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स वापरले जातात. वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पू, कंडिशनर यांवर बराच खर्च केला जातो. असे बरेच उपाय करूनही कधीकधी अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारण केसांना मुळापासून मजबुत करणे गरजेचे असते. केसगळती, डॅन्डरफ अशा केसांशी निगडित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.
दही
कोरड्या केसांना मॉइश्चराईज करणे कठीण असते. पण कोरडे झाल्याने केसांचे जे नुकसान होते ते भरून काढण्यासाठी दही फायदेशीर ठरू शकते. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळते, जे केसांमध्ये मॉइश्चर टिकवून ठेवण्यास मदत करते. यासाठी केसांना साधे दही लावून २० मिनीटांसाठी राहू द्या. त्यानंतर तुम्ही वापरत असणारा शॅम्पू आणि थंड पाण्याने केस धुवून टाका.
आणखी वाचा : हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी मदत करतात ‘हे’ पदार्थ; लगेच करा आहारात समावेश
नारळाचे तेल
कोरड्या केसांसाठी नारळाचे तेल अत्यंत फायदेशीर मानले जाते. शॅम्पू लावण्यापुर्वी केसांना नारळाचे तेल लावल्यास केस धुताना आणखी कोरडे होणार नाहीत. केस सतत कोरडे होत असतील तर यापासून सुटका मिळवण्यासाठी नारळाचे तेल लावावे, यामुळे नक्की फरक जाणवेल.
अंडी
अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे हे केसांना मॉइश्चराईज करण्यासाठी फायदेशीर ठरते तसेच अंड्यामध्ये आढळणारे ॲमिनो ऍसिड केसांसाठी आवश्यक पोषकतत्त्व पुरवण्याबरोबर सुर्यप्रकाश आणि प्रदूषणापासून केसांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी अंड्यामधील पिवळा भाग आणि द्रव्य या दोघांचा वापर करून, ते व्यवस्थित मिसळून घ्या. त्यानंतर हे मिश्रण २० ते ३० मिनिटांसाठी केसांवर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे केसांना प्रोटीन मिळेल. पण याचा जास्त वापर करणे टाळा, कारण अति प्रोटीनमुळे केसांचे नुकसान होऊ शकते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)