नवी दिल्ली : आधुनिक काळात एकाकीपणा ही वाढत चाललेली व्यापक समस्या आहे. अनेक जण भोवती असताना किंवा अनेकांत वावर असतानाही अनेक व्यक्तींमध्ये आतून हे संबंध व्यर्थ वाटतात. सामाजिक संबंधांबाबत ते असमाधानी असतात. आतून तुटून गेलेले असतात. आशयघन परस्पर संवादातून विश्वास आणि एकमेकांविषयी आधाराची भावना निर्माण होणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होऊ लागले आहे. त्यातून एकाकीपणाची समस्या वाढत आहे. एकाकीपणा सतत राहिला तर व्यक्तीस खूप अलिप्त वाटू लागते. आपले अनुभव, भावना इतरांपाशी व्यक्त करणे नकोसे वाटते.  आपल्याशिवाय आपला प्रत्येक परिचित व्यस्त वाटू लागतो. त्यामुळे ते नकारात्मक विचार करू लागतात. निराश व चिंताग्रस्त मनोवस्थेत ते जातात. अशा व्यक्तींना हताश आणि आपले जगणे निरुद्देश, दिशाहीन वाटू लागते. असा हा एकाकीपणा घालवण्यासाठी तज्ज्ञ काही उपाय सुचवतात, ते असे :

१) जे घडत आहे, ते समजून स्वीकारा. एकटेपणाची भावना कशामुळे निर्माण होत आहे, हे जाणून घेतल्याने तुम्ही त्याला घालवण्यासाठी अधिक सजग, प्रभावी प्रयत्न करू शकाल. तुमच्या भावना स्वीकारल्यानंतर त्यातून विधायक मार्ग निघण्यास मदत होते.

२) भोवतालच्या परिचितांशी संबंध वाढवा. सामूहिक जीवनात सक्रियपणे व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा.  समाजमाध्यमांच्या आभासी जगातील संबंधांत हरवून, वेळ वाया घालवून नका. त्यामुळे प्रत्यक्ष संबंध निर्माण होत नाहीत. यापासून कटाक्षाने दूर सर्व उपाय करून वास्तविक जगातील मैत्री-नाती जोडण्यावर भर द्या.

३) आपल्या नातेसंबंधांत इतरांकडून कोणत्याही स्वरुपात काही मिळत असेल तर त्याला आपल्याकडून काय देता येईल, याचा विचार करून शक्य असेल ते द्या. नातेसंबंधांचे मूल्यांकन करा. दीर्घकाळ चांगले नातेसंबंध ठेवण्यासाठी स्वत:त कोणते बदल करणे गरजेचे आहे, याचा विचार करा.

४) चारचौघांसह करावयाच्या उपक्रमांत सहभागी होण्यासाठी जरूर वेळ द्या. त्यामुळे जगण्याची गुणवत्ता व मूल्य वाढते. तेच तेच काम करत राहणे, आभासी-निरर्थक ध्येय उराशी बाळगून वाटचाल करणे व्यर्थ असते. त्यामागे धावू नका. हा वेग कमी करून भोवतीच्या महत्त्वपूर्ण गोष्टी, आपल्यातील चांगली बलस्थाने ओळखून, तिचा विधायक वापर करा. तुमच्या जगण्यात त्याचे प्रतिबिंब दिसू द्या.

५) आपल्या जगण्याच्या शैलीविषयी सजग व्हा. दैनंदिन जीवनातील अनुभवांकडेही तटस्थतेने पहा. विविध उपक्रमांत सहभागी होऊन त्याचा आनंद घ्या. जे काही करत असाल, त्यात पूर्ण झोकून देऊन काम करा. एकाकीपणाचा सामना करण्यासाठी तुमच्याकडून सक्रिय प्रयत्नांची आवश्यकता आहे. मानसिक-भावनिक आरोग्यावर अधिक गंभीर परिणाम होण्याआधीच या उपायांनी जगण्याची गुणवत्ता सुधारावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.