सध्या सोशल मीडियावर आफ्रिकेत डासांपासून तयार करून खाल्ल्या जाणाऱ्या बर्गरची तुफान चर्चा होत आहे. मात्र, या डासांनी तयार होणाऱ्या बर्गरवर इंटरनेटवर संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांना कोणत्याही प्रकारचे कीटक खाण्याची पद्धत ही प्रचंड किळसवाणी आणि विचित्र वाटत असली तरीही हा प्रकार आरोग्य आणि पर्यावरणासाठी फायदेशीर ठरू शकते, असे दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील अशोक [@_masalalab] नावाच्या कन्टेन्ट क्रिएटरने या आफ्रिकेतील डासांच्या बर्गरबद्दल माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अशोक म्हणतात, “अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये आफ्रिकेतील लोक डासांपासून बनविलेला बर्गर खाताना दिसत आहेत. या बर्गरमधील एक पॅटी ही जवळपास सहा लाख डासांपासून बनवली जाते. पावसाळ्यात व्हिक्टोरिया तलावाजवळ पैदास होणाऱ्या डासांचा वापर यासाठी केला जातो.”

“अनेकांना किडे खाण्याची ही कल्पना अतिशय किळसवाणी वाटू शकते आणि साहजिकच असे खाद्य खाणे आरोग्यासाठी योग्य नसल्याचेदेखील बहुतेकांचे मत असेल. मात्र, तुम्ही अगदी चुकीचा विचार करीत आहात.” असे पुढे अशोक म्हणतात. मात्र, अशा प्रकारचे डास आणि किडे खाण्याबद्दल तज्ज्ञांचे काय मत आहे ते आपण जाणून घेऊ…

हेही वाचा : पाककलेतील शिक्षण ते आहारतज्ज्ञ, कसा होता मानवी लोहियाचा ‘वेलनेस गुरु’ बनण्याचा प्रवास, पाहा

किडे-कीटक खाण्याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात?

‘हंग्री कोआला’ येथील [Hungry Koala] वरिष्ठ आहारतज्ज्ञ इप्सिता चक्रवर्ती या अशोक यांच्या मताशी सहमत आहेत. “कीटकांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. अनेकदा त्यांमधील प्रथिनांचे प्रमाण हे पारंपरिक मांसाहारातील प्रमाणापेक्षादेखील अधिक असते. कीटक हे उच्च गुणवत्ता असणाऱ्या प्रथिनांचे स्रोत असून, त्यांमध्ये शरीरास आवश्यक असणारे अमिनो अॅसिडदेखील उपलब्ध असते”, असे त्या म्हणतात.

आहारतज्ज्ञ चक्रवर्ती यांच्या मतानुसार, कीटकांमध्ये बी-१२ आणि रिबोफ्लेव्हिनसारखी विविध जीवनसत्त्वे, लोह, झिंक व मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजे उपलब्ध असतात. “काही कीटकांमध्ये ओमेगा ३ व ओमेगा ६ फॅटी अॅसिडसारखे घटकदेखील उपलब्ध असतात. इतकेच नव्हे, तर पचनशक्तीसाठी उपयुक्त असणारे काइटिन नामक फायबरसुद्धा कीटकांमध्ये सापडते”, असे त्या म्हणतात.

जागतिक पातळीवर कीटक खाण्याची संस्कृती कशी निर्माण झाली?

“एंटोमोफॅजी म्हणजेच किडे खाण्याची पद्धत ही आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिकेमध्ये कित्येक वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र, पाश्चिमात्य समाजाने या पद्धतीचा कायमच तिरस्कार केला आहे. परंतु, आता ही परिस्थिती बदलली असून, अनेक जण कीटकांकडे खाण्यास आरोग्यदायी आणि आहाराचा सस्टेनेबल स्रोत म्हणून पाहू लागले आहेत”, असे चक्रवर्ती यांनी सांगितले आहे.

कीटकांचे सेवन करणे ही सामान्य बाब असून, याबद्दल जनजागृती करण्यासाठी रूढी-परंपरा यांच्या बंधनांपलीकडे जाऊन आणि पाककलेच्या नवीन कल्पना महत्त्वपूर्ण ठरू शकतात.

कीटकांच्या शेतीसह आहाराचे पर्यावरणाला होणारे फायदे

कीटकांची शेती करणे हा पशुपालनापेक्षा कितीतरी पटींनी टिकाऊ [सस्टेनेबल] पर्याय आहे. “कीटक, डुक्कर व गुरांच्या तुलनेत अतिशय कमी प्रमाणात हरितगृह वायू [greenhouse gas] निर्माण करतात; ज्यामुळे ते पर्यावरणास अनुकूल ठरून, प्रथिनांचे स्रोत म्हणून काम करू शकतात”, असे चक्रवर्ती म्हणतात.

दुसरे म्हणजे पारंपरिक पद्धतीत जनावरांना खाऊ घालण्याच्या तुलनेत, कीटकांना खाऊ घालण्याची आवश्यकता कमी असते. असे असले तरीही कीटकांमधून मुबलक प्रथिने मिळू शकतात.

कीटक खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

“प्रत्येक खाद्यपदार्थाप्रमाणेच कीटक खातानाही सुरक्षितता महत्त्वाची आहे. बहुतांश कीटक कमी धोकादायक आणि खाण्यायोग्य असले तरीही काही विशिष्ट कीटकांच्या सेवनाने व्यक्तीला अॅलर्जीदेखील होऊ शकते”, असे चक्रवर्ती म्हणतात. कीटकांची शेती ही अनियंत्रित वातावरणात [uncontrolled environments] केली जाते. त्यामुळे कीटकांमध्ये कीटकनाशके, जड धातू अथवा विविध दूषित पदार्थ असण्याची शक्यता असते. मात्र, यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून कीटकांची शेती करणे महत्त्वपूर्ण आहे, असे आहारतज्ज्ञ चक्रवर्ती यांचे म्हणणे आहे, अशी माहिती दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून मिळते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Africa viral mosquito burger eating insect and bug are really healthy and sustainable food source what experts say check out dha