Radish For Liver Detox: लिव्हर हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. शरीरात दररोज ५००हून अधिक कामं लिव्हर करते. ते शरीरात रक्त फिल्टर करते, विषारी पदार्थ काढून टाकते, पचन सुधारते, हार्मोन्स संतुलित करते आणि ऊर्जा साठवण्यास मदत करते. लिव्हर कमकुवत होऊ लागले तर थकवा, अपचन, पोटफुगी, वजन वाढणे, निस्तेज त्वचा, कमी झोप आणि वारंवार आजारी पडणे अशी एक ना अनेक लक्षणे दिसू लागतात.

अति प्रमाणात जंक फूड, अल्कोहोल, जास्त साखर, लठ्ठपणा आणि इन्सुलिन प्रतिरोधकता, ओषधांचा अतिवापर, विषाणूजन्य संसर्ग, ताणतणाव आणि झोपेची कमतरता अशा अनेक गोष्टी लिव्हरच्या आरोग्याला धोका निर्माण करू शकतात. नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीअरी सायन्सेसमधील हेपेटॉलॉजीचे सीनीयर प्रोफेसर डॉ. शिवकुमार सरीन यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी निरोगी आहार आवश्यक आहे.”

काही पदार्थ लिव्हरचे आरोग्य सुधारतात आणि ते अशुद्धता बाहेर काढतात. निरोगी लिव्हर राखण्यासाठी तुमच्या आहारात लिंबू पाणी, ग्रीन टी, बीट, हळद, लसूण आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी मुळा खाणे अत्यंत गुणकारी मानले जाते. केवळ आयुर्वेदच नाही, तर विज्ञानातही याचे फायदे सांगितले आहेत. वैद्यकीय शास्त्र आणि आयुर्वेद लिव्हरच्या आरोग्यासाठी ही भाजी खाण्याचा सल्ला का देतात याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ…

मुळा लिव्हरला कसा निरोगी ठेवतो? यामागचं वैज्ञानिक कारण

मुळ्यामधील ग्लुकोसिनोलेट्स सारखी संयुगे लिव्हरमधील एन्झाइम्सची क्रिया वाढवतात, त्यामुळे विषारी पदार्थ लवकर काढून टाकण्यास मदत होते. मुळ्यामधील अँथोसायनिन्स आणि फायबर लिव्हरमधील चरबीचा संचय कमी करण्यास मदत करतात. मुळा व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे. तो लिव्हरच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतात. मुळा पित्त प्रवाहदेखील सुधारतो, त्यामुळे चरबीचे चांगले पचन होते आणि पित्त घट्ट होण्यास प्रतिबंध होतो, ते लिव्हरसाठी फायदेशीर आहे.

मुळा लिव्हरसाठी कसा फायदेशीर याचे आयुर्वेदिक कारण

मुळा निरोगी लिव्हरसाठी आवश्यक असलेल्या कफ आणि पित्त दोषांचे संतुलन राखतो. मुळा पचनक्रियेचे संतुलन राखतो. त्यामुळे लिव्हरवरील भार कमी होतो. आयुर्वेदात मुळा रक्त शुद्ध करणारा असं मानलं जातं. तसंच मुळ्याने लिव्हरला नैसर्गिकरित्या आराम मिळतो.

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी मुळा कसा खावा?

  • मुळ्याचे सॅलड बनवून जेवणासोबत खा
  • मुळा त्यांच्या पानांसोबत खाल्ला तर तो पचायला सोपा होतो.
  • सकाळी रिकाम्या पोटी ३० ते ५० मिली मुळ्याचा रस प्या.
  • मुळ्याची भाजी किंवा सूप हादेखील पर्याय आहे.