Benefits of Cardamom: वेलची केवळ चव आणि सुगंध वाढवण्यासाठीच वापरली जाते असा अनेकांचा गैरसमज आहे. चहा, गोड पदार्थ किंवा अन्य पदार्थांमध्ये मिसळला जाणारा हा छोटासा पदार्थ केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही तेवढाच उपयुक्त आहे. आयुर्वेदात वेलची औषधी मानली जाते. आयुर्वेदानुसार, औषधांमध्ये, पचन सुधारण्यासाठी, तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी, ह्रदय मजबूत करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. आधुनिक संशोधनानुसारदेखील हे स्पष्ट झाले आहे.
आयुर्वेदात वेलचीला मसाल्याची राणी म्हणतात. कारण त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण करतात. तज्ज्ञांच्या मते, दैनंदिन आहारात वेलचीचा समावेश केल्याने पचनापासून ते ह्रदयाच्या आरोग्यापर्यंत अनेक फायदे होतात. याचा काय परिणाम होतो ते जाणून घेऊ…
ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
वेलचीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. ते रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. वेलचमधील अँटी-ऑक्सिडंट्स कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित ठेवतात आणि ह्रदयाचे ठोके सामान्य राखण्यास मदत करतात. वेलचीचे नियमित सेवन ह्रदय निरोगी ठेवते आणि रोगांचा धोका कमी करू शकते. शरीरातील अतिरिक्त मीठ आणि पाणी बाहेर काढण्यास वेलची मदत करते आणि त्यामुळे ह्रदयावरील दबाव कमी होतो.
पचन सुधारते
वेलचीचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे पचनक्रियेत मदत करते. त्यात असलेले सक्रिय घटक पाचक एंजाइम्स उत्तेजित करतात. त्यामुळे गॅस, आम्लता आणि पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होतात. चहा किंवा खिचडीमध्ये थोडी वेलची पावडर घालावी. रात्रीच्या जेवणानंतर वेलची चावल्याने पचनक्रिया सुधारते.
श्वासातील दुर्गंधी घालवते
वेलची चावण्यामागे एक रहस्य आहे. त्यात असलेले अंटी-मायक्रोबियल संयुगे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. संशोधनानुसार, वेलची हिरड्यांचे आजार आणि पोकळी रोखण्यास मदत करते. जेवणानंतर एक संपूर्ण वेलची चावल्यास श्वास ताजा राहतो आणि हिरड्यांचे आरोग्यदेखील सुधारते.
जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण करते
वेलचीमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक संयुगे जळजळ कमी करण्यास आणि शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. हे गुणधर्म यकृताचे आरोग्य सुधारतात आणि त्वचा उजळवतात. भाज्या, सूप किंवा डाळीत वेलची पावडर घाला. तसंच सॅलड ड्रेसिंगमध्ये वेलचीचा थोडासा वापर केल्याने दाहकविरोधी प्रभाव वाढतो.
वजन कमी करण्यास उपयुक्त
नवीन संशोधनानुसार, वेलची चयापचय गतिमान करते, चरबी कमी करते आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करते. तसंच वेलचीमुळे यकृताचे कार्यही सुधारते.