Good time to eat almonds and walnuts: मॅग्नेशियम हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक खनिज आणि इलेक्ट्रोलाइट आहे. ते शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहे. शरीरातील ३००हून अधिक जैवरासायनिक अभिक्रियांवर नियंत्रण ठेवते. तसंच अनेक महत्त्वाच्या शारीरिक कार्यांवर परिणाम होऊ शकतो. हे खनिज स्नायू आणि नसा सुरळीतपणे कार्य करण्यासाठी मदत करते. ते हाडं मजबूत बनवते, ह्रदयाची गती आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते तसंच ऊर्जाही वाढवते. आहारात या खनिजांचा समावेश केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. शरीरातील ऊर्जेसाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे आणि मानसिक आरोग्य सुधारते. त्याचे सेवन केल्याने तणाव नियंत्रित होण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

आपल्या शरीरातील सुमारे ६० टक्के मॅग्नेशियम हाडांमध्ये, २० टक्के स्नायूंमध्ये आणि उर्वरित रक्त आणि इतर ऊतींमध्ये आढळते. बदाम आणि अक्रोड यासारख्या सुक्या मेव्यामध्ये मॅग्नेशियम असते. मात्र, दिवसभरातून योग्य वेळी खाल्ल्यावरच याचा फायदा होतो.

हार्वर्ड प्रशिक्षित गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितले की, सुकामेवा मॅग्नेशियमने परिपूर्ण असतो. बदाम, अक्रोड, काजू आणि विविध बिया यामुळे शरीराला पुरेसे मॅग्नेशियम मिळण्यास मदत होते. सुक्या मेव्यातील काही घटक सकाळी खाल्ल्यास अधिक फायदेशीर ठरतात, तर काही संध्याकाळी खाल्ल्यास फायदेशीर ठरतात.

बदाम आणि अक्रोड हे असे दोन सुक्या मेव्याचे प्रकार आहेत, जे योग्य वेळी खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळते. डॉ. सेठी सांगतात की, “जर काजू एका विशिष्ट वेळी खाल्ले तर मेंदू, ह्रदय आणि चयापचय यांना सर्वाधिक फायदे मिळू शकतात.” बदाम आणि अक्रोड हे मॅग्नेशियमयुक्त असतात. ते कोणत्या वेळी खावेत हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊ…

बदाम

बदाम हा मॅग्नेशियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. प्रति १०० ग्रॅम बदामात २७० मिलीग्रॅम मॅग्नेशियम असते. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, मेंदूची क्रिया वाढवते आणि दिवसभर सतर्कता राखते. रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत ४ ते ६ भिजवलेले बदाम खाल्ल्यास मॅग्नेशियम शरीरात योग्यरित्या शोषून घेतले जाते. भिजवलेले बदाम सहज पचतात आणि त्यातील पोषक घटक लवकर शोषले जातात. बदाम खाऊन दिवसाची सुरूवात केल्यास केवळ संतुलित ऊर्जाच मिळत नाही, तर मेंदू आणि चयापचय दोन्ही मजबूत होतात.

अक्रोड आणि मॅग्नेशियम

अक्रोडमध्ये प्रति १०० ग्रॅम अंदाजे १६० मिलीग्रॅम मॅग्नेशियम असते. त्यामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि मेलाटोनिन असते. ते झोपेच्या गुणवत्तेसाठी आणि ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीत असते. झोपण्यापूर्वी २ ते ३ अक्रोड खाणे सर्वाधिक फायदेशीर मानले जाते. या वेळेत शरीर विश्रांतीच्या स्थितीत असते आणि त्यामुळे अक्रोडमधील मॅग्नेशियम स्नायूंना आराम देते आणि रक्तवाहिन्या दुरूस्त करते. झोपण्याआधी अक्रोड खाल्ल्याने गाढ झोप येते, मन शांत होते आणि ह्रदयासाठी फायदेशीर असते.

कधी खावेत बदाम आणि अक्रोड?

सकाळी बदाम आणि रात्री अक्रोड खाणे प्रभावी ठरते. दिवसा आणि रात्री अशाप्रकारे दोन्ही वेळी शरीराला मॅग्नेशियमचा पूरेपूर फायदा होतो.