Brain Boosting Foods: ताणतणाव हा आजच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे आणि त्याचा परिणाम सर्व वयोगटातील लोकांवर होतो. लहान मुले शाळा आणि परीक्षेच्या दबावामुळे तणावाखाली असतात, तरणांना करिअर, स्पर्धा आणि सामाजिक जीवनामुळे ताणतणाव असतो, तर वृद्धांना आरोग्य आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. ताणतणावाचा केवळ मानसिक आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर शारीरिक आरोग्यावरही याचा खोलवर परिणाम होतो. सततच्या ताणतणावामुळे हृदयरोग, मधुमेह, निद्रानाश आणि पचनाच्या समस्या अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.
दीर्घकाळ ताणतणावामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. त्यामुळे मूड स्विंग, चिडचिडेपणा आणि नैराश्य वाढू शकते. शिवाय सततचा ताण शरीरात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढवतो आणि त्यामुळे वजन वाढू शकते. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होऊ शकते आणि ऊर्जा कमी होते. मानसिकता, ध्यान, योग, खोल श्वास आणि नियमित शारीरिक हालचाली तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. निरोगी आहार आणि पुरेशी झोपदेखील ताण कमी करण्यास मदत करतात.
एम्सचे माजी सल्लागार आणि प्रसिद्ध हृदयरोग आणि साओल हॉर्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. बिमल झांझर यांनी तणाव कमी करण्यासाठी आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी काही पदार्थ खाण्याची शिफारस केली आहे. काही पदार्थ ताण नियंत्रित करण्यास, तणाव संप्रेरक कमी करण्यास आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. तणाव कमी करण्यासाठी तुम्ही नेमके कोणते पदार्थ आहारात समाविष्ट करू शकता याबाबत जाणून घेऊ…
हिरव्या पालेभाज्या
पालक, मेथी यासारख्या हिरव्या पालेभाज्या मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असतात. हे खनिज पिट्यूटरी हायपोथालेमिक एड्रेनल अक्ष संतुलित करण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनची पातळी नियंत्रित होते. नियमित सेवनाने ताण आणि चिंता कमी होते, रक्तदाब सामान्य होतो आणि झोप सुधारते. हिरव्या पालेभाज्यांचा समावेश तुम्ही सॅलड, स्मूदी किंवा ज्यूसमध्ये करू शकता. दररोज पुरेशा प्रमाणात हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने ताण नियंत्रित होण्यास मदत होते.
बेरी खा
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरीसारख्या बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. ते कॉर्टिसोलची पातळी कमी करण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यात मदत करतात. नियमित सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित होते आणि जळजळ कमी होते. तुम्ही ताज्या बेरीज अशाच खाऊ शकता, स्मूदी किंवा दह्यासोबत खाऊ शकता. ते केवळ ताण कमी करत नाहीत तर मूड आणि ऊर्जेची पातळी देखील सुधारतात.
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य सुधारतात. ते मज्जासंस्था शांत करण्यास मदत करते आणि तणाव संप्रेरक कॉर्टिसोल कमी करते. दररोज अगदी योग्य प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्यास मूड चांगला होतो, ताण कमी होतो आणि मानसिक थकवा कमी होतो. जास्त साखर किंवा जास्त दुधाचे प्रमाण असलेले चॉकलेट खाऊ नका.
ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये कॅटेचिन आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूच्या विश्रांती प्रक्रियेला वाढवतात. ते कॉर्टिसोल कमी करतात आणि मानसिक शांतता वाढवून ताण कमी करते. दररोज १ ते २ कप ग्रीन टी प्यायल्यास लक्ष केंद्रित करणे, मूड सुधारणे असे फायदे होतात. साखर न घालता ग्रीन टी प्यावी.