Diwali 2025: दिवाळी म्हटलं की रोशनाई, फराळ, रांगोळी आणि फटाके हे आलंच. देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी बरेच लोक फटाकेही वाजवतात. मोठी लोकच नाही, तर मुलांनाही फटाक्यांविषयी विशेष आकर्षण असते. तर कधीकधी फटाके वाजवताना काही घटना घडतात आणि लोक अपघातांचे बळी पडतात. दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांमुळे प्रदूषण तर वाढतेच, त्यामुळे श्वास घेणेही कठीण होते. फटाक्यांच्या धुरामुळे काहींना अॅलर्जीचा त्रास होतो, तर काहींना डोळ्यांनाही.
खरं तर दिवाळसणात आकाश फटाक्यांच्या रोशनाईमुळे उजळून निघते. आकाशात फटाक्यांचा रंगीबेरंगी प्रकाश आणि लोकांमध्ये उत्साह असतो. मात्र, काहीवेळा एक छोटीशी चूकही तुम्हाला खूप वेदनादायक ठरू शकते. दिवाळीत फटाके वाजवल्याने जर तुम्हाला भाजले तर जळजळ कमी करण्यासाठी ताबडतोब प्रथमोपचार करणं गरजेचं आहे. नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जन डॉ. रमन शर्मा यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्वचेच्या जळजळीपासून त्वरित आराम मिळवू शकणारे काही उपाय सुचवले आहेत.
फटाके लावताना या गोष्टी लक्षात ठेवा
दिवाळीत फटाके लावताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात लहान मुलांजवळ फटाके वाजवणे टाळावे आणि त्यांच्यासोबत रांगोळी आणि इतर उपक्रमांद्वारे दिवाळी साजरी करावी. असं असताना दिवाळीत फटाके लावताना अनेकदा अपघात होतात. त्यावेळी अशा फटाक्यांवर लगेचच पाणी ओतावे. मात्र, चटका लागल्यास लगेचच बर्फ लावणं टाळा.
जळलेल्या भागावर थंड पाणी ओता
दिवाळीत हात भाजला तर त्यावर थंड पाणी ओता. जळलेल्या जागेवर कधीही बर्फ लावू नका. बर्फ लावल्याने रक्त गोठू शकते. अशा परिस्थितीत, हाताला किंवा पायाला भाजले असेल तर तो भाग थोडा वेळ थंड पाण्यात भिजवा. यामुळे त्वरित आराम मिळू शकतो.
कोरफड
दिवाळीच्या दिवशी तुमचे हात कोणत्याही कारणास्तव जळू शकतात किंवा त्वचेच्या समस्या सामान्य होतात. त्वचेच्या समस्यांसाठी कोरफडीचा वापर फायदेशीर ठरेल. जर तुमची त्वचा चटक्यामुळे जळत असेल तर तुम्ही कोरफडीचा जेल किंवा घरातील कोरफडीचा गर काढून त्यावर लावू शकता. यामुळे त्वरित आराम मिळेल आणि भाजलेल्या ठिकाणी फोड येणार नाही.
नारळ तेल
भाजलेल्या जागी नारळाचे तेल लावणे प्रभावी ठरेल. नारळाचे तेल अनेक प्रकारे वापरले जाते. भाजलेल्या जागी आराम देण्यासाठी किंवा जळजळ कमी करण्यासाठी त्या जागी नारळाचं तेल लावा.
टूथपेस्ट आणि हळद वापरणे टाळा
तज्ज्ञांच्या मते, भाजलेल्या भागावर टूथपेस्ट लावणे हानिकारक असू शकते, कारण त्यात विविध केमिकल्स असतात. ती त्वचेवर प्रतिक्रिया करून त्रास आणि वेदना वाढवू शकतात. तसंच संसर्गही होऊ शकतो. शिवाय भाजलेल्या भागावर हळद लावल्याने तो भाग झाकला जाऊ शकतो आणि त्यात घाण जमा होऊ शकते. त्यामुळे संसर्ग वाढू शकतो.