Premium

Health Special : उन्हाळ्यात ताक प्या पण ‘हे’ नक्कीच टाळा!

अतिऊन हे पित्तप्रकोपास कारण ठरते. सूर्याच्या उष्णतेशिवाय आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये सांगितलेले उष्णतेचे साहचर्य (अतिउष्णतेजवळ राहणे) हेसुद्धा उष्माघातास व पित्तप्रकोपास कारणीभूत ठरते.

Drink buttermilk
Health Special : उन्हाळ्यात ताक प्या पण 'हे' नक्कीच टाळा! (छायाचित्र – प्रातिनिधिक छायाचित्र)

अतिऊन हे पित्तप्रकोपास कारण ठरते. सूर्याच्या उष्णतेशिवाय आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये सांगितलेले उष्णतेचे साहचर्य (अतिउष्णतेजवळ राहणे) हेसुद्धा उष्माघातास व पित्तप्रकोपास कारणीभूत ठरते. आजच्या आधुनिक जीवनामध्ये असे अनेक व्यवसाय आहेत, अशी अनेक कामे आहेत, ज्यांमध्ये त्या-त्या व्यक्तीस उष्णतेच्या अतिनिकट दीर्घकाळ काम करावे लागते. ती कामे व व्यवसाय पुढीलप्रमाणे –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोखंड वितळवण्याचे कारखाने, स्टीलपासून अगणित वस्तू तयार करणारे कारखाने, केमिकल प्लान्ट्स, सिरॅमिक संबंधित कारखाने, खाणकाम व तत्सम कामे, विविध उद्योगधंद्यांमधील बॉयलर रूम्स, रिफायनरीज, बांधकामाशीसंबंधित करायची विविध उघड्यावरील कामे, कोणत्याही इमारत-घर आदींच्या छत वा बाह्यांगाशी संबंधित कामे, आधुनिक बागा-मैदाने-लॅण्डस्केपसंबंधित कामे, रिफायनरीज, फौंड्री, विटा तयार करणाऱ्या भट्ट्या, काचेची निर्मिती व काचेसंबंधित इतर कामे, रेल्वेचे रूळ तपासणे, रस्त्यांचे मोजमाप करणारे, विविध हेतूंनी सर्व्हे करणारे, याशिवाय पोस्टमन-विक्रेते… वगैरे अनेक ज्यांना उघड्यावर सूर्याखाली काम करावे लागते.

हेही वाचा – Health special: तृणधान्ये कोणती एकत्र करावीत? कोणती करू नयेत?

अनेक व्यवसायांमध्ये विशेष प्रकारचे सूट(वेश) संरक्षणात्मक आवरण म्हणून घातले जातात, तसे सूट्स घालणार्‍यांनासुद्धा अतिउष्णतेचा धोका संभवतो. रबर तयार करण्याचे कारखाने, रबराच्या विविध वस्तू तयार करणारे कारखाने, इलेक्ट्रिक व्यवसायामधील काही कामे, लॉण्ड्री-बेकरी अशा प्रकारची कामे, व्यावसायिक किचन्स (हॉटेल-रेस्टरॉं-वगैरे), विविध अन्नपदार्थ तयार करताना जिथे उष्णतेची गरज भासते असे खाद्यव्यवसाय, खाणकाम, वेगवेगळ्या प्रकारची बोगद्यांमधील कामे, सर्वात शेवटी ‘शेतीकाम’, ज्या कामामध्ये शेतकर्‍याला दिवसभर उन्हातान्हात काम करावेच लागते, आपली पोटे भरण्यासाठी! (पण शेतकर्‍याचे पोट भरते का हो?)

उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी

सूर्यप्रकाशात किंवा उष्णतेच्या निकट करणाऱ्यांनी उन्हातान्हांत किंवा उष्णतेजवळ काम करताना कोणती काळजी घ्यायची, ते आता समजून घेऊ.

– सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरपूर पाणी प्यावे. भरपूर म्हणजे किती, तर दर २०-३० मिनिटांनी एक ग्लास पाणी प्यावे किंवा दर दोन-चार मिनिटांनी घोड-घोट पाणी अखंड पित राहावे. विशेषतः उन्हातान्हांत किंवा उष्णतेच्या संपर्कात असताना. शक्य असल्यास पाण्यामध्ये वाळा भिजवून ते पाणी प्यावे, जे शरीराला नैसर्गिकरित्या आतून थंड ठेवते.

– नारळपाणी हे उष्माघाताचा किंवा शरीरामध्ये उष्णता वाढण्याचा धोका टाळण्यासाठी अमृत आहे.

– दिवसातून एक तरी फळांचा रस प्याव, विशेषतः थंड गुणांच्या फळाचा. जसे – कलिंगड, डाळींब, आवळा, वगैरे (आवळा सर्वाधिक थंड आहे)

– वाळ्याचे, लिंबाचे, गुलाबाचे, आवळ्याचे, कोकमाचे सरबत, कैरीचे पन्हे प्यावे.

– सब्जा पाण्यात भिजवून दिवसातून तीन-चार वेळ घ्यावा. शरीरामध्ये थंडावा निर्माण होण्याचा नैसर्गिक उपाय. सलग काम न करता अधूनमधून कामामधून आराम घ्यावा, एकाने दीर्घकाळ काम करण्याऐवजी आळीपाळीने आलटून-पालटून काम करावे.

– सुश्रुतसंहितेनुसार उन्हाचे (उष्णतेचे) सर्व धोके सावलीमध्ये गेल्याने टळतात वा नष्ट होतात.

– आराम करताना शक्यतो सावलीमध्ये गार हवा लागेल असे, पंख्याखाली, थंड वातावरणामध्ये बसावे. ही सूचना ज्यांना विशेष प्रकारचे संरक्षक वेश (सूट) घालावे लागतात, त्यांनी अधिक सावधतेने पाळावी. सावलीमध्ये बसल्यामुळे अंगाचा दाह कमी होतो, शरीरात वाढलेली उष्णता घटते, तहान व घाम कमी होतो, चक्कर व डोळ्यासमोर येणारा अंधार नाहीसा होतो आणि एकंदरच शरीराला टवटवी येते.

– घट्ट-जाड कपडे कटाक्षाने टाळून हलके सुती (कॉटनचे) कपडे वापरावे, गडद रंगाचे कपडेसुद्धा टाळून फिक्या रंगाचे कपडे वापरावे.

– काम करताना अधून मधून किंवा शक्य नसेल तर घरी गेल्यानंतर थंड पाण्यामध्ये पाय बुडवून बसणेसुद्धा निश्चित फायद्याचे होईल (शक्य असल्यास त्या पाण्यामध्ये दोन चमचे वाळ्याचे चूर्ण टाकावे).

– उन्हातान्हांत व उष्णतेजवळ काम करणार्‍यांना मंडळींनी आहारामध्ये उष्ण पदार्थ (शरीरामध्ये उष्णता वाढवणारे) पदार्थ कटाक्षाने टाळावे. जसे-हिरवी मिरची, गरम मसाले, मोहरी, आले, लसूण, ओवा, हिंग, तिखट- तळलेले- खारवलेले पदार्थ, मासे ( विशेषतः बांगडा-मुशी असे तेलयुक्त मासे व कोलंबी, खेकडा असे कवचयुक्त जलचर), शेंगदाणे, काजू, पिस्ते, अक्रोड, खजूर, खारीक, अळशी-सूर्यफूल वगैरे तेलबिया, बाजरी, कुळीथ, जवस, उडीद, मका,, शेवगा, दही, मध वगैरे

– शरीरात उष्णता वाढवणारी पेयं कटाक्षाने टाळावीत. जसे- चहा, कॉफी, कोको, शीतपेये (कोल्ड्रिन्क्स), बीयर, मद्य (आयुर्वेदानुसार सर्व प्रकारची मद्य ही पित्तकारक असल्याने शरीरात उष्णता वाढवतातच)

– उन्हातून आल्यावर ताक पिण्यास आयुर्वेदाने निषेध केला आहे हा सल्ला लोकांना माहीत नाही, तो ध्यानात घेऊन अनुसरण करावे.

– उन्हातून आल्यावर आयुर्वेदाने थंड दूध पिण्याचा सल्ला दिलेला आहे. दूधसुद्धा उन्हातून सावलीत येऊन थोडा वेळ बसल्यानंतर प्यावे.

– आहारामध्ये थंडावा वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन वाढवावे. जसे- दूध, लोणी, तूप, नारळपाणी, गुलाबजल, तांदूळ, नाचणी, ज्वारी , मूग, मटकी, तूर, मसुर, वाटाणे, थंड भाज्या व थंड फळांचे सेवन वाढवावे.

– शरीराला थंडावा व पाणी पुरवणार्‍या फळांचे सेवन वाढवावे, जसे – कलिंगड, काकडी, टरबूज, केळे, द्राक्षे, सीताफळ, पेअर, सफरचंद, इत्यादी.

हेही वाचा – तुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…

ही सर्व काळजी ज्यांना उन्हातान्हांत व उष्णतेजवळच्या कामांमध्ये दीर्घकाळ राहावे लागते आणि ज्यांनी नवीनच सुरुवात केली आहे, त्यांनी अधिक सजगतेने पाळावी.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-05-2023 at 17:54 IST
Next Story
Health special: तृणधान्ये कोणती एकत्र करावीत? कोणती करू नयेत?