पल्लवी सावंत पटवर्धन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चणाडाळ, मूगडाळ, उडिद डाळ आणि तूरडाळ आदी सर्व डाळींचा वापर भारतीय घरांमध्ये नियमित होतो. परंतु, काही वेळेस या डाळी आपण ज्या पद्धतीने वापरतो त्यामुळे अनेकांना त्याचा त्रासही होतो. मुद्दा असा की, या डाळींचा वापर थांबवू नका कारण त्या पौष्टिक आहेत. कदाचित त्यांचा वापर करताना आपल्याला त्यांच्या वापराची पद्धत बदलावी लागेल. कोणत्या डाळीसाठी कोणती पद्धत वापरायची यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा. त्या संदर्भातील हे महत्त्वाचे टिपण.

“मला चणे खाऊन त्रास होतो, पोट बिघडतं” विनय सांगत होता .
“नक्की काय त्रास होतो?” मी विचारलं
“एक तर गॅसेस, पोट फुगणे आणि मग दिवसभर अस्वस्थ वाटत राहतं”
“तू शिजवून खातोस की कच्चे?”
“म्हणजे?, आपण नेहमी भाजके चणे खातो तसे मी भिजलेले चणे खातो. मला सगळ्याच उसळींनी त्रास होतो ”
“पुढच्या वेळेस शक्यतो चणे उकडून खा आणि उकडताना शक्यतो १ चमचा तेल वापर ”
“हे नवीन आहे. आर यू शुअर ?” विनयने अविश्वासाने विचारलं
“हो”

शाकाहारी आहार घेणारी मंडळी प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी अनेकदा विविध कडधान्ये खातात आणि अनेकदा ती कच्चीच खाल्ली जातात आणि त्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो.

आणखी वाचा-Health Special : चॉकलेटचा कुठला प्रकार तुम्हाला ठेऊ शकतो फिट?

डाळी आणि कडधान्ये- नेहमीच्या भारतीय आहारातील महत्वाचा अन्न घटक आहेत. सुमारे १० हजार वर्षांपासून मानवी आहारात कडधान्य आणि डाळींचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये देखील डाळी आणि कडधान्यांचे विविध उपयोग सांगितले गेले आहेत. भारतात विविध रंगांच्या डाळी आणि कडधान्ये उपलब्ध आहेत.आजच्या लेखात विविध डाळींबद्दल जाणून घेऊ.

१. तूर डाळ :

पचायला जड, अत्यंत चविष्ट आणि पटकन शिजणारी डाळ म्हणून तुरडाळीचा वापर भारतीय घरांत केला जातो. प्रथिनांचे आणि कर्बोदकांचे उत्तम प्रमाण असणारी तूरडाळ शरीरासाठी मात्र तितकीशी पोषक ठरत नाही. कफ, त्वचेचे विकार, मेंदूशी संबंधित विकार असणाऱ्यांसाठी तूरडाळ वर्ज्य करावी. नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी किंवा शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी तूरडाळ आवश्यक ऊर्जा देणारी डाळ आहे .

२. उडीद डाळ :

पांढऱ्या आणि काळ्या अशा दोन रंगात उपलब्ध असणारी उडीद डाळ आहारशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. उत्तम प्रथिने आणि फोलेटचे प्रमाण असणारी उडीद डाळ पोषक आहे. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी नियमितपणे उडीद डाळीचे सेवन करावे. उडदाचे पापड, लापशी, उपीट वजन वाढविण्यासाठी तर आंबवलेले उडीद (डोसा, इडली, अप्पम इत्यादी) वजन प्रमाणात राखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे .

आणखी वाचा-Health Special : दही आणि योगर्टमध्ये नेमका काय फरक? 

३. मूग डाळ :

पिवळ्या किंवा हिरव्या रंगात उपलब्ध असणारी मूगडाळ शरीरासाठी अत्यंत पोषक आणि पचायला हलकी आहे. जीवनसत्त्व अ, ब, तंतुमय पदार्थ, उत्तम प्रथिने असणारी मूगडाळ भिजवून, पातळ सूप म्हणून, डाळ म्हणून किंवा पालेभाजीत चव आणण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. हिरव्या सालीची मूगडाळ त्यातील हरितके आणि तंतुमय पदार्थांमुळे विशेष पोषक मानली जाते. मुगाचे कढण, आमटी, पिठलं, मुगाचे लाडू, डोसे, इडली, ढोकळा, पोळा या सगळ्या स्वरूपात मूग पोषक आहेत . मधुमेह असणाऱ्यांनी नियमितपणे मुगाचे सेवन करावे. आहार प्रथिनांसह इतर पोषणतत्त्वाचे प्रमाण उत्तम राहते आणि ग्लुकोजची पातळी देखील नियंत्रणात राहते. उकडलेल्या मुगाचे नियमित सेवन स्नायूंसाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. मुगाचे कढण आवश्यक अमिनो अॅसिड्सनी भरपूर असल्याने थकवा दूर करण्यास मदत करते.

४. चणा डाळ :

प्रथिनांनीयुक्त आणि ऊर्जेने भरपूर असणारी चणाडाळ प्रकृतीने जड असल्याने पालेभाज्यांसोबत वापरली जाते. आतड्याच्या विकारांसाठी चणाडाळ आवर्जून आहारात वापरावी. आयुर्वेदात असे म्हटले आहे की, चणाडाळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

५. मस्टँग डाळ

नेपाळमध्ये विशेषतः ही डाळ प्रामुख्याने वापरली जाते. लोह, फॉलिक आम्ल यांनी भरपूर असणारी ही डाळ शीत प्रदेशात अतिशय उपयुक्त आहे. इतर डाळींपेक्षा या डाळीमध्ये जास्त पोषकतत्त्वे आढळून येतात. जीवनसत्त्व अ, ब, कॅल्शिअम, फॉस्फरस यांनी भरपूर असणारी डाळ तितकीच चविष्ट आहे.

पुढच्या लेखात आपण डाळी आणि कडधान्यांच्या खाण्याच्या विविध प्रकारांबाबत जाणून घेऊ

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to use different pulses for nutrients hldc mrj