Morning walk or Evening walk?: चालण्याची सवय ही उत्तमच आहे, मात्र ह्रदय आणि रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी ही सवय एखाद्या औषधासारखं काम करू शकते. उच्च रक्तदाब असलेल्या किंवा मधुमेह असलेल्या लोकांना डॉक्टर नियमित चालण्याचा सल्ला देतात. मात्र चालण्याची योग्य वेळ नेमकी कोणती हा प्रश्न अनेकांना पडतो. काहींना वाटतं सकाळी वॉक करणे उत्तम असते, तर काहींना वाटतं की संध्याकाळच्या चालण्याने आरोग्य उत्तम राहू शकते. एका संशोधनातून असे दिसून आले की, दोन्ही वेळा चालण्याचे अद्वितीय परिणाम आहेत. त्यामुळे कधी चालणे चांगले याचं उत्तर क्वचितच डॉक्टर देऊ शकतात.
शरीराच्या घड्याळाची भूमिका
प्रत्येक मानवी शरीर एका नैसर्गिक घड्याळावर चालते. त्याला सर्केडियन रिदम म्हणतात. या घड्याळानुसार शरीराची ऊर्जेची पातळी कधी वाढेल आणि कधी आळस येईल हे ठरते. रक्तातील साखर आणि रक्तदाबदेखील यानुसार वरखाली होतात. सकाळी लवकर कॉर्टिसॉलसारखे स्ट्रेबस हार्मोन्स अगदी टोकावर असतात. ते रक्तातील साखर आणि रक्तदाब दोन्ही वाढवू शकतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर लगेचच चालणे या वाढीला कमी कऱण्यास मदत करू शकते.
सकाळी चालणे म्हणजे दिवसाची संतुलित सुरूवात
अनेक अभ्यासातून असे दिसून आले की, सकाळी चालणे तेसुद्धा नाश्त्यापूर्वी हे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते. म्हणजेच शरीर रक्तातील साखरेचा वापर अधिक कार्यक्षमतेने करू शकते. रक्तदाबासाठी सकाळी चालणे हे फायदेशीर ठरू शकते. साधारण हळूहळू चालणे हे एखाद्या औषधाप्रमाणे मदत करू शकते आणि ते दिवसभर रक्तदाब नियंत्रित ठेवते.
संध्याकाळी चालणे
सकाळी चालण्याचे फायदे असले तरी जेवणानंतरच्या चालण्याचाही फायदा आहेच. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. संध्याकाळी चालण्यामुळे स्नायूंना अतिरिक्त साखर शोषण्यास मदत होते. त्यामुळे अतिरिक्त औषधांशिवाय पातळी कमी होते. अनेक लोकांसाठी जेवणानंतर १५ ते २० मिनिटे चालल्यानेही जेवणानंतर साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यात उल्लेखनीय परिणाम दिसून आले आहेत. संध्याकाळी रक्तदाबदेखील नैसर्गिकरित्या कमी होतो आणि त्यावेळी चालण्यामुळे ह्रदयाला अधिक आराम मिळतो.
रक्तदाबावर होणारे परिणाम वेगवेगळे
हायपरटेन्शन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले की, सकाळी चालणाऱ्या लोकांमध्ये दिवसा रक्तदाब कमी झाल्याचे दिसून आले. तसंच संध्याकाळी चालणाऱ्या लोकांमध्ये रात्रीच्या वेळी सुधारणा दिसली. म्हणजेच दोन्ही वेळा चालण्याचे वेगवेगळे असे परिणाम आहेत. सकाळी उठल्यानंतर रक्तदाब वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगले असते, तर संध्याकाळी बरे होण्यास मदत होते.
रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम
रक्तातील साखरेवरील नियंत्रणासाठी सकाळी चालल्यास चयापचय सुधारते. मात्र, संध्याकाळी चालणे जेवणानंतर अचानक वाढणाऱ्या हालचालींना लक्ष्य करते. यामुळे रात्रीच्या जेवणानंतर ज्यांची साखरेची पातळी वाढते त्यांच्यासाठी संध्याकाळी चालणे हा उत्तम पर्याय आहे. संशोधनानुसार, सकाळच्या तुलनेत जेवणानंतर संध्याकाळी चालणे साखरेचे प्रमाण अधिक प्रभावीपणे कमी करते.
संतुलित दृष्टिकोन
हे खरंच आहे की, सकाळ किंवा संध्याकाळ यापैकी एक योग्य आहे हे सांगता येणार नाही. रक्तदाबासाठी सकाळच्या वेळी चालणे अधिक फायदेशीर ठरते, तर रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी संध्याकाळी चालणे उपयोगी ठरते. मात्र, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. तुम्ही सकाळी चाला किंवा संध्याकाळी किंवा सूर्यप्रकाशात नमस्कार करणे असो या सवयी महत्त्वाच्या आहेतच. मात्र, त्यामध्ये सातत्या असणं आणि त्या वेळोवेळी करणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान, असं असलं तरी ज्यांना उच्च रक्तदाब किंवा हाय शुगर समस्या असेल त्यांनी हे दिनचर्येतील बदल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावेत.