रात्रीची झोप ही अत्यंत महत्त्वाची असते. तब्येतीत बिघाड झाला की त्याचा परिणाम झोपेवरही होतोच आणि आरोग्य तेव्हाच बिघडतं जेव्हा आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. आपल्या रोजच्या अनेक अशा सवयी असतात ज्यामुळे आपल्याला अनेक गंभीर समस्या उद्भवतात. त्यापैकीच एक म्हणजे ब्रश करणे. सकाळी नित्यनेमाने तुम्ही ब्रश करत असलात तरी रात्री झोपण्याआधी ब्रश करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. रात्री ब्रश न करणे हा केवळ निष्काळजीपणाच नाही, तर तुमच्या आरोग्यासाठीदेखील धोकादायक ठरू शकते. दिवसभर बिझी शेड्यूलनंतर रात्री लवकर झोपण्यासाठी ब्रश करणं बरेच जण टाळतात. पण तुम्हाला ठाऊक आहे का दात घासल्याशिवाय झोपणे हे केवळ तुमच्या दातांसाठीच नाही, तर तुमच्या ह्रदयासाठीदेखील धोकादायक ठरू शकते?
भूलतज्ज्ञ आणि इंटरव्हेंशनल पेन मेडिसिन फिजिशियन डॉ. कुणाल सूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दात न घासणे हे जरी क्षुल्लक वाटत असले तरी ते हानिकारक ठरू शकते. रात्री ब्रश न केल्याने केवळ दातांचंच नाही तर गंभीर ह्रदयरोगाचा धोकादेखील वाढू शकतो.
नेमकं कारण काय?
डॉ. सूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, दात न घासणे हा ह्रदयरोगासाठी एक मोठा जोखमीचा घटक आहे, जो इतर आरोग्य समस्यांसह ह्रदयरोगाचा धोका वाढवू शकतो. नियमितपणे दात घासणाऱ्या लोकांना ह्रदयरोगाचा धोका कमी असल्याचे आढळून आले आहे. कारण स्वच्छ दात आणि निरोगी हिरड्या संसर्ग आणि जळजळ रोखतात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे ह्रदयाच्या आरोग्याचे रक्षण होते.
आपल्या तोंडाची योग्य काळजी
डॉ. सूद यांनी सांगितल्याप्रमाणे, जर तुम्हाला तुमचे ह्रदय आणि दात दोन्ही सुरक्षित ठेवायचे असतील तर नियमित आणि योग्य ब्रशिंगच्या सवयी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दिवसातून किमान दोनदा सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. बॅक्टेरिया पूर्णपणे काढून टाकण्यासाठी प्रत्येक वेळी किमान दोन मिनिटे ब्रश करा. तुमच्या दातांमध्ये अडकलेले बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी डेंटल फ्लॉस किंवा माउथवॉश वापरा.
नियमित तपासणी
जर तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल, त्यांना सूज येत असेल किंवा दुर्गंधी येत असेल तर ताबडतोब डेन्टिस्टचा सल्ला घ्या. तोंडाची स्वच्छता केवळ तुमच्या दातांसाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण शरीरासाठी महत्त्वाची आहे. यामुळे ह्रदयरोग, मधुमेह आणि स्ट्रोकसारख्या आजारांना प्रतिबंधित करण्यासही मदत होते.