Co-sleeping with pets and health impact : अनेक जण पाळीव कुत्र्यांना कुटुंबातील सदस्य मानतात आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. त्यांना कुत्र्याचे मालकापेक्षा पालक व्हायला आवडते. कुत्र्यांचा वाढदिवस साजरा करणे, त्यांच्याबरोबर फिरायला जाणे किंवा त्यांच्याबरोबर घरात वावरणे असो, कुत्र्यांनी माणसाच्या मनात एक भावनिक जागा निर्माण केली आहे. घरात जेव्हा कुत्रा वावरतो, तेव्हा त्याला आपल्या बेडवर झोपू देणे किंवा त्याला आपल्याबरोबर बेडवर घेऊन झोपणे कितपत योग्य आहे?
खरं तर हा पाळीव प्राण्यांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या लोकांमध्ये हा वादग्रस्त मुद्दा आहे. याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.

मार्स पेटकेअर इंडियाचे स्मॉल अ‍ॅनिमल सल्लागार डॉ. उमेश कल्लाहल्ली (Umesh Kallahalli) यांच्या मते, कुत्र्याला बेडवर झोपू देणे हे योग्य आहे का, याचे उत्तर प्रत्येकासाठी सारखे नाही. ते सांगतात, “ही वैयक्तिक निवड आहे; पण त्याचबरोबर तुमच्या कुत्र्याचे आरोग्य कसे आहे, तो स्वच्छ व नीटनेटका राहतो का, तसेच त्याची वागण्याची पद्धत कशी आहे, या घटकांवरसुद्धा अवलंबून आहे.”

कुत्र्यासह झोपणे योग्य आहे का?

ज्या घरांमध्ये कुत्र्यांना चांगली शिकवण दिलेली आहे, त्यांची वागणूक चांगली आहे आणि भावनिकदृष्ट्या ते सुरक्षित आहेत. अशा कुत्र्यांसह झोपणे हा एक माणूस आणि प्राण्यांमधील नाते घट्ट करण्याचा सुंदर पर्याय ठरू शकतो. “कुत्र्याबरोबर तुमचा बेड शेअर केल्याने कुत्रा आणि पालक दोघांनाही भावनिक आधार मिळू शकतो”, डॉ. कल्लाहल्ली सांगतात.

मार्स ग्लोबल पेट पेरेंट सर्व्हेमध्ये (Mars Global Pet Parent Survey) असे समोर आले आहे की, जवळजवळ अर्धे भारतीय पाळीव प्राण्यांच्या पालकत्वाबाबत पूर्णपणे समाधानी आहेत. याचे सर्वांत मोठे एक कारण म्हणजे ताण कमी होणे. डॉ. कल्लाहल्ली पुढे सांगतात, “कुत्रे हे भावनिक सुरक्षितता प्रदान करतात. बेडवर त्यांच्यासह झोपल्याने आपली एन्झायटी कमी होऊ शकते आणि आपल्याला चांगली झोप घेण्यास मदत होऊ शकते.”

अनेक पाळीव प्राण्यांचे पालक सांगतात की, कुत्र्याचा लयबद्ध श्वास घेणे किंवा मिठी मारणे त्यांना झोपण्यास मदत करते, ज्यामुळे झोपण्याची वेळ अधिक सोईस्कर वाटते. पण, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, प्रत्येक कुत्र्यासह आपण बेड शेअर करू शकत नाही. जर तुमच्या कुत्र्याला अस्वस्थता किंवा तुमच्या बेडवर जास्त मालकी दाखवणे इत्यादी वर्तणुकीशी संबंधित समस्या असतील, तर तुमचा कुत्रा आणि तुम्ही स्वतंत्र वेगळे झोपणे महत्त्वाचे आहे.

डॉ. कल्लाहल्ली सांगतात, “जर तुमचा पाळीव कुत्रा तुमच्या झोपेत अडथळा आणत असेल किंवा बेडवर तुम्ही त्याला थोडे सरकायला सांगितल्यावर आक्रमक होऊन प्रतिक्रिया देत असेल, तर त्यांना त्यांच्यासाठी तयार केलेल्या जागी झोपायला सांगणे चांगले आहे.” डॉ. कल्लाहल्ली स्वच्छतेचे महत्त्वसुद्धा सांगतात, “जर घरात कोणाला श्वसनाशी संबंधित आजार किंवा त्वचेच्या संवेदनशीलतेसंबंधित समस्या असेल, तर पाळीव प्राण्यासह झोपल्याने या समस्या आणखी वाढू शकतात.”

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुमच्या पाळीव प्राण्याला झोपण्यासाठी एक सुरक्षित, सोईस्कर व आरामदायी जागा द्यावी. मग तुमचा बेड असो किंवा त्यांचा स्वतःचा बेड असो. शेवटी डॉ. कल्लाहल्ली सांगतात “प्रत्येकाचे घर वेगळे असते; पण तुमच्या कुत्र्याच्या भावनिक गरजा आणि तुमचे स्वतःचे आरोग्य याचा आदर करणे महत्त्वाचे आहे.”