Deficiency of vitamin B 12: शरीराचं कार्य सुस्थितीत सुरू राहण्यासाठी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांची आवश्यकता असते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे जीवनसत्त्व म्हणजे व्हिटॅमिन बी १२. हे जीवनसत्त्व शरीरातील अनेक प्रक्रियांसाठी जबाबदार आहे. व्हिटॅमिन बी १२ शरीरात पसरलेले मज्जातंतूंचे जाळे निरोगी ठवते, लाल रक्तपेशी तयार करते, मेंदू निरोगी ठेवते, ह्रदय मजबूत करते, चांगले मानसिक आरोग्य राखते आणि नसांना संरक्षणात्मक कवच देते. मात्र, जर या जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर शरीराचा सांगाडा होण्यास वेळ लागणार नाही. अक्षरश: चालणेदेखील कठीण होऊ शकते. चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळेही बी १२ची कमतरता वाढत आहे.

एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हॉर्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. बिमल झांजर यांनी सांगितल्याप्रमाणे, व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. सुरूवातीला, किरकोळ थकवा किंवा भूक न लागणे ही लक्षणे दिसू शकतात. मात्र, ही स्थिती वाढत गेल्यास गंभीर मानसिक आणि पचन समस्या निर्माण होऊ शकतात. जर निदान आणि उपचार वेळेवर केले नाहीत, तर या कमतरतेमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच व्हिटॅमिन बी १२च्या पातळीचे निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

गॅस आणि अपचन

व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेचा थेट परिणाम पचनसंस्थेच्या कार्यावर होतो. अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि अपचन यासारख्या समस्या वारंवार उद्भवू शकतात. जेवणानंतर पोटात जडपणा जाणवणे हेही याचे लक्षण असू शकते.

भूक न लागणे

जेव्हा अपुऱ्या आहारामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही, तेव्हा सतत भूक न लागणे किंवा खाण्याची इच्छा नसणे हे व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेचे लक्षण मानले जाते.

पोटदुखी आणि सूज येणे

व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे पोटाच्या आवरणावर परिणाम होतो. यामुळे पोटात सतत जळजळ, वेदना किंवा फुगणे होऊ शकते. कधीकधी ही जळजळ आम्लतेसारखी वाटते, मात्र प्रत्यक्षात ती व्हिटॅमिनच्या कमतरतेशी संबंधित असू शकते.

बद्धकोष्ठता किंवा अतिसार

व्हिटॅमिन बी १२चे प्रमाण कमी असल्यास पचनसंस्थेत असंतुलन निर्माण होऊ शकते. यामुळे काही वेळा दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठता किंवा अचानक अतिसार होऊ शकतो. जर पोटात हे बदल बराच काळ सुरू राहिले तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

आजार आणि उलट्या

व्हिटॅमिन बी १२ची कमतरता असलेल्या काही लोकांना पोटात सतत जडपणा, मळमळ किंवा उलट्या जाणवतात. जर तुम्हाला जेवणानंतर लगेचच या समस्या वारंवार येत असतील, तर रक्त तपासणी करून तुमच्या व्हिटॅमिन बी १२ची पातळी तपासणे महत्त्वाचे आहे.

व्हिटॅमिन बी १२ची कमतरता कशी भरून काढावी?

शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन बी १२ची कमतरता अधिक असते. कारण हे व्हिटॅमिन प्रामुख्याने प्राण्यांच्या उत्पादनांमधून मिळते. असं असतानाही काही पर्याय उपयुक्त ठरू शकतात. दूध, ताक, दही आणि चीजसारखे पदार्थ व्हिटॅमिन बी १२चे उत्तम स्त्रोत आहेत. दह्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि व्हिटॅमिन बी १२ शोषण्यास मदत करतात. तसंच सफरचंद, केळी, संत्री आणि किवी यासारखी फळे खा. पालक, इतर हिरव्या भाज्या, मशरूम, अंडी आणि मासे हेही व्हिटॅमिन बी १२चे स्त्रोत आहेत.