Kidney failure due to Vitamin D overdose: शरीर निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वांपासून ते खनिजांपर्यंत सर्व गोष्टींची आवश्यकता असते. जीवनसत्त्व ई आणि बी १२ यासोबतच निरोगी शरीर राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे जीवनसत्त्व म्हणजे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी आपल्या हाडे, दात आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्याची कमतरता भरून काढणे महत्त्वाचे आहे. असं असताना जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डीचे सेवन केल्यास ते हानिकारकही ठरू शकते हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी चे सेवन केल्याने तुमच्या मूत्रपिंडांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सूर्यप्रकाशाची कमतरता भरून काढण्यासाठी किंवा चांगले आरोग्य राखण्यासाठी बरेच लोक व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घेतात. असं असताना ते अनेकदा जास्त प्रमाणात डोस घेतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडते. जर तुम्ही अविचारीपणे व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
चेन्नईतील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नेफ्रोलॉजी अँड युरोलॉजी शाखेचे सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट (किडनी स्पेशालिस्ट) आणि किडनी ट्रान्सप्लांट डॉ. नवीनथ एम. यांनी व्हिटॅमिन डीचे अति प्रमाणात सेवन केल्याचे दुष्परिणाम सांगितले आहेत.
व्हिटॅमिन डी कधी घ्यावे?
बहुतेक लोकांना दररोज फक्त थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन डी ची आवश्यक असते. किडनी तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, लोकांना दररोज सुमारे ४०० ते १००० आययू व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. असं असताना दररोज ४००० आययू पेक्षा जास्त किंवा अनेक महिन्यांपर्यंत ८००-१२००० आययू घेणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
तज्ज्ञ स्पष्ट करतात की, काही लोक नकळत दररोज ६०००० आययू टॅब्लेट घेतात, जे खूप जास्त प्रमाण आहे. यामुळे रक्तातील कॅल्शियम वाढते. याला हायपरकॅल्सेमिया म्हणतात. यामुळे मूत्रपिंडांवर जास्त दबाव येतो आणि त्यांचे नुकसानदेखील होऊ शकते.
जास्त व्हिटॅमिन डी किडनीचे नुकसान कसे करते?
तज्ज्ञ स्पष्ट करतात की, शरीरात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी तुमच्या किडनीसाठी हानिकारक असू शकते. जेव्हा मूत्रपिंडांना बराच काळ रक्तातून जास्त कॅल्शियम काढून टाकावे लागते, तेव्हा हे कॅल्शियम किडनीमध्ये जमा होऊ लागते. यामुळे हळूहळू किडनीमध्ये खडे तयार होतात. कॅल्शियम किडनीतही जमा होते आणि किडनीतील फिल्टरला नुकसान पोहोचवते. जर ही परिस्थिती गंभीर झाली तर किडनी निकामी देखील होऊ शकते.
व्हिटॅमिन डी चा अतिरेक झाल्यास कोणती लक्षणे दिसतात?
तज्ज्ञ म्हणतात की, शरीरात जास्त व्हिटॅमिन डी ची लक्षणे लगेचच दिसून येत नाहीत. असं असताना जेव्हा ही लक्षणे दिसतात तेव्हा पुढील लक्षणे दिसतात…
- मळमळ आणि उलट्या
- खूप तहान लागणे
- वारंवार लघवी होणे
- स्नायूंमध्ये कमकुवतपणा
- गोंधळ किंवा अत्यंत थकवा
- पाठीच्या खालच्या भागात किंवा बाजूला वेदना
या लक्षणांव्यतिरिक्त जर व्हिटॅमिन डी मुळे किंडनीचे गंभीर नुकसान झाले तर किडनी निकामी होण्याची लक्षणेदेखील दिसू शकतात. यामध्ये पायांना सूज येणे, थकवा येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश आहे.
व्हिटॅमिन डी चा अतिरेक कसा टाळावा?
व्हिटॅमिन डी चा अतिरेक साधारणपणे तेव्हा होतो जेव्हा लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता आहार घेतात, व्हिटॅमिन डी असलेली अनेक उत्पादने वापरतात किंवा देखरेखीशिवाय हाय डोस इंजेक्शन घेतात. हे टाळण्यासाठी कायम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्हिटॅमिन डी घ्या आणि शिफारस केलेल्या डोसपेक्षा जास्त घेऊ नका. तुम्ही घेत असलेल्या आहारात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचे प्रमाण निरोगी राहण्यासाठी आणि दुष्परिणाम टाळण्यासाठी नियमितपणे रक्त तपासणी करावी.
