Best Time To Eat Rice For Weight Loss: वजन कमी करायचंय मग भात सोडा.. साधारण आपल्या मित्र मैत्रिणींनी ते युट्युबवरच्या नवश्या न्यूट्रिशनिस्टनी, अगदी काही सेलिब्रिटींनी सुद्धा हा सल्ला दिल्याचे तुम्ही ऐकून असाल. कुठेतरी तुमच्या मनाला हे पटलं असेल आणि तुम्ही तसा प्रयत्न सुद्धा केला असेल पण खरं सांगा भात खाल्ला नाही तर मनाला शांती मिळते का? कोकणासह महाराष्ट्रभरात भात हा मराठी माणसाच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे. अगदी गोडापासून ते झणझणीत बिर्याणीपर्यंत इतकंच नाही तर कोंबडी वड्यांमध्येही तांदळाचा वापर हा आलाच. मग पूर्णपणे भात (तांदूळ) वर्ज्य करणे हा सल्ला आपल्या जीवनशैलीच्या विरुद्ध ठरणार नाही का? मित्र- मैत्रिणींनो आज आपण भात न सोडता वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करता येईल हे एका तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वजन कमी करण्यासाठी भात पूर्ण बंद करावा? (Should I Completely Stop Eating Rice For Weight Loss)

पारस हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ, नेहा पठानिया यांनी हेल्थशॉट्सला सांगितले की, तुम्ही भात कधी खाता हे तुमच्या वजनावर परिणाम करू शकते. पठानिया सांगतात की, तुम्हाला दररोज भात खाण्यास घाबरण्याची गरज नाही. त्यात भरपूर कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) असतात, म्हणून ते उर्जेचे पॉवरहाऊस आहे. वाटाणा, बीन्स, गाजर, पालक आणि भोपळा यांसारख्या भाज्यांसह खाल्ल्यास भात हा एक पौष्टिक पदार्थ आहे. कोणत्याही रंगाच्या तांदळात पोषक सत्व असतात आणि त्यात फोलेट मोठ्या प्रमाणात असते. थोडक्यात, तांदूळ हे पौष्टिक अन्न आहे. आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया..

हे ही वाचा<< किडनी हळू हळू पूर्ण निकामी व्हायच्या आधी शरीर देऊ शकते ‘ही’ ७ लक्षणे! लहान मुलांमध्येही वाढलेला धोका ओळखा

भात खाण्याची दिवसातील योग्य वेळ कोणती? (What time of the day is best to eat rice?)

तज्ञ सांगतात की दैनंदिन कार्बोहायड्रेट्स सेवन हे दिवसाच्या पहिल्या टप्प्यात झालेले असावे. कारण हीच वेळ असते जेव्हा तुमचे शरीर अधिक सक्रिय असते आणि अधिक ऊर्जा लागते. ज्यांना त्यांचे वजन नियंत्रित करायचे आहे किंवा ज्यांना मधुमेह आहे, त्यांच्यासाठी सकाळी भात खाणे रक्तातील साखरेची वाढ रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पण पठानिया म्हणतात की ते भाताचे सेवन हे नियंत्रित प्रमाणात आणि संतुलित असायला हवे . रात्रीच्या जेवणासाठी भात खाणे वगळणे उत्तम! अन्यथा तुम्हाला झोपण्यापूर्वी जड वाटू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weight loss expert suggest best time to eat rice to burn fats and calories also keeps blood sugar in control check here svs