Proteinuria: स्नायूंच्या योग्य वाढीसाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत. या पोषक तत्वांच्या कमतरतेची भरपाई करण्यासाठी आपण मसूर, चीज, सोयाबीन किंवा इतर मांसाहारी पदार्थांचे समावेश आपल्या आहारात करतो. पण जर शरीरातील प्रथिने लघवीमार्गे बाहेर पडू लागली तर काय होऊ शकतं? असं होतं हेच मुळात अनेकांना माहीत नसेल. या स्थितीला प्रोटीन्युरिया असे म्हणतात. आयुर्वेदात तसंच आधुनिक वैद्यकीय शास्त्रात ही एक गंभीर आरोग्य समस्या मानली जाते.

ही समस्या का उद्भवते?

जेव्हा किडनी खराब होते, तेव्हा ती पाणी फिल्टर करताना लघवीत प्रथिने उत्सर्जित करते. यामुळे संसर्ग होऊ शकतो. आयुर्वेदात ही स्थिती वात आणि कफाच्या वाढीशी जोडली गेली आहे. ही स्थिती किडनीवर परिणाम करते आणि नंतर हळूहळू इतर अवयवांवर परिणाम करते.

प्रोटीन्युरियाची लक्षणे

शरीर अनेक चेतावणी देत असतं. जसे जास्त पिवळा आणि फेस असलेली लघवी, लघवीच्या मार्गात संसर्ग वाढणे, डोळे आणि पायांना सूज येणे आणि किडनीला सूज येणे. या संसर्गासोबत तापदेखील येऊ शकतो. आयुर्वेदात प्रोटीन्युरिया टाळण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत, त्यामुळे प्रोटीन्युरियामुळे होणाऱ्या गुंतागुंती लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात.

या तीन प्रकारच्या पावडरचा वापर करा

प्रोटीन्युरिया टाळण्यासाठी किडनी निरोगी असणे आवश्यक आहे. म्हणून किडनी आणि संपूर्ण शरीर डिटॉक्सिफाय करणे आवश्यक आहे. यासाठी पुनर्नवा पावडर किंवा रस वापरता येतो. सकाळी रिकाम्या पोटी पुनर्नवा पावडर किंवा रस घ्या. गोखरू पावडर देखील या समस्येपासून वाचण्यास मदत करते. गोखरू पावडरमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे जळजळ कमी करतात आणि किडनीची कार्यक्षमता वाढवतात. ते सकाळी रिकाम्या पोटीदेखील सेवन केले जाऊ शकते.

शिवाय त्रिफळा पावडरदेखील फायदेशीर आहे. ते पचनशक्ती सुधारते आणि किडनीवरील भार कमी करते. त्रिफळा पावडर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी सेवन केले जाऊ शकते. तसंच आहारत बदल करणेदेखील आवश्यक आहे. प्रोटीन्युरियामध्ये कमी मीठ असलेले पदार्थ खाणे चांगले. याव्यतिरिक्त दुधी, भोपळा, तोंडली आणि मूग जास्त प्रमाणात खा. यामुळे शरीरात फायबर आणि प्रथिने दोन्हीची पुरेशी पातळी राखण्यास मदत होते.