Aerobic exercises for diabetes: युनिव्हर्सिडेड फेडरल डो व्हॅले डो साओ फ्रान्सिस्को आणि स्टॅफोर्डशायर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असे आढळून आले की, व्यायामाच्या दिनचर्येत बदल केल्याने टाईप १ मधुमेह असलेल्या व्यक्तींना रक्तातील साखरेचे नियंत्रण राखण्यास मदत होऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द अमेरिकन जर्नल ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात टाईप १ मधुमेह असलेल्या लोकांसाठी व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे, ज्यांना हायपोग्लायसेमियाच्या चिंतेमुळे अनेकदा समस्येला सामोरे जावे लागते. स्टॅफोर्डशायर विद्यापीठातील डॉ. पूया सोल्टानी यांनी अधोरेखित केले की, अभ्यासाचे निष्कर्ष व्यक्तींना या समस्येवर मात करण्यास आणि त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत व्यायामाचा समावेश करण्यास मदत करू शकतात.

टाईप १ मधुमेह असलेल्यांसाठी व्यायाम का महत्त्वाचा?

हैदराबादमधील नामपल्ली येथील केअर हॉस्पिटल्समधील कन्सल्टंट एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. श्रीनिवास कंडुला यांच्या मते, सतत अॅरोबिक व्यायाम विशेषतः टाईप १ मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहेत, ज्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढण्यास, रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास मदत होते.

रक्तातील ग्लुकोज नियंत्रण सुधारते

सतत अॅरोबिक व्यायामामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढते, ज्यामुळे स्नायूंना ग्लुकोज अधिक कार्यक्षमतेने वापरण्यास मदत होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर होण्यास मदत होते.

हृदयरोगाचे फायदे

टाईप १ मधुमेह असलेल्या व्यक्तींना हृदयरोगाचा धोका जास्त असतो. चालणे, धावणे आणि पोहणे यांसारखे अॅरोबिक व्यायाम हृदय आणि फुप्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी करतात.

पुरुष आणि महिलांसाठी व्यायामाच्या शिफारशी वेगवेगळ्या का?

शरीराच्या रचनेतील फरक आणि हार्मोनल चढ-उतारांमुळे पुरुष आणि महिलांसाठी व्यायामाच्या शिफारशी वेगवेगळ्या असतात, असे डॉ. कंडुला यांनी स्पष्ट केले. मासिक पाळीच्या चक्रामुळे टाईप १ मधुमेह असलेल्या महिलांना इन्सुलिन संवेदनशीलतेत अधिक चढ-उतार येऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या ग्लुकोजच्या पातळीवर पुरुषांपेक्षा वेगळ्या पद्धतीने परिणाम होतो.

अभ्यासानुसार, रक्तातील साखर कमी असताना पुरूषांसाठी व्यायामाचे छोटे-छोटे व्यायाम प्रकार ही एक चांगली सुरुवात असू शकते. परंतु जेव्हा साखर वाढते, तेव्हा धावण्यासारखे स्थिर गतीचे व्यायाम परिस्थिती संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात.

महिलांसाठी ते थोडे अधिक लवचिक आहे. लहान व्यायामप्रकार आणि स्थिर गतीने व्यायाम असे दोन्ही प्रकार फायदेशीर ठरू शकतात.

व्यायामाचे योग्य प्रमाण कसे ठरवायचे?

टाईप १ मधुमेहात व्यायाम करणे आव्हानात्मक असू शकते. कारण- हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखरेची पातळी कमी) होण्याचा धोका असतो. त्यासाठी इन्सुलिनची पातळी, कार्बोहायड्रेटचे सेवन आणि रक्तातील ग्लुकोजचे निरीक्षण काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे, असे डॉ. कंडुला यांनी स्पष्ट केले.

इन्सुलिन आणि अन्न सेवन यांच्यात योग्य संतुलन शोधणे कठीण असू शकते. कारण- इन्सुलिन कमी केल्याने हायपरग्लायसेमिया होऊ शकतो आणि कमी प्रमाणात अन्न सेवन केल्याने रक्तातील साखर कमी होऊ शकते.

वय, फिटनेस आणि वैयक्तिक मधुमेह व्यवस्थापन यांसारख्या घटकांवर अवलंबून व्यायामाचे योग्य प्रमाण बदलते. डॉ. कंडुला शारीरिक हालचालींसाठी ‘योग्य वेळ’ शोधण्याचे महत्त्व अधोरेखित करतात.

आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम अॅरोबिक व्यायामाचे लक्ष्य ठेवा (उदा. वेगाने चालणे, सायकलिंग).

उच्च-तीव्रतेचे व्यायाम सावधगिरीने केले पाहिजेत आणि ग्लुकोजच्या पातळीचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the best form to exercise for type 1 diabetes person sap