कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सर्व नियम पाळणं गरजेचं असतं. शस्त्रक्रिया कोणत्याही प्रकारची असली तरी नियम न पाळणं जीवावर बेतू शकतो. शस्त्रक्रियेपूर्वी काय किंवा केव्हा खावे आणि प्यावे याबद्दल गोंधळ निर्माण झाल्यास संबंधित व्यक्ती किंवा श्स्त्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञांशी वेळेवर संवाद साधणे महत्त्वाचे आहे.

शस्त्रक्रियेपूर्वी रूग्णांना काहीही न खाण्याचा कडक सल्ला का दिला जातो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? याबाबत तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेऊ…

शस्त्रक्रियेपूर्वीची मार्गदर्शक तत्व काय सांगतात?

सर्व रूग्णांना श्स्त्रक्रियेपूर्वी आठ ते बारा तास खाणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. काही प्रकरणांमध्ये स्वच्छ द्रवपदार्थांना परवानगी दिली जाऊ शकते, मात्र किमान आठ तासांपर्यंत कोणतेही अन्नपदार्थ खाऊ नये असा सल्ला दिला जातो.

ही मार्गदर्शक तत्व का असतात?

“शस्त्रक्रियेपूर्वी उपवास करणे हे केवळ एक वैद्यकीय नियम नाही”, असे सल्लागार आहारतज्ज्ञ कनिका मल्होत्रा यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, प्रत्येक रूग्णाचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी ही एक वैज्ञानिकदृष्ट्या पद्धत आहे, ज्याला एनपीओ किंवा Nothing by mouth म्हणतात.

“जेव्हा तुम्हाला भूल दिली जाते, तेव्हा तुमच्या शरीराचे नॅचरल रिफ्लेक्सेस तात्पुरते थांबतात. जर तुमच्या पोटात अन्न किंवा द्रव असेल तर ते पुन्हा वर येऊ शकते आणि ते चुकून फुप्फुसात जाऊ शकते. यामुळे गुदमरणे किंवा एस्पिरेशन न्यूमोनियासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. पोट रिकामे ठेवल्याने भूल देणे अधिक सुरक्षित होते आणि शस्त्रक्रिया अधिक सोपी होते”, असे ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचे अंतर्गत औषध संचालक डॉ. अमित सराफ यांनी सांगितले आहे.

सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी हे लागू आहे का?

शस्त्रक्रिया लहान असो वा मोठी, भूल देण्यामुळे गिळण्याच्या आणि खोकण्याच्या सामान्य रिफ्लेक्समध्ये व्यत्यत येऊ शकतो. म्हणूनच डॉक्टर जवळपास प्रत्येक शस्त्रक्रियेपूर्वी उपाशी राहण्याचा सल्ला देतात. फरक फक्त इतकाच असू शकतो की, तुम्हाला किती वेळ उपवास करावा लागेल, हे शस्त्रक्रियेच्या प्रकारावर आणि रूग्णाच्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असू शकते.

मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्यास काय होते?

काहीही न खाण्याच्या नियमांचे पालन करून शस्त्रक्रियेपूर्वी साधारणपणे आठ तास अन्नापासून आणि दोन तास द्रवपदार्थांपासून दूर राहणे असा सल्ला तज्ज्ञ देतात. शरीराला पोट साफ करण्यासाठी वेळ मिळतो, त्यामुळे प्रक्रियेदरम्यान श्वसनमार्ग सुरक्षित राहतील याची खात्री होते. ही पद्धत गैरसोयीची वाटू शकते, मात्र ती शस्त्रक्रियेच्या सुरक्षिततेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

उपवासामुळे पोट रिकामे राहते. त्यामुळे भूलतज्ज्ञांना सुरक्षितपणे काम करण्यास मदत होते आणि शस्त्रक्रियेनंतर मळमळ आणि उलट्यांचा धोका कमी होतो असे परळ इथल्या ग्लेनेगल्स हॉस्पिटलमधील कार्डिओव्हॅस्कुलर आणि थोरॅसिक, एमआयसीएस, ट्रॉमा आणि ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. स्वरूप स्वराज पाल यांनी सांगितले. रूग्णांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, काटेकोरपणे पालन केल्याने जोखीम कमी होते, सुरळीत शस्त्रक्रिया होण्याची शक्यता वाढते आणि शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यास गती मिळते.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • ही पद्धत मुलांसाठी आणि प्रौढांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण ती कमी जोखमींसह सुरक्षित शस्त्रक्रिया निश्चित होईल याची खात्री असते.
  • हलका नाश्ता किंवा चहाचा कप निरूपद्रवी आहे असे गृहीत धरू नका. त्यामुळे धोका वाढू शकतो.
  • जर तुम्ही चुकून काही खाल्ले किंवा प्यायले असेल तर ते तज्ज्ञांना सांगा. कारण ते लपवणे धोक्याचे ठरू शकते.
  • औषधांबद्दलच्या कोणत्याही अतिरिक्त सूचनांचे पालन करा. कारण काही औषधे पाण्यासोबत घ्यावी लागतात.