आहाराबाबत इतर ऋतुंच्या तुलनेमध्ये पावसाळ्याकरिता एक वेगळेच पथ्य अनुसरावे लागते . ते म्हणजे वातावरण ढगाळ असताना अन्नसेवन टाळण्याचे! पावसाळ्यामध्ये अनेकदा आकाश काळ्याशार ढगांनी भरून जाते,दिवसभर सुर्याचे दर्शनसुद्धा होत नाही,अशा ढगाळ वातावरणामध्ये अन्न सेवन न करण्याचा दिलेला सल्ला हा प्रामुख्याने अग्नीमांद्याचा विचार करून दिलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


सूर्य हा केवळ शरीराला विटामिन डी पुरवतो, हे आधुनिक विज्ञानाला कळलेले ज्ञान पूर्ण सत्य नसुन सुर्यकिरणांचा (सूर्यप्रकाशाचा) मानवी शरीराचे आरोग्य ठणठणीत ठेवण्यामध्ये महत्त्वाची व व्यापक भूमिका आहे. सूर्य अखिल सृष्टीला उर्जा देणारा आहे.त्यामुळे आकाशात सूर्य नसेल तेव्हा उर्जेचा अभाव जाणवतो, निसर्गाला आणि प्राणिमात्रांनासुद्धा.त्या उर्जेच्या अभावी अग्नी मंद होतो,भूक मंदावते आणि पचनशक्तीसुद्धा दुर्बल होते; एकंदरच चयापचय मंदावतो.अन्न सेवन केले तरी त्याचे व्यवस्थित पचन होण्याची शक्यता कमी.अशावेळी सेवन केलेले अन्न अनारोग्याला आमंत्रण देण्याची शक्यता अधिक.त्यामुळे आकाश ढगाळ असल्याने सूर्यदर्शन होत नसताना शक्यतो अन्नसेवन करू नये.पावसाळ्यात ढगाळ-कुंद वातावरण झाले की कांद्याच्या भजीसारखा पचायला जड असणार्‍या बेसनापासुन तयार केलेला व त्यात पुन्हा तळून बनवलेला पदार्थ खाणे कितपत योग्य ,याचा तुम्हीच विचार करा.

इथे एक प्रश्न उभा राहतो की पावसाळ्यात आठवडाभर वातावरण ढगाळ राहिले आणि सूर्यदर्शन झालेच नाही तर काय करायचे?उपाशी राहायचे का?नाही,वरील सल्ल्याचा तारतम्याने विचार करायला हवा.होताहोईतो ढगाळ वातावरणामध्ये अन्नसेवन टाळावे किंवा आयुर्वेदाने सांगितलेल्या अशा सहज पाच्य द्रवपदार्थांचा यूष-सूप्सचा (पेज व कढणांचा) आणि मांसरसाचा उपयोग करावा.तो लाभदायक होईल.

अन्नसेवन करायचे झालेच तर ते उष्ण गुणांचे,पचायला हलके आणि जेवताना स्पर्शालाही गरम असेल याचा कटाक्ष ठेवावा,जेणेकरून त्याचे पचन सहज होईल. थंड-ओलसर वातावरणाच्या पावसाळ्यात शरीरात शीतत्व वाढवणार्‍या शीत गुणांचा आहार टाळावा हे तर ओघाने आलेच. अशा पावसाच्या दिवसांमध्ये थंडगार आईस्क्रीम,कोल्ड्रिंक्स वा चिल्ड बीअर पिणे किती मूर्खपणाचे होते व शरीराला त्याचा किती त्रास होत असेल याचा जरा विचार करा.

दुसरीकडे आजकाल सकाळी घरून कामावर जाताना जेवणाचा डबा घेऊन जाणारे अनेक लोक असतात,ज्यांना दुपारी तेच गार पडलेले अन्न खावे लागते. ज्यांना अन्न गरम करण्याची सोय करता येईल त्यांनी ती जरूर करावी .मात्र ज्यांना अन्न गरम करण्याची सोय नाही त्यांनी आपल्या आहाराला पुदिन्याची चटणी,लसूणची चटणी, चिंचेची चटणी अशा पाचक चटण्यांची जोड द्यावी. जे भूक वाढवून अन्न पचवतील आणि शरीरातली उष्णताही वाढवतील.

पावसाळ्यातल्या वातावरणाच्या परिणामी व इतर अनेक कारणांमुळे अन्नाचे पचन सहज न झाल्याने व त्या अन्नापासुन शरीराला पोषण न मिळता उलट अपाय होण्याची शक्यता असल्यानेच पावसाळ्यामध्ये अनेक उपवास परंपरेने सांगितले आहेत , ते याच कारणाने! “अन्नसेवन टाळा” असे सांगून काही लोक ऐकणार नाहीत, मात्र माणसाला धार्मिक अधिष्ठानाची जोड दिली तर नक्की ऐकतील,याच विचाराने या दिवसांमध्ये अनेक उपवासांची योजना करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why we should avoid eating in cloudy conditions hldc psp