Heart attack early symptoms: आजच्या जगात अस्वास्थ्यकर जीवनशैली, ताणतणाव व आरोग्याला घातक ठरणाऱ्या सवयी यांमुळे तरुणांनाही अकाली हृदयरोग होण्याची शक्यता निर्माण होत आहे. एकेकाळी हृदयविकार हा वृद्धांचा आजार मानला जात असे; परंतु आजकाल लोकांना कमी वयात हृदयविकाराचा झटका येत आहे. त्यासाठी अस्वास्थ्यकर अन्न, धूम्रपान, ताणतणाव, झोपेचा अभाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही मुख्य कारणे मानली जातात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, दरवर्षी जगभरात एक कोटीहून अधिक लोक हृदयविकाराच्या झटक्याने मरतात.

बीएम बिर्ला हार्ट हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजिस्ट डॉ. अनिल मिश्रा यांच्या मते, हृदयविकाराच्या झटक्याच्या सुरुवातीची चिन्हे किंवा लक्षणे नेहमीच स्पष्ट नसतात. कधी कधी ही लक्षणे इतकी सौम्य आणि सूक्ष्म असतात की, लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांना ओळखणे आणि त्यांच्यावर त्वरित उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हृदयविकाराची लक्षणे ओळखून, त्यावर उपचार केल्यानेच रुग्णाचे प्राण वाचू शकतात.

वारंवार छातीत दुखणे

हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी छातीत तीव्र आणि असह्य वेदना जाणवू शकतात. ही अस्वस्थता सौम्यदेखील असू शकते आणि बहुतेकदा ती आम्लता, स्नायूंचा ताण किंवा फक्त कामाचा ताण म्हणून नाकारली जाते. आजकाल ही वेदना तरुणांमध्ये येऊ शकते. मात्र, जर ही स्थिती वारंवार उदभवली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

श्वास घेण्यास त्रास होणे आणि थकवा यांचा संबंध नाही

तरुणांना अनेकदा असे वाटते की, फक्त वृद्धांना किंवा फुप्फुसाचा आजार असलेल्यांनाच श्वास घ्यायला त्रास होतो; परंतु अगदी हलक्या हालचालीनंतर किंवा विश्रांती घेत असतानाही श्वास घेण्यास त्रास होणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. छातीत दुखण्यापूर्वी ते अनेकदा दिसून येते. विशेषतः हलक्या हालचालीनंतर किंवा विश्रांती घेत असतानाही हलकीशी धाप लागणेही धोक्याचे लक्षण असू शकते.

खूप घाम येणे

हृदयविकाराच्या झटक्याच्या दोन तास आधी रुग्णांना खूप घाम येऊ लागतो. घाम येणे अगदी सामान्य आहे; परंतु जर आपण कोणतीही शारीरिक हालचाल न करताही घाम येत असेल, तर ते गंभीर लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही आरोग्य तपासणी करून घेण्याची गरज आहे हे लक्षात घ्या.

चक्कर येणे

जेव्हा हृदयाची रुधिराभिसरणाची क्षमता कमी होते, तेव्हा शरीर आणि मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे वारंवार चक्कर येणे, डोके हलके होणे किंवा बेशुद्ध पडणे, अशा स्वरूपाची लक्षणे दिसू शकतात. उभे राहण्यात अचानक बदल झाल्यास हे आणखी वाढू शकते. जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हृदयविकाराचा झटका आल्यास ताबडतोब काय करावे?

जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. हृदयविकाराचा झटका ही एक वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती आहे, ज्यासाठी संबंधित रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल केले जाणे आवश्यक आहे. बऱ्याचदा लोक त्या वेदनेकडे दुर्लक्ष करतात आणि चालायला लागतात, पाणी पितात आणि पुन्हा झोपतात अथवा ती वेदना शांत राहून सहन करतात किंवा छातीवर मलम किंवा तेल लावायला सुरुवात करतात.

हृदयविकारासारखा आजार अचानक उचंबळून येऊ शकतो आणि कधी कधी रुग्णाला रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे नेण्यास विलंब होऊ शकतो. अशा परिस्थितीत रुग्ण वा त्याच्यासोबतच्या नातेवाइकांना प्राथमिक प्रतिसाद आणि सीपीआरची मूलभूत माहिती असेल, तर ती बाब खूप उपयुक्त ठरू शकते. अशा परिस्थितीत छातीवर तत्काळ दाब देऊन रुग्णाचा जीव वाचवता येतो.

  • जर तुम्हाला वाटत असेल की, एखाद्याला हृदयविकाराचा झटका येत आहे, तर प्रथम रुग्णाला आरामात बसण्याचा आणि शांत राहण्याचा सल्ला द्या.

  • जर रुग्णाचे कपडे घट्ट असतील, तर ते सैल करा.

  • रुग्णाला विचारा की, तो छातीत दुखणे किंवा हृदयरोगाची औषधे घेत आहे का. जर रुग्ण हृदयरोगाची औषधे घेत असेल, तर त्याला ती देण्यास मदत करा.

  • रुग्णाने विश्रांती घेतल्यानंतर किंवा औषध घेतल्यानंतरही काही मिनिटांत वेदना कमी होत नसल्यास, ताबडतोब आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळवा