आपण काय खात आहोत यावर लक्ष ठेवण्याबरोबर आपण दिवसातून किती वेळा खात आहोत यावरही लक्ष ठेवायला हवे. चला तर मग जाणून घेऊयात, दिवसभरात किती वेळा जेवण करणे योग्य? हैदराबाद येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. भावना पी. यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
दिवसभरात ३ पेक्षा जास्त वेळा जेवण करण्याचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत.
फायदे –
थोड्या तोड्या अंतराने जेवण केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर होण्यास मदत होऊ शकते, विशेषतः मधुमेह किंवा इन्सुलिन संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींमध्ये. डॉ. भावना यांनी, “दिवसभरात थोड्या थोड्या वेळानं खाल्ल्यानं तृप्ती सुधारते, जास्त खाणे कमी होते आणि ऊर्जा पातळी दिवसभर स्थिर राखता येते. ही पद्धत बहुतेकदा अॅसिड रिफ्लक्ससारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर असते. कारण- अशा प्रकारे थोडं थोडं खाल्लायानं पचनसंस्थेवरील दबाव कमी होतो,” असे सांगितले. तसेच त्यामुळे जेवणादरम्यान जास्त खाणे टाळण्यास मदत होईल, असे मुंबईतील ग्लेनेगल्स हॉस्पिटल परळ येथील अंतर्गत औषध क्षेत्रातील वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी सांगितले.
तोटे –
मात्र, दिवसभरात थोड्या तोड्या अंतराने जेवण करण्याचा असाही एक तोटा आहे की, शरीराला पचायला वेळ न देता सतत खाल्ल्याने वजन वाढू शकते. विशेषतः जर जेवणात कॅलरीज, साखरेचे प्रमाण जास्त असेल तर.थोड्या तोड्या अंतराने खात राहिल्याने पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण पडू शकतो आणि आम्लता, पोटफुगी, गॅस व अपचन यांसारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात. विविध अभ्यासांनी हेदेखील सिद्ध केले आहे की, जर आपले खाणे योग्यरीत्या व्यवस्थापित केले गेले नाही, तर दिवसभर सतत खाल्ल्यामुळे चयापचय विकारांचा धोका वाढू शकतो. योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात जेवण न केल्यास, विचार न करता वारंवार खाल्ल्याने स्वादुपिंडावर ताण येऊ शकतो. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवणे आणि दोन जेवणांमध्ये पचनासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे, असे डॉ. अग्रवाल म्हणाले. संतुलित जीवनशैली जगण्यासाठी आपण दिवसातून तीन वेळाही खाऊ शकता. सकाळी आरोग्यदायी नाश्ता, दुपारी भरपूर जेवण आणि रात्री हलके पदार्थ खाल्ल्याने शरीर सुदृढ राहील. त्याशिवाय दोन जेवणांच्या मधल्या वेळात काहीही खाणे टाळा. त्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचू शकेल आणि शरीरप्रकृती चांगली राहण्यास मदत होईल.
जेवणाची योग्य वेळ काय?
जेवणाची योग्य वेळ पाळणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. वेळेवर जेवण केल्यामुळे आपल्या शरीराला आराम करण्यास जास्त वेळ मिळतो. त्यामुळे हृदयासह सर्व अवयवांना त्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. आहारतज्ज्ञ डॉ. भावना पी. सांगतात की, ६ ते १० या वेळेत जेवण करणे योग्य आहे.