‘कर्टुले’ ही भाजी विशेषत: पावसाळ्यात येते. याला इंग्लिशमध्ये स्पायनी गॉर्ड असं म्हटलं जातं. हल्ली तुम्ही पाहिलं असेल तर ही भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात उपल्बध आहे. हिरव्या रंगाच्या या अंडाकार भाजीत व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबरसारखे अनेक आवश्यक पोषकत्त्व असतात. या भाजीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढतेच, सोबतच शरीराचं पोषण करण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य वाढवण्यापासून आणि जळजळ कमी करण्यापासून ते रक्तातील साखर नियंत्रणापर्यंत, ही साधी भाजी तुमच्या आरोग्यासाठी पूर्णपणे बदल घडवून आणू शकते. निरोगी जीवनशैलीकडे एक पाऊल पुढे टाकायचे आहे का? मग या पावसाळ्यात तुमच्या आहारात ‘कर्टुले’ या भाजीचा नक्की समावेश करा.

‘कर्टुले’चे पाच आश्चर्यकारक आरोग्य फायदे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे :

१. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते

राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH) नुसार, तुमच्या आहारात ‘कर्टुले’चा समावेश केल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. त्यात कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात आणि त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते, जे रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असते. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ‘कर्टुले’ खाल्ल्याने इन्सुलिन संवेदनशीलतादेखील सुधारू शकते.

२. यकृताच्या कार्याला समर्थन देते

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासोबतच, कर्टुले खाल्ल्याने यकृताच्या कार्यालादेखील मदत होऊ शकते. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असल्याने आपल्या यकृतासाठी ते उत्तम बनते. नियमितपणे त्याचे सेवन केल्याने फॅटी लिव्हर रोगाचा धोका टाळता येतो.

३. जळजळ कमी करते

सांधेदुखी असो किंवा ताप असो, ‘कर्टुले’ हा एक नैसर्गिक उपाय म्हणून बराच काळ वापरला जात आहे. पोषणतज्ज्ञ नवनीत बत्रा यांच्या मते, त्याच्या अर्कांमध्ये दाहक-विरोधी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत. हे दुखापतींना शरीराची प्रतिक्रिया शांत करण्यास मदत करतात.

४. हृदय आणि मूत्रपिंडांचे आरोग्य वाढवते

एनआयएचच्या आणखी एका अभ्यासात असे म्हटले आहे की, कर्टुल्यामध्ये नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ असतो, जो जास्त द्रव बाहेर काढण्यास मदत करतो, ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो आणि मूत्रपिंडांवरील ताण कमी होऊ शकतो. संशोधनात असेही सूचित केले आहे की, ते कोलेस्ट्रॉल कमी करू शकते, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी जोखीम घटक कमी करून हृदयासाठी अतिरिक्त संरक्षण प्रदान करते.

५. दृष्टी वाढवते

व्हिटॅमिन ए हे चांगल्या दृष्टीसाठी महत्त्वाचे पोषक तत्व आहे. व्हिटॅमिन ए समृद्ध असल्याने, ही भाजी दृष्टी सुधारण्यास मदत करते. नियमित सेवनाने रात्रीच्या अंधत्वाचा धोकादेखील कमी होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे डोळे पुढील काही वर्षांसाठी निरोगी राहतात.

‘कर्टुले’ची भाजी बनवायची कशी?

‘कर्टुले’ची भाजी साहित्य

  • २५० ग्रॅम कर्टुले
  • २ बारीक चिरलेले कांदे
  • १/२ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
  • २५ ग्रॅम भिजवलेली मूग डाळ
  • १/२ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
  • १ टीस्पून धणे-जिरे पूड
  • १ टीस्पून मीठ
  • १/२ टीस्पून हिंग
  • १ टीस्पून हळद
  • १ टीस्पून मोहरी-जिरे
  • २ टेबलस्पून तेल

‘कर्टुले’च्या भाजीची कृती

प्रथम कर्टुले धुऊन घ्यावे व त्याच्या बारीक फोडी करून घ्याव्या. वाटल्यास बिया काढून घ्याव्यात. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग घालून कांदा घालावा. कांदा थोडा खरपूस झाला की त्यात आलं लसूण पेस्ट घालून छान परतावे.

परतलेल्या कांद्यामध्ये बाकी मसाले घालावे. जसे की तिखट, मीठ, धणे पूड, जिरे पूड, हळद छान परतून घ्यावे. मग त्यामध्ये भिजलेली मुगाची डाळ व कर्टुले घालावे व एकजीव करून घ्यावे

आता एकजीव केलेल्या भाजीमध्ये थोडे पाणी शिंपडावे व झाकण ठेवून दहा मिनिटे छान वाफ येऊ द्यावी. नंतर झाकण उघडून भाजी पुन्हा छान एकजीव करावी व गरम गरम पोळीसोबत सर्व्ह करावी.