Mouth cancer early symptoms: तोंडाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये तोंडाच्या आतील ऊतींमध्ये असामान्य आणि अनियंत्रित पेशींची वाढ होते. या आजाराचे नाव ऐकताच आपल्या मनात येणारे पहिले कारण म्हणजे तंबाखू, सिगारेट आणि अमली पदार्थांचे सेवन. पण, तुम्हाला माहीत आहे का की तोंडाच्या कर्करोगामागे व्यसन हे एकमेव कारण नाही तर एचपीव्ही संसर्ग, तोंडाची अस्वच्छता, दंत समस्या, तोंडामध्ये दीर्घकालीन फोड किंवा जळजळ, शरीरात पौष्टिकतेची कमतरता आणि आनुवंशिकतादेखील आहे.
लखनऊच्या श्री राम मेमोरियल हॉस्पिटलमधील ईएनटी सर्जन डॉ. अनुराग दिवाण म्हणाले की, जर तोंडात अल्सर असेल आणि तो दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तोंडात पांढरे डाग पडले असतील आणि जेवताना त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला किरकोळ असू शकतात, परंतु कालांतराने ती गंभीर होऊ शकतात. तोंडाचा कर्करोग म्हणजे काय आणि तो तोंडात कुठे होतो आणि त्याची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत आणि तो कसा रोखता येईल हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.
तोंडाचा कर्करोग म्हणजे काय?
तोंडाचा कर्करोग हा कर्करोगाचा एक प्रकार आहे, जो तोंडाच्या अनेक भागांमध्ये होऊ शकतो. जसे की ओठ, जीभ, वरचा ओठ, खालचा ओठ, जिभेचा मागील भाग, जिभेचा भाग आणि तोंडाच्या वर टाळूत. तोंडाच्या कोणत्याही भागात होणाऱ्या कर्करोगाला तोंडाचा कर्करोग म्हणतात.
तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?
तोंडात येणारे फोड किंवा व्रण २-३ आठवड्यांत बरे न होणारे.
गालाच्या आत किंवा हिरड्यांवर जाड किंवा कडक ठिपके.
तोंडाच्या आत किंवा जिभेवर पांढरे किंवा लाल ठिपके.
चघळण्यास, बोलण्यास किंवा गिळण्यास त्रास होणे.
दात सैल होणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय दात पडणे.
घशात दुखणे
कान दुखणे
जबड्यात किंवा गालात सूज येणे
तोंडातून वारंवार रक्त येणे
आवाजात बदल
श्वासाची दुर्गंधी
अचानक वजन कमी होणे
भूक न लागणे
घशात बराच काळ राहणारी गाठ ही तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात.
तोंडाचा कर्करोग शोधण्यासाठी कोणत्या चाचण्या आवश्यक आहेत?
तोंडाचा कर्करोग शोधण्यासाठी बायोसिस केले जाते. बायोप्सी आणि इतर चाचण्यांच्या मदतीने हा आजार शोधता येतो. जर तोंडाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात आढळला तर हा आजार सहजपणे नियंत्रित केला जाऊ शकतो.
तोंडाच्या कर्करोगावर उपचार
कर्करोगावर तीन प्रकारे उपचार केले जातात. कर्करोगाच्या वाढीनुसार शस्त्रक्रिया केली जाते. रेडिओथेरपी आणि केमोथेरपीच्या मदतीने कर्करोगावर उपचार करता येतात.
आजार कसा टाळायचा
तंबाखू, सिगारेट आणि गुटखा यांसारख्या मादक पदार्थांचे सेवन टाळा.
निरोगी आहार घ्या. तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घ्या. दात आणि तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घ्या.
तोंडाचा कर्करोग बरा होऊ शकतो, लक्षणे त्वरित ओळखा आणि रोग टाळा.