Navratri Special : नवरात्रीचा उत्सव म्हणजे नऊ दिवसांचा आनंद, उत्साह व गरबा यांचा जल्लोष असतो. या काळात सगळीकडे रंगीबेरंगी कपडे, पारंपरिक लूक व फॅशन यांची खूपच चर्चा असते. प्रत्येक महिला या दिवसांत आपला लूक उठून दिसावा, सगळ्यांत वेगळा व आकर्षक वाटावा यासाठी खास तयारी करीत असते. साडी, लेहंगा-चोली किंवा फ्युजन आउटफिट्स अशा प्रत्येक गोष्टीत महिला काहीतरी हटके करायला बघतात. याच तयारीत सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे ब्लाऊज डिझाईन. पारंपरिक पोशाखाला मॉडर्न टच द्यायचा असेल, तर ब्लाऊजवर थोडे प्रयोग केल्याने तुमचा संपूर्ण लूक बदलू शकतो. आजकाल बॅकलेस ब्लाऊजची क्रेझ तरुणींमध्ये विशेष दिसून येते. हे ब्लाऊज फॅशनसोबतच एलिगंट लूकही देतात. म्हणूनच या नवरात्रीत तुम्हीही दांडिया किंवा गरबा नाईट्ससाठी बॅकलेस ब्लाऊज ट्राय करून पाहा.
⦁ बॅकलेस ब्लाऊज का करतो लूक खास?
बॅकलेस ब्लाऊज कोणत्याही पारंपरिक ड्रेसला स्टायलिश आणि ग्लॅमरस टच देतो. साडी असो किंवा लेहंगा, अशा प्रकारचा ब्लाऊज घातल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि संपूर्ण आऊटफिटकडे लोकांचे लक्ष वेधले जाते. बॅकलेस डिझाईन केवळ मॉडर्न लूक देत नाही, तर पारंपरिक पोशाखालाही फॅशनेबल अंदाज मिळवून देते.
⦁ नवरात्रीत कोणते डिझाईन ट्राय कराल?
१. डोरी बॅकलेस ब्लाऊज
डोरी बॅकलेस ब्लाऊज म्हणजे एक असा ब्लाऊज, ज्याचा मागचा भाग पूर्णपणे उघडा असतो. त्यामध्ये पाठीवर बांधण्यासाठी दोऱ्या असतात, ज्यामुळे ब्लाऊजला पकड मिळते आणि तो आकर्षक दिसतो. पाठीमागे केवळ डोरी बांधलेला हा डिझाईन दांडियासाठी एकदम परफेक्ट आहे. साधा लूक असूनही हा ब्लाऊज आकर्षक दिसतो.
२.डीप-यू कट बॅकलेस ब्लाऊज
डीप-यू कट बॅकलेस ब्लाऊज म्हणजे असा ब्लाऊज ज्याच्या मागच्या बाजूला U-आकाराचा खोल कट असतो, जो अधिक आकर्षक दिसतो. हे डिझाईन आधुनिक आणि स्टायलिश असून, लग्नसोहळ्यांपासून ते पार्टी आणि इतर कार्यक्रमांपर्यंत विविध प्रसंगांसाठी योग्य आहे.
थोडा बोल्ड आणि मॉडर्न टच हवा असल्यास डीप-यू बॅक डिझाईन उत्तम प्रकार आहे. साडी किंवा लेहंग्यासोबत ही डिझाईन अप्रतिम दिसते.
३. मिरर वर्क बॅकलेस ब्लाऊज
मिरर वर्क बॅकलेस ब्लाऊज म्हणजे एक असा ब्लाऊज, ज्याच्या मागच्या बाजूला मिरर वर्क केलेलं असतं, त्यामुळे ब्लाऊजला आकर्षक आणि ग्लॅमरस लुक येतो. हे डिझाइन तरुण मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि नवरात्रीत चमचमता लूक मिळवण्यासाठी मिरर वर्क केलेले ब्लाऊज खास असतात. गरब्यात थिरकत असताना हे ब्लाऊज दिव्यांच्या प्रकाशात उठून दिसतात.
४. लट्कन स्टाईल ब्लाऊज
लटकन स्टाईल ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजला सुशोभित करण्यासाठी लावलेले धागे, मणी किंवा इतर सजावटीच्या वस्तूंचे लटकन. हे लटकन ब्लाऊजच्या पाठीवर किंवा नेकलायनवर लावले जातात आणि त्यामुळे ब्लाऊजची शोभा वाढते. तसेच लटकन लावलेला बॅकलेस ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. त्यात पारंपरिकता आणि मॉडर्न टच दोन्ही मिळतात.
⦁ नवरात्रीसाठी लेहंग्याचे खास पर्याय
१. घेरदार लेहंगा
नवरात्रीत दांडिया-गरब्यासाठी सर्वाधिक पसंती मिळणारा प्रकार म्हणजे घेरदार लेहंगा. मोठ्या घेरामुळे नाचताना प्रत्येक पावलावर त्याची लय आणि हालचाल अप्रतिम दिसते. रंगीबेरंगी डिझाइन्स व पारंपरिक नक्षीमुळे हा लेहंगा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.
२. मिरर वर्क लेहंगा
दिव्यांच्या प्रकाशात झगमगणारा मिरर वर्क लेहंगा नवरात्रीच्या रात्रींना वेगळाच ग्लॅमरस टच देतो. थिरकत असताना मिररचा चमकदार लूक संपूर्ण पोशाख उठून दिसतो. पारंपरिकतेसोबत फॅशनची जोड हवी असेल, तर हा लेहंगा उत्तम आहे.
३. बांधनी प्रिंट लेहंगा
गुजरात-राजस्थानची खासियत असलेला बांधनी प्रिंट लेहंगा नवरात्रीत खूपच शोभून दिसतो. विविध रंगांच्या मिश्रणामुळे हा पोशाख सणाच्या वातावरणात अगदी खुलतो. हलक्या कपड्यांत तयार झाल्याने नाचताना हा ड्रेस आरामदायकही वाटतो.
४. फ्युजन स्टाईल लेहंगा
लेहंग्यासोबत क्रॉप टॉप, शॉर्ट जॅकेट किंवा मॉडर्न ब्लाऊज पेअर केल्यास लूक अजून ट्रेंडी आणि हटके दिसतो. पारंपरिक पोशाखात थोडा मॉडर्न टच हवा असेल, तर हा पर्याय बेस्ट आहे.
५. सिल्क लेहंगा
रिच आणि क्लासिक अंदाज हवा असेल, तर सिल्क लेहंगा हा एकदम बेस्ट पर्याय आहे. सोनेरी बॉर्डर, झरी वर्क किंवा दगडांची नक्षी या लेहंग्याला अजून उठावदार बनवतात. फक्त नवरात्रीसाठीच नाही, तर लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांसाठीही हा वापरता येतो.