मासिक पाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक महिलेला शारीरिक त्रास सहन करावा लागतो. काहींना पोटदुखी,तर काहींना अंगदुखीचा त्रास होतो. ही समस्याही एक ते दोन दिवसांत दूर होते. पण काही महिला अशा आहेत ज्यांना मासिक पाळीत जास्त रक्तस्राव झाल्यामुळे खूप त्रास होतो. स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होण्याला मेनोरेजिया म्हणतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेनोरेजियामुळे रक्तस्त्राव वेगाने होतो आणि महिलांना दिवसभरात वारंवार पॅड बदलावे लागतात. सामान्यतः मासिक पाळीचा प्रवाह तीन दिवसांत संपतो, परंतु ज्या स्त्रीला मेनोरेजियाची समस्या आहे त्यांना दीर्घकाळापर्यंत वेगाने रक्तस्त्राव होतो. आज आपण या आजाराविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

मेनोरेजिया म्हणजे काय?

साधारणपणे, मासिक पाळीत चार ते पाच दिवस स्त्रियांना ३० ते ४० मिली रक्तस्त्राव होतो. ज्या महिलांमध्ये रक्तस्रावाची पातळी यापेक्षा जास्त असते त्याला वैद्यकीय भाषेत ‘मेनोरेजिया’ म्हणतात. मेनोरेजियाने ग्रस्त असलेल्या महिलेला ८० मिली पर्यंत रक्तस्त्राव होऊ शकतो. या आजारात रक्तस्त्राव ७ दिवसांपेक्षा जास्त काळ टिकू शकतो. स्त्रियांमध्ये होणारा जास्त रक्तस्त्राव गर्भाशयावर परिणाम करतो. या समस्येमुळे महिलेच्या शरीरात रक्ताची कमतरता होऊन ती अ‍ॅनिमियाची शिकार होऊ शकते.

मेनोरेजिया ही समस्या का निर्माण होते?

हार्मोनल असंतुलन, अंडाशयातील बिघाड, गर्भाशयातील फायब्रॉइडमुळे, गरोदरपणातील गुंतागुंत, कॅन्सर, रक्तस्रावाचे विकार आणि औषधांच्या अतिसेवन अशा अनेक कारणांमुळे महिलांना मेनोरेजियाची समस्या उद्भवू शकते. स्त्रियांमध्ये, जेव्हा अंड बाहेर पडत नाही, तेव्हा कमी प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे जास्त रक्तस्त्राव होतो.

मेनोरेजियाची लक्षणे कशी ओळखावीत?

  • जर या कालावधीत जास्त रक्तस्राव होत असेल आणि पॅड लवकर ओला होत असेल तर हे मेनोरेजियाचे लक्षण असू शकते.
  • जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात.
  • एक आठवड्यापेक्षा जास्त काळ रक्तस्त्राव सुरू राहतो.
  • जर तुम्हाला रात्रीच्या वेळी वारंवार पॅड बदलावे लागत असेल.

तुम्हालाही वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करा.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा मिळाला घ्यावा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Severe abdominal pain or heavy bleeding during menstruation may be a sign of serious illness menorrhagia pvp