Solkadhi Health Benfits: कोकण, मालवणातील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे सोलकढी. रविवारचा चिकन, मटण, मच्छी असा बेत असला की बरोबरीने सोलकढी हवीच. नारळाचे दूध व कोकमाचा सार याचं मिश्रण म्हणजे ही कमाल रेसिपी, अगदी फार सामग्री नसल्याने झटपट उरकरणारी ही रेसिपी आहे पण बनवायला वेळ लागत नसला तरी याची चव जिभेवर बराच वेळ रेंगाळत राहते. काही घरांमध्ये या सोलकढीला मस्त झणझणीत मसालेदार फ्लेव्हर देण्यासाठी मिरची वाटून टाकली जाते. दाबून जेवल्यावर अनेकदा एखादा ढेकर आला की कसं तृप्त झाल्यासारखं वाटतं, बस हा ढेकर आणण्याचं काम ही सोलकढी अगदी उत्तम करते. पण मंडळी सोलकढीचा उपयोग हा एवढाच नाही बरं का.. अगदी वजन कमी करण्यापासून ते मधुमेहापर्यंत अनेक समस्यांवर सोलकढी हे उत्तर ठरू शकते. आजच्या या लेखात आपण सोलकढीचे आरोग्यासाठी काही भानात फायदे जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलकढीचे मुख्य घटक काय? कोकम व खोबरं. कोकमात अ‍ॅन्टीऑक्सिडंट, फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात. तर ओल्या नारळात प्रथिने, व्हिटॅमिन-सी, खनिजे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात परिणामी शरीराला या कोकम+ खोबरं कॉम्बोचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

नितळ तेजस्वी त्वचेसाठी..

त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी सोलकढीची मदत होऊ शकते.अ‍ॅन्टीऑक्सिडंटमुळे त्वचा सतेज होते इतकेच नव्हे तर चेहर्‍यावर वेळेपूर्वी येणाऱ्या सुरकुत्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.

डायबिटीज रुग्णांसाठी…

कोकमातील खनिजांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. तसेच कोलेस्ट्रॉलवर नियंत्रणासाठीही कोकम उपयुक्त असल्याने हृदय विकाराच्या संबंधित तक्रारी सुद्धा कमी होऊ शकतात. याबाबत आपण वैद्यकीय सल्ला घेणे उचित ठरेल.

बद्धकोष्ठ व अपचन होत असल्यास..

मांसाहारासारखे पचायला जड पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून सोलकढीचे सेवन केले जाते. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी या कढीचा फायदा होऊ शकतो. वर म्हण्टल्याप्रमाणं जर आपण सोलकढीला आलं- लसूण व किंचित मिरचीचा तडका दिल्यास जंतांच्या समस्येवर आराम मिळू शकतो. पचन सुरळीत झाल्यास परिणामी येणारी अस्वस्थना व चिडचिड कमी होण्यासही मदत होते.

ऍलर्जीवर आराम

मांसाहारामुळे अनेकदा पित्ताचा त्रास होतो, पित्तामुळे शरीरावर जाडसर पुरळ येण्याची शक्यता असते, सोलकढीमुळे अशा प्रकारच्या त्वचेच्या ऍलर्जीवर आराम मिळू शकतो. याचं मुख्य कारण म्हणजे सोलकढीमुळे पचनक्रिया सुधारते परिणामी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात, शरीर डिटॉक्स झाल्याने त्वचेवरही त्याचा उत्तम प्रभाव दिसून येतो.

पांढरं तूप की पिवळं तूप? वजन कमी करायचं तर काय खावं? करीनाच्या डाएटिशियन रुजुता दिवेकर सांगतात..

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी…

अनेकदा थंडीच्या दिवस शरीरात अधिक हिट असल्यास करपट ढेकर व जळजळ जाणवते यावर सोलकढी परिणामकारी ठरू शकते जेवणानंतर सोडायुक्त सॉफ्टड्रिंक्सपेक्षा सोलकढी एक उत्तमी, आरोग्यासाठी फायदेशीर पर्यायी मार्ग ठरू शकतो.

दरम्यान, इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब अशी की अति तिथे माती हा नियम आहारातही लागू होतो. त्यामुळे सोलकढी चमचमीत लागली म्हणून तिचे गरजेपेक्षा अधिक सेवनही करू नये अन्यथा सर्दी – खोकल्याचा त्रास उद्भवू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solkadhi health benefits helps to control diabetes cholesterol acidity digestion skin allergy svs