काहींना पावसाळा ॠतू आवडतो, तर काहींना नाही. वातावरणामधील बदलामुळे पावसाळ्यासोबत विषाणूजन्‍य व जीवाणूजन्‍य आजार देखील येतात. पण तुम्‍हाला माहित आहे का या ऋतूदरम्‍यान ‘डोळ्यांना’ देखील संसर्ग होतात? प्रत्‍येकाने आरोग्‍याबाबत कोणतीही चिंता न करता पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्‍यासाठी विशिष्‍ट काळजी घेणे गरजेचे आहे. कोविड-१९ पासून सुरक्षित राहण्‍यासाठी तोंड, नाक व हाताचे संरक्षण करण्‍याबाबत पुरेशा प्रमाणात जागरूकता निर्माण केली जात असताना अनेकांना त्‍यांच्‍या डोळ्यांचे संरक्षण करण्‍याबाबत माहित नसू शकते. यासाठीच पावसाळ्यात डोळ्यांची काळजी घेण गरजेचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्त्वपूर्ण व सुलभ खबरदारीचे उपाय:

  • स्‍वच्‍छता राखा. डोळ्यांसाठी आणि हात स्‍वच्‍छ करण्‍यासाठी वापरले जाणारे फेस टॉवेल्‍स, नॅपकिन्‍स, रूमाल, कोणताही कपडा नेहमी सोबत ठेवा. टॉवेल्‍स, चष्‍मे, कॉन्‍टॅक्‍ट लेन्‍सेस इत्‍यादी सारख्‍या वैयक्तिक वस्‍तू दुस-यांसोबत शेअर करू नका.
  • घरातून बाहेर पडत असताना सनग्‍लासेस किंवा चष्‍मा घाला. ते आपल्‍या डोळ्यांचे बाहेरील कण आणि विषाणू व जीवाणू सारख्‍या संसर्गजन्‍य घटकांपासून संरक्षण करतात.
  • डोळ्यांची खूप काळजी घ्‍या. दररोज थंड पाण्‍याने डोळे धुवा. झोपेतून उठल्‍यानंतर किंवा कॉन्‍टॅक्‍ट लेन्‍सेस काढल्‍यानंतर डोळे जोराने चोळू नका. यामुळे नेत्रपटलाचे (कॉर्निया) कायमस्‍वरूपी नुकसान होऊ शकते.
  • पावसाळ्यादरम्‍यान कॉन्‍टॅक्‍ट लेन्‍सेस न घालण्‍याचा प्रयत्‍न करा, कारण तसे केल्‍यास डोळ्यांमध्‍ये खूपच कोरडेपणा येऊ शकतो आणि डोळे लाल होणे व डोळ्यांमध्‍ये जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात. चष्‍म्‍यांना स्‍वच्‍छ व कोरडे ठेवा.
  • पाणी साचलेल्‍या भागांमध्‍ये जाणे टाळा, कारण अशा ठिकाणी विषाणू, जीवाणू व फंगस मोठ्या प्रमाणात असतात, ज्‍यामुळे त्‍यांचा सहजपणे संसर्ग होऊन तुम्‍ही आजारी पडू शकता.
  • कोणत्‍याही संसर्गाविरोधात लढण्‍यासाठी शरीर आरोग्‍यदायी ठेवण्‍यासोबत रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍याकरिता संतुलित व आरोग्‍यदायी आहार सेवन करा.

‘हे’ आजार होऊ शकतात

पावसाळ्यादरम्‍यान सामान्‍यपणे होणारे आजार त्रासदायक असण्‍यासोबत अत्‍यंत घातक देखील आहेत. पावसाळ्यात कॉन्‍जक्टिव्‍हीटीस (डोळे येणे), स्‍टाई, कॉर्नियल अल्‍सर असे आजार होऊ शकतात. दरवर्षी डोळ्यांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्‍या डोळ्यांच्‍या डॉक्‍टरांना रेटिनामधील रक्‍तवाहिन्‍यांचे आरोग्‍य व स्थितीचे निरीक्षण व तपासणी करण्‍यामध्‍ये मदत होते. या रक्‍तवाहिन्‍यांच्‍या आरोग्‍याचा संपूर्ण शरीरावर होणा-या परिणामांचे उत्तम अनुमान काढता येतात.

(हा लेख इंडस हेल्‍थ प्‍लसच्‍या प्रीव्‍हेन्टिव्‍ह हेल्‍थकेअर स्‍पेशालिस्‍ट श्रीमती. कांचन नायकवडी यांनी लिहिलेला आहे.)

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take care of your eyes in the rainy season learn simple solutions ttg
First published on: 11-08-2021 at 17:29 IST