आपल्याला सर्वांना आता हे व्यवस्थित लक्षात आलं आहे की, निरोगी जीवनशैलीसाठी आपल्याला संतुलित आहार, योग्य झोप आणि नियमित व्यायाम हे ३ घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु, संतुलित आहार किंवा योग्य आहार म्हणजे नेमकं काय? किंवा कोणकोणते पदार्थ, कसे आणि किती प्रमाणात आपल्या आहारात समाविष्ट करावेत? याबाबत अद्यापही अनेकांच्या मनात मोठा गोंधळ दिसतो. तो अगदीच साहजिक आहे. हा गोंधळ होऊ नये म्हणूनच आपल्याला विशिष्ट पदार्थाचं उदा. एखाद्या फळाचं, भाजीचं महत्त्व आणि फायदे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भाजीबद्दल माहिती देणार आहोत ती म्हणजे मटार.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मटार आपल्यापैकी अनेकांना निश्चित आवडत असतील. आपण अनेक पदार्थांमध्ये त्याचा सर्रास वापर करतच असतो. पण तुम्हाला या भाजीची वैशिष्टयं माहिती आहेत का? मटार हा प्रथिनांचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासह मटार हे झिंक, पोटॅशियम, विविध जीवनसत्त्वे आणि फायबरसह व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, के यांचा सर्वोत्तम स्रोत असतात.

‘ही’ पौष्टिक रत्नं

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि फिटनेस प्रेमी असलेल्या भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर ‘ट्यूजडे टिप्स’ या तिच्या एका सिरीजचा भाग म्हणून मटारची वैशिष्ट्यं सांगितली आहेत. मटार हे आपल्या डोळ्यांचं आरोग्य आणि प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी अत्यंत गुणकारी असतात. अभिनेत्री भाग्यश्री म्हणाली कि, “मटार ही अशी पौष्टिक रत्नं आहेत जी बहुतेक सगळ्या भारतीय खाद्यपदार्थांमध्ये कोणत्याही भाजीला आरोग्यदायी आणि पोषक घटकांनी समृद्ध करण्यासाठी वापरली जातात.”

मटार आरोग्यासाठी चांगले का?

मटार हे फायबरचा एक समृद्ध स्त्रोत आहेत. ते आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. बहुतेक फायबर ही विरघळणारी असल्याने ती बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करतात. फायबर ही मेटॅबॉलिझमसाठी देखील चांगली मानली जातात. मटारच्या सेवनाने टाइप २ मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यांपासून असलेली जोखीम कमी करण्यास देखील मदत होते.

मटार हे ब्लड शुगरमध्ये वाढ होऊ देत नाहीत. त्याचसोबत ते कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ म्हणून ओळखले जातात. ज्यामुळे, त्यांच्या सेवनानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. मटार हे मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अशा आवश्यक खनिजांचा स्रोत आहेत जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले मानले जातात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why peas should be part of your diet know amazing benefits gst