कोणताही शोध लावताना किंवा नवनिर्मितीचा सर्जनाविष्कार होताना त्याला चिंतनाची, मनन करण्याची, चौकटीबाहेरचा विचार करण्याची आवश्यकता असते. मनाचे, मेंदूचे आकाश मोकळे ठेवून नव्या विचारांना साद घातल्यास प्रतिसाद निश्चित मिळतोच. त्यासाठी गरज आहे थोडासा ‘अवकाश’ घेण्याची. परंतु आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात सतत आपण कशाच्या न कशाच्या तरी मागे धावत असतो, त्याबरोबरच सतत व्यस्त व त्रस्त असल्यामुळे नवे विचार, कल्पना म्हणाव्या तशा रुजताना व फुलताना दिसत नाहीत. दैनंदिन कामातून वेळ मिळतो तेव्हा बराचसा वेळ हा टी.व्ही. सीरिअल्स, Social Networking Sites, मोबाइल गेम्स यांमध्ये व्यतीत होतो. फावला वेळ म्हणजे कुठे तरी पार्टी करणे, मौजमजा करणे, टाइमपास करणे असाच सर्रास घेतला जातो.
आजच्या युगात माणूस विचारांवर ‘मंथन’ करण्याची सवय विसरून गेला आहे. विचारांवर मंथन करणे ही सर्जनशीलतेची प्राथमिक पायरी आहे. व्यावहारिक जीवनातील कितीतरी समस्या सोडवण्यासाठी एक सशक्त विचारच महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
आपण रिकाम्या वेळेचे नियोजनच केले नसल्यामुळे रिकामा वेळ मिळाला की काय करावे हेच समजत नाही. मग नकळत हातात टी.व्ही.चा रिमोट येतो किंवा मोबाइल-मधील अस्र्स्र्२ ओपन केले जातात.
स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘दिवसभरात तुम्हाला जे एकांताचे क्षण मिळतात ते तुम्ही कसे घालवता यावर त्या दिवसाचे यशापयश अवलंबून असते.’ सर्जनशील विचारांच्या निर्मितीसाठी मनाची शांत व ताणरहित अवस्था महत्त्वाची असते. आज आपली दिनचर्या इतकी यंत्रवत झाली आहे की साधारणत: दैनंदिन गोष्टींपेक्षा एखादी नवीन गोष्ट करायची म्हटलं की थोडासा निरुत्साहच दिसतो; कशी तरी ती गोष्ट स्वीकारली जाते. अर्थात कोणतीही गोष्ट करताना पूर्णपणे आपण त्यात समरस होणार नसू तर त्यातून होणारा आनंदही सीमितच असेल. यंत्राप्रमाणे व एकाच चाकोरीत काम केल्याने ‘स्व’चा आवाज व ‘मनाची हाक’ ऐकण्यास ‘अवकाश’ मिळत नाही.
तेव्हा नव्या कल्पनांची व विचारांची साद ऐकण्यासाठी दिवसभरातून थोडासा वेळ आपण ‘स्वत:ला’ देऊ या. या वेळेत आपली सोबत फक्त आपल्याशी असेल. मनाला वर्तमानात ठेवून आपल्या अंतर्मनातून आलेली साद व तिला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यातून जीवनाचे कितीतरी पलू समृद्ध होऊ शकतात. नव्या-नव्या आयामांनी प्रत्येक गोष्टीकडे पाहता येते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विशाल होतो, आपण किती छोटय़ा-छोटय़ा गोष्टींना, समस्यांना नको तेवढे मोठे केले हे समजते. नवे विचार माणसाला भाररहित करतात, उल्हसित करतात, जगण्याची नवी उमेद देतात. एवढेच नव्हे, तर चिंतनामुळे स्वत:ला ओळखण्याची एक संधी मिळते व जगणं समृद्ध होतं. एक मात्र गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ती म्हणजे एखादी घटना, परिस्थिती, व्यक्ती, नवा विचार यांच्याकडे पाहताना जुन्या चाकोरीतून किंवा पूर्वग्रहातून न पाहता पूर्णपणे नव्या अंगाने पाहणे आवश्यक आहे.
चला तर मग, दिवसभरातून स्वत:साठी असा ‘अवकाश’ अर्थात चिंतनाचा ब्रेक घेण्याचा निश्चय करू या!!
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2014 रोजी प्रकाशित
सर्जनशील विचारांना साद!!!!
माझा तिरस्कार, धिक्कार, आणि माझ्यावर अविश्वास दाखविणाऱ्या नजरा माझा नेहमीच पाठलाग करत असतात. कारणपरत्वे त्या परत दिसताच मला अस्वस्थ करून सोडतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-07-2014 at 01:17 IST
मराठीतील सर्व ब्लॉगर्स कॉर्नर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bloggers katta