विश्वचषकाच्या या आठवडय़ाची सुरुवात झाली ती इंग्लंड विरुद्ध स्कॉटलॅण्ड या सामन्याने. या सामन्यात इंग्लंडने ११९ धावांनी विजय मिळवला. पहिले दोन सामने गमावलेल्या इंग्लंडला विश्वचषकात आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. स्कॉटलॅण्डकडे अनुभवाची कमतरता असल्याचे या सामन्यातून दिसून आले.
या आठवडय़ाचे आकर्षण ठरले ते म्हणजे ख्रिस गेलची द्विशतकीय खेळी. सामना होता वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे. अतिशय खराब फॉर्ममध्ये असलेल्या ख्रिस गेलने षटकारांचा वर्षांव करीत २२५ धावांची अप्रतिम खेळी केली. द्विशतक झळकावणारा तो जगातील चौथा, तर भारतीय नसलेला पहिला फलंदाज ठरला. याआधी सचिन तेंडुलकर (२०० नाबाद), सेहवाग (२१७), रोहित शर्मा (२०९ व २६४ नाबाद) या भारतीय खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे. गेलने १६ षटकार मारीत रोहित शर्मा व शेन वॉटसन यांच्या एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
यानंतरचा सामना रंगला तो आर्यलड विरुद्ध यूएई या संघांमध्ये. या सामन्यातून प्रेक्षकांच्या काही अपेक्षा नव्हत्या; परंतु हा सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत गेला. २७८ धावांचा पाठलाग करताना आर्यलडची मधली फळी गडबडली, पण केविन ओब्रायनच्या २५ चेंडूंत ५० धावांच्या मदतीने त्यांनी हा सामना जिंकला. यानंतरचा सामनाही दोन सहकारी राष्ट्रांच्या म्हणजेच स्कॉटलॅण्ड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये झाला. २११ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तान ७ बाद ९७ अशा परिस्थितीत होता, परंतु शमीउल्ला शेनवारी याने खालच्या फळीतील फलंदाजांना हाताशी धरून ९६ धावांची एक झुंजार खेळी केली व त्याच्या संघास फक्त १ गडी राखून विजय मिळवून दिला. हा त्यांचा विश्वचषकातील पहिला विजय आहे.
याच दिवशी मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंका व बांगलादेश हे दोन आशियातील संघ आमनेसामने होते. या सामन्याचे वैशिष्टय़ ठरले ते म्हणजे दिलशान व संगकारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी रचलेली २१० धावांची नाबाद भागीदारी. संगकारा या सामन्यात आपला वैयक्तिक ४०० वा एक दिवसीय सामना खेळत होता. त्यानेही चाहत्यांना खूश करीत ७३ चेंडूंत शतक ठोकले. त्याच्यासोबत खेळताना दिलशानने १६१ धावांची खेळी केली व एक अनोखा विक्रम नावावर केला. त्याने या खेळीत एकही षटकार लगावला नाही. त्यामुळे षटकाराशिवाय केलेली सर्वात जास्त धावांची ही खेळी आहे.
सामना क्रमांक १९. दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज. याआधीच्या सामन्यात ख्रिस गेलने द्विशतक झळकावले होते व त्यांचे फलंदाजही चांगल्या फॉर्मात होते. भारतासोबत दक्षिण आफ्रिकेला मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्यावरही बराच दबाव होता प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजसोबतच्या सामन्यात सुस्थितीत होता. जेव्हा डिव्हिलिअर्स मैदानात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा तिसाव्या षटकात ३ बाद १४६ धावा अशी स्थिती होती. यानंतर त्याने अशी काही फलंदाजी केली की, ज्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचे तोंडचे पाणीच पळले! अप्रतिम! जणू काही त्याला दाखवून द्यायचे होते की क्रिकेटमधील दादा कोण ते. त्याने असाच काही पराक्रम काही दिवसांपूर्वी केला होता. तेव्हा त्याने ४४ चेंडूंत १४९ धावा केल्या होत्या व सर्वात जलद म्हणजे ३१ चेंडूंत शतक झळकावले होते. व या सामन्यात त्याने ६६ चेंडूंत १६२ नाबाद धावा केल्या. या खेळीच्या मदतीने त्याने संघाची धावसंख्या ४०८ वर पोहोचवली. या सामन्यात बरेच विक्रम मोडले गेले. त्याने होल्डरची अशी शाळा घेतली की त्याने नवा विक्रम तयार केला, तो म्हणजे सलग २ षटकांत ६४ धावा लुटल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीच्या दृष्टीने बघायचे झाले तर इम्रान ताहीरने ५ बळी घेतले व आफ्रिकेसाठी विश्वचषकात ५ बळी घेणारा तो प्रथमच. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकासाठीची आपली दावेदारी ठोस केली आहे.
यानंतरचा सामना रंगला तो विश्वचषक आयोजित करणाऱ्या दोन बलाढय़ संघांमध्ये, म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया चांगल्या स्थितीत होता. या वेळी गोलंदाजी करीत होता जगातील सर्वोत्कृष्ट डावखुरा फिरकीपटू व्हिटोरी. धावफलक होते तेराव्या षटकांत १ बाद ८० धावा, त्याने शेन वॉटसन व अप्रतिम फॉर्मात असलेल्या स्टिव्हन स्मिथला बाद केले. यानंतर न्यूझीलंडचा संघ मॉचमध्ये परत आला. त्यानंतर बघायला मिळाला अजून एका गोलंदाजाचा अविस्मरणीय झेल. त्याने ३ षटकांत २ निर्धाव षटके व फक्त १ धाव देत चक्क ५ बळी पटकावले. अचानक २ बाद ८० वरून ९ बाद १०६ धावा या स्थितीत ऑस्ट्रेलियाला नेऊन ठेवले. अखेर हॅडिनच्या ४३ धावांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर १५२ धावांचे आव्हान ठेवले.
हे आव्हान स्वीकारीत मेक्कुलमने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा मुख्यत्वे जॉन्सनचा चोप काढत फक्त २४ चेंडूंत ५० धावा ठोकल्या. जेव्हा तो बाद झाला तेव्हा न्यूझीलंड ७.४ षटकांत २ बाद ७८ धावा या स्थितीत होता व त्यांचा विजय फक्त औपचारिक वाटत होता. परंतु बोलतात ना, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि पुढे असे काही घडेल याचा विचारही कोणी केला नसेल. ऑस्ट्रेलिया त्यांच्या झुंजार वृत्तीसाठी ओळखले जातात आणि त्यांनी तसेच काही केले. त्यांनी सामना सोडला नव्हता, क्लार्कने त्याच्या मुख्य गोलंदाजांना परत गोलंदाजीसाठी बोलावले. विल्यम्सन एका बाजूस गड सांभाळत होता, परंतु स्टार्कने अप्रतिम गोलंदाजी करीत दुसऱ्या बाजूने न्यूझीलंडच्या फलंदाजीमध्ये भले मोठे भगदाड पाडले होते. त्याने ९ षटकांत २८ धावा देत ६ गडी बाद केले होते. त्याने त्याच्या ९ व्या षटकांत सलग दोन चेंडूंत २ गडी बाद केले व अजूनही न्यूझीलंडला ६ धावांची गरज होती. परंतु त्या षटकांत अजून एक गडी बाद करता आला नाही व दुसऱ्या बाजूस विल्यम्सन त्याच्या संधीची वाट बघत होता. त्याने पहिल्याच चेंडूत सरळ षटकार लगावला, गोलंदाज होता मार्श. अशा रीतीने न्यूझीलंड हा सामना १ गडी राखून जिंकला. हा सामना ज्या पद्धतीने खेळला गेला ते वाखाणण्याजोगे होते. न्यूझीलंडने आपला विजयरथ पुढे सरसावला आहे व विश्वचषक जिंकण्यासाठी जो दारूगोळा व आत्मबळ लागते ते सर्व या संघामध्ये आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
दुसऱ्या बाजूस बलाढय़ भारताचा सामना होता यूएईसोबत. यूएईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीऐवजी फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय किती चुकीचा होता हे भारतीय गोलंदाजांनी दाखवून दिले. दुखापतीमुळे भारताचा मुख्य गोलंदाज मोहम्मद शमी आज बाहेर होता, त्याऐवजी धोनीने भुवनेश्वर कुमारला निवडले. त्यानेही आपण सामना खेळण्यास तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले. ऑस्ट्रेलियासोबतच्या शेवटच्या कसोटीत तो पूर्णत: फिट नसतानाही त्याला खेळवले होते. परंतु आज तो फिट दिसत होता. त्याने व उमेश यादवने चांगली गोलंदाजी करीत यूएईचे पहिले २ फलंदाज तंबूत पाठवले. त्यानंतर लगेचच धोनीने अश्विनला गोलंदाजीसाठी बोलावले. भारताबाहेर तितकासा प्रभावी नसणाऱ्या अश्विनने आज अतिशय भेदक गोलंदाजी करून ४ गडी बाद केले व आपण दिलेली कामगिरी पार पाडण्यास समर्थ आहोत हे दाखवून दिले. याआधीच्या सामन्यातही त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ गडी बाद केले होते. अश्विन आणि जाडेजा भागीदारीत चांगली गोलंदाजी या विश्वचषकात करीत आहेत, ही भारतासाठी एक महत्त्वाची बाब आहे. भारतानेचे यूएईला अवघ्या १०८ धावांत गुंडाळल्यानंतर फलंदाजी करताना शिखर धवन लवकर बाद झाला; परंतु रोहित शर्माच्या नाबाद ५७ धावांच्या मदतीने भारताने हा सामना ९ गडी राखून जिंकला.
न्यूझीलंडसोबत गमावलेल्या सामन्यानंतर सलग ३ सामन्यांत विजय मिळवून श्रीलंकेने परतीचे संकेत दिले आहेत. आणि इंग्लंड जवळपास या विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेरच गेला आहे. यापुढचे दोन्ही सामने इंग्लंडला मोठय़ा फरकाने जिंकणे अनिवार्य आहे.
नुकत्याच झालेल्या सामन्यात इंग्लंड आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने होते. यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना जो रूटच्या १२१ धावांच्या मदतीने ३१० धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडची गोलंदाजी बघता ही धावसंख्या श्रीलंकेसाठी अवघडच होती.
सलामीवीर थिरिमने आणि संगकाराने वैयक्तिक शतके ठोकली आणि श्रीलंकेने हा सामना अगदी सहज खिशात टाकला. या वेळी थिरिमने आणि दिलशान यांनी सलामीसाठी १०० धावांची भागीदारी केली. सामन्याअखेर थिरिमने नाबाद १३९, तर संगकाराने नाबाद ११७ धावा केल्या.
तसेच ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेचा फक्त २० धावांनी पराभव केला. हा सामना पाकिस्तानसाठी अटीतटीचा होता. हा सामना गमावला असता तर पाकिस्तानला उपउपान्त्य फेरीत जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले असते. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करीत एका अवघड खेळपट्टीवर सात बाद २३५ धावा उभारल्या. त्यांची सुरुवात नेहमीप्रमाणे खराबच झाली; परंतु त्यांचा कर्णधार मिसबाह उल हक याने वहाब रियाजसोबत अत्यंत महत्त्वाची भागीदारी केली. त्याच्या या संयमी खेळीमुळेच पाकिस्तान एवढय़ा धावा उभारू शकला. तसेच त्यांचा गोलंदाज वहाब रियाज याने केलेली नाबाद ५४ धावांची खेळीही तितकीच महत्त्वाची होती.
पाकिस्तानप्रमाणेच झिम्बाब्वेची सुरुवातही खराबच झाली; परंतु त्यांचा माजी कर्णधार टेलरने विल्यम्ससोबत ७२ धावांची भागीदारी केली. त्या वेळी असे वाटत होते की, झिम्बाब्वे हा सामना जिंकू शकतो. परंतु ते दोघेही एकापाठोपाठ एक बाद झाले आणि त्यांच्या हातून सामना निसटला. त्यांचा सध्याचा कर्णधार चिंगुबारायानेही प्रयत्न केले, पण त्याची साथ द्यायला कोणीच उरले नव्हते. अखेर हा सामना पाकिस्तानच्या पदरी पडला.
पाकिस्तानचा या विश्वचषकातील हा पहिलाच विजय असून यापुढचे सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे. तसेच त्यांचा एक सामना बलाढय़ दक्षिण आफ्रिकेसोबत ७ मार्चला आहे. हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सध्याचा फॉर्म बघता पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी त्यांचा सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.
तसेच मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा संघ आर्यलडशी भिडणार आहे. आर्यलडचा संघ हा सर्व सहकारी संघांच्या तुलनेत उजवाच ठरला असून या सामन्यात त्यांची खरी कसोटी असणार आहे. आत्तापर्यंतचे सर्व सामने त्यांनी चांगल्या प्रकारे जिंकले आहेत. त्यामुळे आयरिश समर्थक मोठय़ा संख्येने या सामन्यात हजेरी लावतील आणि त्यांच्या संघाचे मनोबळ उंचावतील.
अजून एक सामना म्हणजे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज. हा सामना ६ मार्चला रंगणार आहे. वेस्ट इंडिजसाठी हा सामना जिंकून उपउपान्त्य फेरीच्या एक पाऊल जवळ जायची संधी आहे, तर याउलट भारत आपला विजयरथ पुढे सरसावण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल. ऐन धूलिवंदनाच्या दिवशीचा हा सामना जिंकून भारत आपल्या चाहत्यांना रंग उधळण्याची संधी देईल अशी आशा आहे. तसेच भारतीय समर्थक ऑस्ट्रेलियातसुद्धा रंगपंचमी साजरी करायला मिळावी या तयारीत असतील. ख्रिस गेलला अचानक गवसलेला फॉर्म पाहता धोनी काय रणनीती आखतो हे बघण्यासारखे असेल.
सुलक्षण कुलकर्णी
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2015 रोजी प्रकाशित
वेध विश्वचषकाचा : जय-पराजयाचा खेळ रंगला
विश्वचषकाचे सामने सुरू होऊन आता पंधरा दिवस उलटले आहेत. अनिश्चिततेचा खेळ मानल्या जाणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये अपेक्षा-अनपेक्षितता, आशा-निराशा या भावभावनांचे वेगवेगळे रंग...

First published on: 06-03-2015 at 01:32 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket world cup