मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याला इतर माणसांची सोबत आवश्यक असते. तो इतर माणसांवर अवलंबून असतो व एकमेकांस मदत करत समाजजीवन जगत असतो. त्याचप्रमाणे मनुष्याने निर्माण केलेल्या विविध कला या एकमेकांस पूरक आहेत. प्रत्येक कलेला एक स्वतंत्र कला म्हणून दर्जा प्राप्त झालेला असला तरी या कला एकमेकांवर अवलंबून आहेत आणि इतर कलांच्या साहाय्याने प्रत्येक कला समृद्ध होण्यात निश्चितच मदत झाली आहे. नृत्यकला, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, गायन, वादन इ. ६४ कला आणि १४ विद्यांचे माहेरघर म्हणून भारत देशाचे नाव सर्वश्रुत आहे. त्यापैकी अगदी पुरातन काळापासून नृत्यकला व शिल्पकला यांचा घनिष्ठ संबंध दिसून येतो. हा विषय तसा फार मोठा आणि अभ्यासपूर्ण मांडणी करण्याचा असला तरी या लेखातून नृत्य व शिल्पकलेच्या विविध पैलूंवर नजर टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.
भरतमुनीने ‘नाटय़शास्त्र’मध्ये नृत्यातील अत्यंत मूळ आणि महत्त्वाच्या ‘करणां’विषयी चर्चा केली आहे. ‘हस्तपाद समायोगो नृत्तस्य करणं भवेत्’ म्हणजेच हातापायांच्या सौंदर्यपूर्ण हालचालींमुळे ‘करण’ बनले जातात. अशा १०८ करणांची नावे, शारीरिक कृती, उपयोग याचे समालोचन नाटय़शास्त्रात दिसून येते. ‘करण’ ही केवळ एक शारीरिक स्थिती नसून ती एक अखंड क्रिया आहे. विशिष्ट अवस्थेत हस्तक, पदन्यास, अंगाची ठेवण करण्याने ‘करण’ साध्य होतात. सुप्रसिद्ध भरतनाटय़म् नर्तिका व संशोधक डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम यांनी त्यांच्या पीएच.डी.साठी ‘भारतीय नृत्यकला व शिल्पकलेमधील करण’ हा विषय शोधप्रबंधासाठी घेतला होता. डॉ. टी. एन. रामचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या गोष्टीचा सखोल अभ्यास केला व जनसामान्यांपर्यंत आणि नृत्य विद्यार्थिनींपर्यंत ‘करणांविषयी’ अभ्यासपूर्ण माहिती पोहोचवण्याचे मोठे कार्य केले. तामिळनाडू येथील चिदंबरममधील थिलाई नटराज मंदिरात ४ मुख्य प्रवेशद्वारांवर हे १०८ ‘करण’ अत्यंत कुशल कलाकारांनी कोरले आहेत. असे शिल्पकलेतील प्रमुख संदर्भ व पुरावे वापरून डॉ. पद्मा यांनी शिल्पकला व नृत्यकलेतील अविभाज्य साधम्र्य, परस्परावलंबी आविष्कार यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवला. ‘करण प्रकारम्’ या सी.डी.मध्ये त्यांनी नाटय़शास्त्राच्या आधारावर रचल्या गेलेल्या या शिल्पकलेच्या साहाय्याने नृत्यकलेतील ‘करणांचे’ महत्त्व व त्यांचे मूळ रूप दृक्-श्राव्य स्वरूपात मांडले आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी इ. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तमिळनाडूमधील तंजावूर येथील बृहदिश्वर मंदिरात ११व्या शतकात चोल्ल राजा ‘राजराजा’ याच्या कारकीर्दीत १००० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन ‘नाटय़शास्त्र’च्या जतनासाठी त्यातील ‘करणं’ मंदिरावर शिल्परूपात कोरले जावे, अशी
भारुतच्या स्तूपावरील मूर्तीपासून ते थेट १५व्या शतकातील राणकपूरच्या मंदिरावरील नृत्यमूर्तीपर्यंत सर्वत्र नायिका-भेदाच्या असंख्य शिल्पाकृतींनी विविध वास्तूंना नटवले आहे. मंदिरावरील या मूर्तीना सामान्यत: सुरसुंदरी अर्थात देवांगना म्हणून ओळखले जाते आणि नृत्याप्रमाणेच शिल्पामध्येही या नायिका नर्तनाच्या लोकधर्मी तसेच नाटय़धर्मी पद्धतीने अभिव्यक्त होताना दिसतात.’ अशा अनेक उदाहरणांतून रोशनताईंनी शिल्पकला व उत्तर भारतातील कथक कला यांचा निकटचा संबंध यावर समर्पक भाष्य केले आहे.
भारतात ताम्रपाषाण काळापासून म्हणजे सुमारे पाच सहस्र वर्षांपासून नृत्यमूर्ती उपलब्ध आहेत. ‘हडप्पा येथील पाच नर्तकांचा शिरोहीन पुतळा व मोहेनजोदडो येथील नर्तिकेची धातूतील प्रतिमा’ हे अतिप्राचीन काळातील नृत्यमूर्तीचे दाखले देतात. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील उदगिरी व खंडगिरी लेणींमधील मूर्त्यां ओडिसी नृत्याशी असलेला प्राचीन संबंध दर्शवितात. ओरिसातील असंख्य मंदिरांवर नृत्य करणाऱ्या स्त्रियांच्या विविध पोजेस पाहायला मिळतात. ब्रrोश्वर, मेघेश्वर, मुक्तेश्वर, राजाराम, लिंगराज आणि कोणार्क येथील सूर्यमंदिर, या सर्व मंदिरांमध्ये नृत्य करण्यासाठी खास अशा ‘नाट मंदिराची’देखील रचना पाहावयास मिळते. प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे यांनी एका लेखात म्हटले आहे की, ‘‘ओडिसीमधील ‘त्रिभंग’ (मान, कंबर व पायांच्या साहाय्याने केलेला त्रिमितीय आकृतिबंध) ओरिसातल्या मंदिरांच्या शिल्पात सतत पाहायला मिळतो. ओडिसीचा चौक म्हणजे पुरीच्या मंदिरातला जगन्नाथ म्हणजेच कृष्ण. ‘दर्पणी’ हातातल्या आरशात बघणारी स्त्री, ‘मर्दळा’ पखवाज वाजवणारी स्त्री, ‘शालभंजिका’ – झाडाच्या फांदीला धरून प्रियकराची वाट बघणारी नायिका अशी अनेक शिल्पे मंदिरात दिसतात व त्याचेच प्रतिबिंब नृत्यात पाहावयास मिळते.’’
नृत्यकला आणि शिल्पकला यातील घनिष्ठ संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल तरी जितके या विषयाचा अभ्यास करू तितकी त्याची व्याप्ती आणि खोली वाढतच जाते, याचा वेळोवेळी प्रत्यय येतो!
तेजाली कुंटे
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2015 रोजी प्रकाशित
नृत्य आणि शिल्पकला
विविध प्राचीन संदर्भ तसंच देवळांमधील शिल्पकला पाहिली तर नृत्य आणि शिल्पकला याचा एकमेकांशी निकटचा संबंध आहे असं लक्षात येतं. या दोन्ही कला एकमेकींना पूरकच ठरल्या आहेत.
First published on: 03-04-2015 at 01:06 IST
मराठीतील सर्व नाचू आनंदे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dance and sculpture art