ऑलिम्पिक विशेष
ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com
पुढील १७ दिवस संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष टोक्योकडे खेचले जाईल. पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे बिगुल शुक्रवारी वाजेल. मात्र एक वर्ष आधीच विलंबाने खेळवण्यात येणाऱ्या यंदाच्या ऑलिम्पिकवरील करोनाचे सावट अद्यापही कायम आहे. त्या पाश्र्वभूमीवर ऑलिम्पिक आयोजनाच्या मार्गात आतापर्यंत आलेल्या विविध अडथळ्यांचा आढावा-

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नियोजनाप्रमाणे गतवर्षी २४ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र गेल्या वर्षी करोना साथीने सगळीकडे धुमाकूळ घातला. ‘आयसीसी’ ट्वेन्टी-२० विश्वचषक, युरो चषक फुटबॉल, विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस यांसारख्या विविध क्रीडाप्रकारांच्या प्रतिष्ठित स्पर्धा करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात अथवा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसमोर (आयओसी) ऑलिम्पिक पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. आता या घटनेला वर्ष उलटले. करोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. जपानसह विश्वभरातील करोनारुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. तरी यातून मार्ग काढून जैव-सुरक्षित वातावरणात ऑलिम्पिक खेळवण्यात येणार आहे. असंख्य नागरिकांचा अजूनही या स्पर्धेच्या आयोजनाला विरोध असून त्यांच्याकडून निदर्शनेही सुरूच आहेत. परंतु ‘आयओसी’चे अध्यक्ष आणि जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी सुरक्षित ऑलिम्पिकच्या आयोजनाची हमी दिली आहे. ऑलिम्पिकनगरीत दहा हजाराहून अधिक खेळाडू आणि अन्य सहकारी वास्तव्यास असून यंदा प्रथमच प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे.

यापूर्वी, १९१६मध्ये पहिल्या महायुद्धाच्या कारणास्तव ऑलिम्पिक पहिल्यांदाच पूर्णपणे रद्द करण्यात आले होते. जर्मनीतील बर्लिन शहरात त्यावेळी ऑलिम्पिक होणार होते. परंतु १९१४ मध्ये सुरू झालेले महायुद्ध त्यावेळीही सुरूच राहिल्याने अनेक युरोपियन देशांनी स्पर्धेतून माघार घेतली. अखेर ऑलिम्पिक रद्द करण्यावाचून पर्याय उरला नाही. १९२० मध्ये बेल्जियमला पुढील ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले. यावेळीच भारताने प्रथमच आपला चमू ऑलिम्पिकसाठी पाठवला. १९००च्या ऑलिम्पिकमध्ये फक्त नोर्मन प्रिचर्ड या एकमेव खेळाडूने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यापुढील तीन ऑलिम्पिकसाठी भारताचा एकही खेळाडू पात्र ठरला नाही.

त्यानंतर १९४० आणि १९४४ या दोन्ही वर्षांतील ऑलिम्पिक स्पर्धा दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द करावी लागली. योगायोग म्हणजे १९४० चे ऑलिम्पिक टोक्योमध्येच आयोजित करण्यात येणार होते. परंतु जपानने यासाठी नकार दर्शवल्यानंतर फिनलंडला यजमानपद बहाल करण्यात आले. तरीही स्पर्धेचे आयोजन अशक्य असल्याने नाइलाजास्तव ऑलिम्पिक रद्द झाले. मग थेट १९४८ मध्ये लंडन येथे ऑलिम्पिकचे पुनरागमन झाले. गेल्या १२५ वर्षांच्या इतिहासात काही देशांनी आपापसांतील मतभेदांमुळे ऑलिम्पिकमधून माघार घेतली, तर काहींनी वर्णभेदामुळे स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळेही काही देशांना ऑलिम्पिकला मुकावे लागले. महायुद्ध वगळता ऑलिम्पिक रद्द करण्याची वेळ कधीच ओढावली नाही.

२०२० मध्ये प्रथमच ऑलिम्पिक वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आले. असंख्य अडथळ्यांवर मात करत आता ऑलिम्पिकच्या स्पर्धा होत आहेत. जवळपास दोनशेहून अधिक देशांतील खेळाडू ३३ क्रीडाप्रकारांत आपले नशीब आजमावणार असून यामध्ये कोण यशस्वी होणार, हे जाणून घेण्यासाठी पुढील तीन आठवडे सर्व क्रीडा चाहते आवर्जून ऑलिम्पिक पाहतील.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of olympics were postponed or cancelled corona tokyo olympics coverstory dd