भारतीय परंपरेमध्ये विष्णूच्या वामनावताराची एक दंतकथा सांगितली जाते. त्याने दोनच पावलांमध्ये आकाश-पाताळ पादाक्रांत केले, असा संदर्भ त्यामध्ये आहे. आता आधुनिक युगातील दंतकथा बहुधा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या नावे लिहिली जाईल. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासा व युरोपिअन अंतराळ संशोधन संस्था असलेल्या इसाच्या तुलनेत इस्रोचा आर्थिक ताळेबंद हा फारच किरकोळ आहे. या इस्रोरूपी वामनाने चांद्रयान एक या मोहिमेनंतर टाकलेली पावले ही जगासाठी थक्क करणारीच होती. एक एक करत छोटे उपग्रह अंतराळात सोडून भूस्थिर कक्षेत नेऊन ते स्थिरावणे ही तर आता नित्यनेमाची गोष्ट झाली आहे. त्यामुळे अनेक विकसित देशांनीही कमी किमतीतील उत्तम व्यवस्था म्हणून त्यांचा मोहरा आपल्याकडे वळवला आहे. पोलार सॅटेलाइट लाँच व्हेइकल म्हणजेच पीएसएलव्ही हे तंत्रज्ञानही इस्रोचे खात्रीशीर तंत्रज्ञान ठरले आहे. पण या पीएसएलव्हीच्या क्षमतांना मर्यादा आहे. अधिक वजनाचे उपग्रह भूस्थिर कक्षेत नेऊन सोडणे त्यांना शक्य नाही. हेच लक्षात घेऊन इस्रोने जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेइकलची निर्मिती करण्याचा प्रकल्प २००० साली हाती घेतला. यंदाच्या वर्षी अलीकडेच १८ डिसेंबर रोजी या प्रकल्पातील जीएसएलव्ही मार्कथ्रीचे उड्डाण आणि चाचणी यशस्वी पार पडली आणि इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. मंगळयानाच्या यशस्वितेनंतर इस्रोचे हे अवकाशातील वामन पाऊल तसे अपेक्षितच होते. असे असले तरी त्याची यशस्विता अनेक अर्थानी अनन्यसाधारण आणि महत्त्वाची आहे.
ज्या वेळेस कमीतकमी वेळात अधिक पल्ला गाठायचा असतो त्या वेळेस केवळ एकच एक लक्ष्य ठेवून चालत नाही; तर त्यासाठी बहुलक्ष्यी असावे लागते. एकाच वेळेस अनेक कामे आणि उद्दिष्टे नजरेसमोर ठेवावी लागतात व प्रत्येकाचे काम उद्दिष्टांनुसार नेमके लक्ष केंद्रित असावे लागते. शिवाय एक टीम म्हणून सर्वाचे एक सामायिक लक्ष्यही असावे लागते, तरच मोठी कामे करणे किंवा मोठी उद्दिष्टे गाठणे प्रयत्नपूर्वक शक्य होते. हे सारे इस्रोने ठरवल्यानुसार घडवून आणले आणि त्यात त्यांना यश आले हे महत्त्वाचे.
म्हणजे एक गट चांद्रयान एकवर काम करत होता, त्याच वेळेस चांद्रयान दोनच्या डिझाइनचे काम पूर्णत्वास आले होते. त्याच वेळेस तिसरीकडे मानवी अंतराळ प्रवासासाठीची कॅप्सूल अर्थात अंतराळकुपी तयार करण्याचे आणि त्याच्या चाचण्या घेण्याचे काम सुरू होते. चांद्रयान एकच्या यशस्वी झेपावण्यानंतर काहीच दिवसांत ही कुपी अंतराळात पाठवून पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात यशस्वीरीत्या परत मिळवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. चौथी बाजू म्हणजे भारतीयांना अंतराळात पाठवायचे असेल तर त्यासाठीची तयारी म्हणून अनेक गोष्टी तयार केल्या जात आहेत, त्यात अंतराळवीरांच्या प्रशिक्षणक्रमाचाही समावेश आहे. म्हणजेच एका बाजूस त्यांना अंतराळात धाडणारी सुरक्षित यंत्रणा असलेले जीएसएलव्ही, अंतराळवीरांचा प्रशिक्षणक्रम आणि जीएसएलव्हीमधील क्रायोजेनिक इंधनापासून ते त्याच्या सुरक्षिततेपर्यंतच्या बारीकसारीक बाबी विकसित केल्या जात आहेत. केवळ एवढेच नव्हे, तर पलीकडच्या बाजूला सूर्याच्या दिशेने झेपावणाऱ्या आदित्य या मोहिमेची तयारीही सुरू आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सारे सुरू आहे ते जगभरातील सर्वात कमी खर्चामध्ये. याचे आश्चर्य तर नासा व इसामधील अंतराळ संशोधकांनाही आहे. पण आपण भारतीय असल्यानेच ते आपल्याला शक्य आहे. कारण आपल्याकडे त्यासाठी लागणारा सर्वोत्तम मेंदूही आहे आणि आपल्याकडील श्रममूल्यही कमी आहे. श्रममूल्य कमी असणे ही काही चांगली बाब नाही. पण त्याचा फायदा मात्र या अशा मोहिमांना कमीतकमी खर्चात आकार देण्याच्या निमित्ताने होतो आहे, हे मात्र वास्तव आहे.
इस्रोचा हा आकार जरी वामनासारखा लहानसा असला तरी त्यांचा आवाका मात्र त्यांनी अवकाशव्यापीच ठेवला आहे, त्यासाठी आपण सर्वानीच ऋणी असायला हवे ते डॉ. विक्रम साराभाई यांचे. कारण सध्या सुरू असलेल्या अंतराळ विकास कार्यक्रमाची पायाभरणी ही या महान वैज्ञानिकाने केली होती. त्यांच्या संदर्भातील एक किस्सा हा वैज्ञानिकांनी आणि समस्त भारतीयांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे. इस्रोच्या जागी पायाभरणीचा कार्यक्रम होता. त्यासाठी डॉ. साराभाई आले होते. तिथे इस्रोच्या बांधकामासाठी कष्टकरी कामगार म्हणून आलेल्या एका अतिसामान्य महिलेला डॉ. साराभाई यांनी सोबत घेतले आणि पायाभरणी करून तिच्याच सोबत वृक्षारोपणही केले. खरेतर डॉ. साराभाई यांच्या पायाजवळही उभे राहण्याची योग्यता नसलेल्या त्या सामान्य महिलेला डॉ. साराभाई यांनी हा बहुमान का द्यावा, याचे कोडे सर्वच उपस्थित वैज्ञानिकांच्या डोक्यात होते. त्याची उकल डॉ. साराभाई यांनी आपल्या भाषणात केली. ते म्हणाले, आपण वैज्ञानिक म्हणून जे काही करणार आहोत, ते सारे या देशातील सामान्य भारतीयाशी निगडित असणार आहे. आपल्या संशोधनातून या सामान्य भारतीयांचे जीवन अधिक सुखकर होणार आहे, याचे भान काम करत असताना सातत्याने ठेवा, ते खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे तुमचे लक्ष ढळणार नाही. ज्या सामान्यांसाठी आपण हे सारे करणार त्यांची प्रतिनिधी म्हणून मी या बांधकामावर आलेल्या महिलेला सोबत घेऊन पायाभरणी केली. वैज्ञानिक आणि सामान्य भारतीय यांनी अशा प्रकारे नेहमीच एकत्र राहण्याची गरज आहे!
एक वामनपाऊल अशा प्रकारे अवकाशात ठेवलेले असतानाच दुसरे वामनपाऊल आपण म्हणजेच भारतीयांनी सागरामध्येही ठेवले आहे. आजवर आपण इतर विकसित देशांकडून युद्धनौकांची खरेदी केली. पण गेल्या १० वर्षांमध्ये आपला सगळा भर राहिला आहे तो स्वयंपूर्ण बनावटीच्या युद्धनौका तयार करण्यावर. त्या तंत्रज्ञानात आता पारंगतता आल्यानंतर गेल्याच आठवडय़ात भारताने मॉरिशसच्या तटरक्षक दलासाठी तयार केलेली पहिली गस्तीनौका त्यांना निर्यात केली. ८३ जणांची क्षमता असलेली ही युद्धनौका हेदेखील आपले वामनपाऊलच आहे. त्याचा परिणाम आपल्याला पाच-सहा वर्षांनंतर दिसेल. मॉरिशसच्या पावलावर पाऊल टाकून आता श्रीलंकेच्या नौदलानेही दोन युद्धनौकांची मागणी भारताकडे नोंदविली आहे. इतर विकसित देशांकडून युद्धनौका विकत घेणे या लहान देशांसाठी तेवढे परवडणारे नाही. मात्र भारतासारख्या देशाकडे युद्धनौका बांधणीच्या तंत्रज्ञानात पारंगतता आली असून तेवढय़ाच तोडीस तोड असलेली युद्धनौका लहान देशांना कमी खर्चात भारताकडून खरेदी करणे सहज शक्य होते. गेल्या १५ वर्षांमध्ये शेजारील राष्ट्रांशी असलेले आपले संबंध खूपच बिघडलेले होते. अशा अवस्थेत ही राष्ट्रे या युद्धनौका आपल्याकडून खरेदी करणार असतील तर त्या माध्यमातून त्या देशांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे भारताला खूप सोपे जाईल. त्यातच मोदी सरकारने सत्ताग्रहण केल्यानंतर आग्नेय आशियातील देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला आहे. आग्नेय आशियामध्ये पुन्हा एकदा भारत नेतृत्व करण्याच्या तयारीत आहे. या सर्व देशांशी भारताची आणि भारताशी त्या देशांचीही सांस्कृतिक नाळ जोडलेली आहे. या पाश्र्वभूमीवर हे सागरातील वामनपाऊल भारतासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. २०१४ सरत असताना घडलेल्या या दोन महत्त्वाच्या घटना या वर्षांवर आपले पदचिन्ह उमटवून आगामी वर्ष अधिक चांगले असेल याची खात्री देणाऱ्या आहेत.
२०१५ हे नवे वर्ष सर्व देशवासीयांना सुख, समृद्धी, आनंद आणि समाधानाचे जावो, हीच प्रार्थना!
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2014 रोजी प्रकाशित
वामनपाऊल!
भारतीय परंपरेमध्ये विष्णूच्या वामनावताराची एक दंतकथा सांगितली जाते. त्याने दोनच पावलांमध्ये आकाश-पाताळ पादाक्रांत केले,

First published on: 26-12-2014 at 02:05 IST
मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokprabha editorial matithartha base on how isro achives success in