त्यांचे अधोवस्त्र मेखलेने बांधलेले असून वस्त्राचा सोगा दोन्ही पायामध्ये रुळताना दिसतो आहे. काही मातृकांच्या पायात तोडे आणि पंजण यासारखे अलंकारदेखील दिसतात. अत्यंत देखण्या, अतिशय प्रमाणबद्ध आणि नृत्यामध्ये रममाण झालेल्या अशा या सप्तमातृका मुखेडच्या महादेव मंदिरावर पाहायला मिळतात. अत्यंत दुर्मीळ असा हा शिल्पठेवा जपला गेला पाहिजे. जर तिथे पर्यटक, अभ्यासक मुद्दाम मोठय़ा संख्येने गेले आणि त्यांनी हा ठेवा पहिला तरच तो जपला जाईल. मुखेडचे हे मंदिर खरोखर अगदी निराळे असेच म्हणावे लागेल. याच मंदिरावर अजून एक दुर्मीळ शिल्प पाहायला मिळते आणि ते म्हणजे ज्येष्ठा अथवा अलक्ष्मीचे. महाराष्ट्रात ‘अक्काबाई’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही लक्ष्मीची मोठी बहीण होय. समुद्रमंथनाच्या वेळी दोघी बहिणींमध्ये ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले. लक्ष्मीशी श्रीविष्णूने लग्न केले, पण या मोठीचा हात धरायला कोणी तयार होईना. शेवटी कपिल मुनींनी तिच्याशी लग्न केल्याची कथा आहे. दक्षिण भारतात या ज्येष्ठेचे मोठे महत्त्व आहे. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे तर गाढव हे तिचे वाहन असते. रोगराई, मरीआई, यांची देवता असेही तिचे वर्णन काही ठिकाणी आलेले आहे. मुखेडच्या महादेव मंदिरावरील हिचे शिल्प अत्यंत देखणे आहे. इथे ही ज्येष्ठेची प्रतिमा चतुर्मुख असून उजव्या वरच्या हातात केरसुणी आहे तर एका हातात सुरा आणि एका हातात कपालपात्र धरलेले दिसते. कानात कुंडले तर डोक्यावर मुकुट घातला असून तिच्या डाव्या खांद्यावरून लोंबणारी एक मुंडमाळा आहे. तिच्या शेजारीच तिचे वाहन गाढव हे दिसते आहे. अत्यंत दुर्मीळ असे हे शिल्प एक आगळेवेगळे नक्कीच आहे. ते पाहण्यासाठी तसेच नृत्यमग्न सप्तमातृकांचे दर्शन घेण्यासाठी मुखेडला आवर्जून गेले पाहिजे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Sep 2014 रोजी प्रकाशित
नृत्यमग्न सप्तमातृका आणि ज्येष्ठा – मुखेड
मराठवाडा हा प्राचीन काळापासून संपन्न असा प्रदेश होता. सातवाहन, राष्ट्रकुट, यादव या बलाढय़ सत्ता इथे नांदल्या आणि त्या राजवटींच्या कालखंडात कलेला मोठय़ा प्रमाणात राजाश्रय मिळाला होता.

First published on: 26-09-2014 at 01:22 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri special