वसई-विरारला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. बुद्ध काळातील स्तूप, वसईचा किल्ला, अर्नाळा किल्ला, निर्मलची वैदिक काळातील तलाव व १२ व्या शतकातील शंकरार्याचे मंदिर यांना भेटी द्या, तेथून कधी निघतो असे वाटते. पेशवेकालीन आगाशी येथील फडके वाडा पाडू नये म्हणून मी मुंबईतील दैनिकांना लिहिले. त्याकडे सर्वानीच दुर्लक्ष केले. नंतर तो पडून आता तेथे बहुमजली इमारत उभी आहे. स्वच्छतेशी आपला काही संबंध नसतोच. सर्वत्र घाणीचे राज्य. या सर्वाला आपले सरकार व स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. पुरातन खात्याने वर्ष-दोन वर्षांपूर्वी वसई किल्ल्याची डागडुजी केली. अधिकारी मुंबई-दिल्लीत, जो कंत्राटदार होता त्याने किल्ल्यातील ऐतिहासिक चर्चवरील लिखाण सिमेंट फिरवून कायमचे गजाआड केले. १९९९ साली हरित वसई संरक्षण समितीने त्यावेळच्या केंद्रीय पर्यावरण मंत्री मेनका गांधी यांच्याशी पत्रव्यवहार केला व त्यांना विनंती केली होती की वास्तूंची निगा राखावी. त्यांनी राज्य सरकारला या भागातील सर्व ऐतिहासिक वास्तूंची योग्य काळजी घेऊन देखभाल करण्याचे लेखी कळवूनही सरकारने दाद घेतली नाही. आपण नागरिक अशा वास्तूंच्या नाशाला जबाबदार आहोतच, पण सरकार व त्यांचे पुरातन खाते झोपले आहे त्यांना जागे कोण करणार?
मार्कुस डाबरे, पापडी, वसई. (ई-मेलवरून)
विचारांची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद
‘लातूर पॅटर्न’ प्रकाशित झाली. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ती दैनिकं, साप्ताहिकं व साहित्यविषयक मासिकांना पाठवण्यात आली, पण कोणीही आजपर्यंत त्यावर लिहिले नाही. मला वाटत होते आपण कादंबरीतून जो विषय मांडला आहे त्यात काही गफलत आहे का की तो पुरेशा गंभीरपणे लिहिण्यात आला नाही किंवा आपला विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे किंवा दिशाभूल करणारा आहे. आपली मेहनत वाया गेली असं मनात येत होतं.
‘अनरउबिक’चं लिखाण झाल्यावर दोन-चार मित्रांना दाखवली. त्यांनी अनुकूल अभिप्राय दिला. मग प्रकाशकांकडे जायला लागलो तर ‘लातूर पॅटर्न’पेक्षा वेगळाच अनुभव यायला लागला. ‘लातूर पॅटर्न’ वाचून निदान बघू, करू, दोनेक वर्ष थांबा अशी उत्तरं मिळायची, इथे तर चक्क नकार यायला लागला. त्यामुळे नैराश्य आलं. एका इंग्रजी पाक्षिकात ई-बुक्सबद्दल सविस्तर लेख आला होता तो वाचून आपण याचं ई-बुक स्वरूपात प्रकाशन करायचं असं ठरवलं. अर्थात छापील आवृत्ती काढणाऱ्या प्रकाशकांसारखं हे पण नकार देतील असं वाटलं होतं, पण त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता कादंबरी प्रकाशित करायची तयारी दर्शवली. आपल्या इथे ई-बुक्सचा वाचक दुर्मीळ असल्यामुळे ती म्हणावी तितकी लोकांपर्यंत नाही पोचली. त्यामुळे हीसुद्धा ‘लातूर पॅटर्न’सारखी दुर्लक्षित राहणार बहुतेक असं वाटायला लागलं. परंतु या लेखामुळे मी मांडत असलेले विचार व दृष्टिकोन यांची दखल घेण्यात येत आहे याचा खूप आनंद होत आहे. आपले पुनश्च एकदा धन्यवाद.
विवेक कुलकर्णी (ई-मेलवरून)
कायद्याचा धडा शिकवा
– सुशांत निकम, सांगली (ई-मेलवरून)
‘किशोरांचं वास्तव’ – घरोघरची वस्तुस्थिती
शिवराम कुलकर्णी, पुणे.
पालकांनी मुलामुलींना समजून घ्यायलाच हवं
‘बिथरलेली मुलं’ (लोकप्रभा २७ जून) हा ‘किशोरांचं वास्तव’ लेख आजच्या पालकांना अत्यंत महत्त्वाचा व पालक कर्तव्य पार पाडायला लावणारा आहे. मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. तद्वतच ती प्रत्येक मातापित्याचीही संपत्ती आहे, मात्र या खऱ्या संपत्तीसाठी जगण्यापेक्षा आपण पैशारूपी संपत्तीच्या मागे धावतो व आपल्या खऱ्या संपत्तीकडे दुर्लक्ष करतो.
आजचा पालक आपल्या व्यवसायात, आपल्या नोकरीत व आपल्या उद्योगात गुंतलेला आहे. त्यामुळे आपली मुलं काय करतात अन् काय नाही, याकडे पाहायला त्याच्याजवळ वेळ नाही. सकाळी लवकर कामावर/उद्योगावर जाणे, रात्री उशिरा घरी येणे, मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसणे यामुळे आज ही मुलं बेजबाबदार नीतिमूल्ये पायदळी तुडवणारी संकुचित वृत्तीची घडत आहेत. यामुळे कुटुंब, समाज व पर्यायाने राष्ट्राचे खूप मोठे नुकसान होत आहे.
किशोरवय मुलांना योग्य दिशा देणारे असते. या वयात योग्य दिशादर्शक ज्ञान मिळाले तर मुलं आयुष्यात सक्षमपणे व समर्थपणे उभी राहतात. यासाठी या वयात मुलांना योग्य दिशा देण्यासाठी पालकांनी मुलांना समजून घेऊन त्यांच्यासाठी वेळ द्यायलाच हवा. अत्यंत उद्बोधक व वाचन करून यातील सूचना अंमल करायला लावणारा लेख प्रत्येक पालकाने वाचायलाच हवा.
– धोंडीरामसिंह राजपूत, औरंगाबाद.