गौरांग जाधव, कोरेगाव.
गणेशोत्सवाची परंपरा सगळ्या देशातच; पण त्यातही विशेषत: महाराष्ट्रात फार मोठी आहे. या वर्षीच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘लोकप्रभा’ने प्रकाशित केलेले दोन्ही विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्राह्य़ होते. ५ सप्टेंबरच्या अंकातील पुराणोक्त आणि आडवाटेवरचे गणपती तसेच १२ सप्टेंबरच्या अंकातील महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ३७ ठिकाणांच्या सार्वजनिक गणेशोत्सवांची सचित्र माहिती ही आपण परिश्रमपूर्वक संकलित केल्याचे जाणवते. महाराष्ट्रातील अष्टविनायकांव्यतिरिक्त इतर अनेक गणेश मंदिरांचा परिसर नयनरम्य आहे हे वैशिष्टय़पूर्ण म्हणता येईल. समाजजागृतीच्या हेतूने लोकमान्यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात. समाज एकत्र येतो. मनोरंजन आणि प्रबोधनदेखील होते. गणेश विशेषांकाच्या रूपाने ‘लोकप्रभा’ने वाचकांना एक अनोखा नजराणाच दिला आहे.
अॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण (ई-मेलवरून)
‘लोकप्रभा’ (१९ सप्टेंबर २०१४) च्या अंकातील ‘र्निबध वाढले तरी आवाज मोठ्ठाच’ ही कव्हरस्टोरी नुसतीच वाचनीय नाही तर विचार करायला लावणारी आहे. सुहास जोशींनी डॉ. यशवंत ओक यांनी ध्वनिप्रदूषणाबद्दल उठविलेल्या आवाजाची दखल घेऊन ही समस्या किती गंभीर आहे आणि त्यावर जनता आणि शासन यांनी वेळीच काळजी घ्यायला हवी हे सोदाहरण व मुद्देसूद विचार व्यक्त केले आहेत.
आपल्या देशात दुर्दैवाने कुठल्याच गोष्टीचे गांभीर्य नसते. कायद्याची भीती तर कुणालाच वाटत नाही. अगदी खुनी, बलात्कारी, भ्रष्टाचारी मंडळींच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची वा भीतीची कुठलीही खूण दिसत नाही. इतके ते निर्ढावलेले असतात. कारण त्यांना माहीत असते की शिक्षा मिळायला खूप वर्षे लागतात आणि त्यातून कायदेशीर पळवाटा कशा शोधाव्यात यातही ते तरबेज असतात.
हल्ली तर दहीहंडी कार्यक्रम हा धार्मिक कमी आणि राजकीयच जास्त झाला आहे. दहीहंडय़ा किती उंच लावाव्यात याबाबतीत कोर्टालासुद्धा मध्यस्थी करावी लागली. आणि या कार्यक्रमात सिनेकलाकार व राजकीय नेते यांचा धुडगूसपण दिवसेंदिवस वाढतो आहे. याला लगाम लावणार कोण?
सार्वजनिक गणेशमूर्ती जास्तीत जास्त किती मोठी व उंच करता येईल याकडे विशेष लक्ष देतात. मुंबईला खोल समुद्र आहे, पण पुणे, नागपूर, अकोला, औरंगाबाद या ठिकाणी तलावात या मोठय़ा मूर्ती पूर्ण बुडवतासुद्धा येत नाहीत. निर्माल्याचा कचरा व त्याच्यापासून होणारे प्रदूषण हेसुद्धा ध्वनिप्रदूषणाइतकेच धोकादायक आहेत.
खरोखरच ध्वनिप्रदूषण सर्व दृष्टीने हानीकारक आहे, हे सर्वाना पटलेले आहे, पण उमजत नाही. ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ ऐवजी ‘पुढचे पुढे बघू’ ही वृत्ती वाढते आहे. डी.जे.ने तर कहरच केला आहे. गणपतीच्या मिरवणुकीत कसली गाणी आणि कसला नाच. म्हणजे सर्वच प्रदूषित असते.
ध्वनिप्रदूषणाचे एक साधे उदाहरण मी देतो. युरोप ट्रिपमध्ये लंडन ते पॅरिस ट्रेनचा प्रवास संपल्यावर पुढच्या साताठ देशांत, जर्मनी, स्वित्र्झलड, फ्रान्स, इ. संपूर्ण बसचा प्रवास तोसुद्धा तब्बल १४-१५ दिवस, विश्वास बसणार नाही, पण आमच्या बसचालकाने एकदाही हॉर्न वाजवला नाही. आपल्याकडे तर सिग्नलची वाट न बघताच हॉर्न वाजवायला सुरुवात करतात. असो. ‘हम नहीं सुधरेंगे’ हे तर आपले ब्रीदवाक्यच आहे.
डॉ. यशवंत ओकांनी मात्र या समस्येला तोंड फोडले व बऱ्याच प्रमाणात ही समस्या लोकांना कळली आहे, हे काय थोडे आहे?
भाऊराव हेडाऊ, नागपूर.
दि. ८ ऑगस्ट २०१४ चा ‘लोकप्रभा’ अंक वाचला, पण मन सतत ‘औरंगाबाद पावसाळा’ लेखाकडे वळत होते. दासू वैद्य यांनी मराठवाडय़ाच्या पावसावर थोडक्यात अतिशय परिपूर्ण लिहिले आहे. लेख वाचताना त्यांनी जे भावनापूर्ण नैसर्गिकपणे लिहिले आहे, त्याने मला भरून आले. दासू वैद्य यांनी सर्व वास्तव अगदी फारच स्पष्ट केले आहे. त्यात सरलता व खरेपणा आहे. मी पुण्याचा असलो तरी मला मराठवाडा खूप आवडतो. मी १९६३ पासून आजतागायत औरंगाबादशी संबंधित आहे. पुणे-औरंगाबाद प्रवास करताना नगरच्या घाटानंतर चोहीकडे औरंगाबादपर्यंत उकृष्ट ज्वारी १९६३ ते ६८ पर्यंत दिसत असे. नंतर पावसाचे प्रमाण कमी होत गेले व उजाड दिसायला लागले. १९७२च्या भीषण दुष्काळानंतर मराठवाडा सुधारलाच नाही. महत्त्वाचे कारण संपूर्ण मराठवाडय़ात कै. शंकरराव चव्हाणांच्या नंतर मराठवाडय़ासाठी त्यांच्यासारखा नेता मिळालाच नाही. सततच्या दुष्काळाने जनतेची मानसिक दुर्बलता वाढतच गेली. हतबल जनता काहीच करू शकत नाही.
दासू वैद्य यांच्या लेखात लिहिलेले वाक्य ‘पावसाची मर्जी नसलेल्या या दुष्काळी प्रदेशात का बरे जन्मलो!’ अंत:करणास पीळ पाडणारे आहे. १९६८ पर्यंत पूर्ण मराठवाडय़ात फक्त पावसावर उत्तम शेती होत होती. आता एकच आशा आहे, राळेगणसिद्धीचा प्रयोग जास्तीत जास्त गावांत लोकसहभागातून (सरकारशिवाय) व्हावा व मराठवाडा सुजलाम सुफलाम व्हावा! श्री. वैद्य खडीवाले (दादा) यांचा लेखपण फारच छान वाटला.
डॉ. विलास भि. माळवे, शिवाजीनगर, पुणे-५.
– सुषमा घाणेकर,
धारवाड, ई-मेलवरून.
स्वातंत्र्य दिन विशेषांकातील हृषीकेश जोशी यांची ‘माझा देश’ ही कविता अप्रतिम होती.
डॉ. गजानन झाडय़े, नागपूर, ई-मेलवरून.