कोकणातून सह्य़ाद्रीकडं पाहिलं की, तो वाट अडवून उभा ठाकलेला, अंगावर येणारा असा वाटतो; पण त्याच्या अंगाखांद्यावर मनसोक्त बागडायला गेलं, की सह्य़ार्दीची अनोखी रूपं अनुभवायला मिळतात..
रेल्वेने लोणावळा आणि मग लाल डब्याने भांबर्डे गावी पोहोचायला साडेदहा झाले. सहा-सात वर्षांपूर्वी हाच ट्रेक करण्यासाठी आम्हाला चक्क आंबवण्यापासून १६ किलोमीटर चालत यावं लागलं होतं. अर्थात तेव्हा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे काहीच वाटलं नव्हतं. आंबवण्यानंतर साधारण बारा-एक किलोमीटरनंतर सालतर खिंड ओलांडली की, आपण वेगळ्याच विश्वात जातो. डावी-उजवीकडे लांबलचक डोंगररांग, समोर मैलोन्मैल पसरलेली शेती आणि गवताळ कुरणं आणि त्यापल्याड खाली कोकण. मोकळ्या स्वच्छ हवेचा, त्या वातावरणाचा गंध भरून घ्यायचा आणि मग त्या डोंगरवाटांवर मनसोक्त हुंदडायचं. भांबर्डे गावातून डावीकडे समोर थेट घनगड, तर उजवीकडे लांबवर तेलबैला. कोकणातून दिसणारा तेलबैला आणि आता येथे घाटमाथ्यावरून दिसणारा दोन्हीतला फरक एकदम जाणवणारा.
घनगडाच्या पायथ्याला ऐकोले गावात गुरुजींच्या घरी सॅक टाकल्या आणि गडाकडे प्रस्थान केलं. गडाकडे जाणारी वाट संवर्धनाच्या नावाखाली प्रशस्त करायला घेतली आहे. घनगड तसा आकाराने छोटाच आहे, उंचीदेखील फारशी नाही. गडाचं उद्ध्वस्त प्रवेशद्वार अजून बरंच शाबूत आहे. समोरच एक मोठी गुहावजा कोठी दिसते. (गुहेच्या आत आणि बाहेर संवर्धनाच्या नावाखाली चक्क सिमेंटचा कोबाच केला आहे.) वर जाणाऱ्या वाटेवरील पायऱ्या उद्ध्वस्त झाल्यामुळे मूळ वाटेने पूर्वी वर जाता येत नसे; पण गुहेच्या जवळच कोणा तरी संस्थेने एक लोखंडी शिडी बसविल्यामुळे आता वर जाणे सोपे तर झालेच आहे, पण पाण्याच्या टाक्यांपर्यंत अगदी आरामात जाता येते. वर बुरुजाचे आणि पायऱ्यांचे अवशेष दिसत होते. गडफेरी करायची तर थोडे वर जावे लागेल. गडफेरी आमच्या अजेंडय़ावर नव्हतीच. आम्हाला न्याहाळायचं होतं ते सह्य़ाद्रीचं अफाट रूप.
घनगडाला डावीकडे ठेवत गुडघाभर गवतातून मळलेल्या पायवाटेने चालू लागलो. भर दिवाळीत शहराच्या गर्दी-गोंगाटापासून दूर, डोंगराच्या कुशीत शांत जागी मुक्कामासाठीचा हा प्रवास सुरू झाला. उन्हं कलू लागली. घनगड मागे राहिला. उजवीकडे दरीच्या पल्याड तेलबैला आणि बाजूची डोंगररांग आता स्पष्ट दिसू लागली होती. दरीच्या पल्याडच्या त्या डोंगरांवर जणू काही गोल्फच्या मैदानावर असतात तशा तीन-चार छोटय़ा छोटय़ा गोल टेबललॅण्ड दिसत होत्या. दूरवर पसरलेले गवताळ रान, त्यावरील सोनेरी सूर्यकिरणे.. वातावरण बालकवींच्या फुलराणीला शोभणारं होतं.
असो, पुढे जाऊ लागलो तसे तेलबैलाचा आकार आता बदलत होता. या वाटेने येण्याचा खरा हेतू वाटेत येणाऱ्या खिंडीतून दिसणारा तेलबैला टिपायचा. तेलबैला कायम कोकणातून पाहिल्यामुळे प्रथम जेव्हा त्याचे सुळकास्वरूप छायाचित्र आनंद पाळंदे यांच्या ‘डोंगरयात्रा’ पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पाहिले तेव्हापासून ते डोक्यात एकदम फिट्ट बसले होते. पाळंदेच्या डोंगरवाटा या बहुतांशपणे वेगळ्या वाटेनेच जाणाऱ्या असतात. अर्थातच त्यामुळेच सह्य़ाद्रीची ही अशी वेगळी रूपं अनुभवता येतात. कधी कधी त्या वाटेने जाताना आमची वाट लागायची हा भाग सोडून द्या, पण सह्य़ाद्रीचं एक वेगळं दर्शन मात्र हमखास व्हायचं. असेच एकदा इगतपुरीजवळच्या त्रिंगलवाडीवरून थेट कसारा-मोखाडा रस्त्यावरील विहीगावला येणारी वाट त्या पुस्तकातून वाचून अजमावली होती, तीदेखील भर उन्हाळ्यात, तेव्हा जी हालत झाली ती
मनसोक्त फोटोग्राफी झाल्यावर लगोलग पठार गाठलं. चारही बाजूस केवळ गवताचं साम्राज्य होतं. नीरव शांतता आणि भटकंतीतला निखळ आनंद. समोरच्या झाडामधून फणा काढल्यागत तेलबैला डोकावत होता.
डोंगरात भटकताना कधी कधी काही कोडी पडतात. शहरी डोळ्यांना मानवणार नाही अशी हिरवळ त्या पठारावर चोहोबाजूला असताना, त्या अफाट रानात एकच झाड मात्र संपूर्ण वठलेलं, काळंठिक्कर पडत चाललेलं. तरीदेखील बराच काळ तिष्ठत उभं असावे. त्याच्या सर्वागावर भुईछत्र्यांनी इतकं अतिक्रमण केलं की त्यांच्या खाचांमुळे जणू काही पायऱ्याच तयार झाल्या होत्या. नेमकं काय झालं असावं?
पठारावर पोहोचताच दहा-पंधरा मिनिटांत ढेबेवाडी दिसू लागली. वाडीत आता दोनच घरं. बाकी सारे वाडी सोडून गेलेले. बाबूराव ढेबे बाहेरच उभे होते. सलगीचा संवाद झाला आणि त्यांच्या अंगणात टेंट लावून चहा ढोसून पुन्हा पठाराकडे मोर्चा वळविला. आता संधिप्रकाशात सारी डोंगररांग उजळून निघाली होती. समोर एका रेषेत पसरलेले ते डोंगर, मध्ये ते वठलेलं झाड असा भन्नाट पॅनोरमा टिपता आला होता. ट्रेकचा हेतू सफल झाला होता.
जेवण तयार करताना बाबूरावांशी गप्पा रंगल्या. पूर्वी वाडी नांदती होती. रायगड आणि पुणे जिल्ह्य़ाच्या सीमेवरील या वाडीत पंधरा-वीस घरे होती. एक शिक्षकी शाळादेखील होती. आता सगळे खाली गावात, तर कोणी शहरात. बाबूरावांची तीन मुलं मुंबई आणि परिसरात नोकरी करतात. ते आणि बायको दोघेच वर या पठारावर राहतात. जोडीला चार जनावरं आणि थोडीफार शेती. शहरात यांना राहवत नाही. आम्ही तंबाखू खाणारे, तिथं कसं निभायचं असं त्यांचं लॉजिक. वाडीत राहायचं, गुरं चारायची, दूधदुभतं भरपूर. अस्सल गावठी तूप तयार करायचं. चार पैसे महाग असलं तरी हे तूप नेणारे अनेक जण आहेत. बाबूरावांच्या गप्पा सुरू होत्या, तर मावशीनं मात्र आठवणीनं रेडिओ लावला. करमणूक आणि जगाशी संबंध जोडणारं एकमेव साधन.
खिचडीचे डाळ तांदूळ शिजवले आणि जोडीला गावरान कोंबडीचा रस्सा तडस लागेपर्यंत ओरपून तंबूत शिरलो. तशी थंडीदेखील आत शिरली. रात्रीचे नऊच वाजले होते. फारशी दमणूकदेखील झाली नव्हती आणि इतक्या लवकर झोपणं अशक्यच होतं. हेडटॉर्चच्या प्रकाशात आमच्यासारख्याच एका उनाड भटक्याचं पुस्तक वाचत कधी तरी झोपेच्या अधीन झालो.
दुसरा दिवस खडसांबळे लेण्यांचा होता. पठारावरून कोकणात उतरणाऱ्या तीन-चार वाटा आहेत. एक नाणदांड घाट जो सुधागडच्या पायथ्याला ठाकूरवाडीत उतरतो, दुसरी वाट खडसांबळे गावात उतरते तर दोन वाटा लेण्यांकडे जातात. बाबूराव वाटेला लावून द्यायला आले होते. आता समोर हिर्डी गाव, गुटकी घाट दिसत होता आणि प्लॅन होता होता चुकलेलं डोंगराच्या पल्याड लपलेलं अंधारबन साद घालत होतं. प्रचंड वाढलेल्या गवतात खाली जाणारी वाट हरवली होती. आमचा वाटाडय़ा वाट म्हणून जे दाखवत होता ते फक्त त्यालाच दिसत होतं. शेवटी त्यालाच बरोबर येण्याची विनंती केली. तोदेखील घरी बायकोला न सांगता लगोलग आमच्याबरोबर यायला तयार झाला!!! त्याच्या पावलावर पाऊल टाकत आम्ही संपूर्ण गवताने झाकलेल्या वाटेने दणादण उतरू लागलो. एका टेपावर आल्यावर दूरवर झाडीत लपलेली खडसांबळे लेणी दिसू लागली. खाली उतरून डोंगराला वळसा घेऊन जायचे होते. खालच्या माळावरदेखील प्रचंड गवत होते, तरी वाट स्पष्ट दिसत होती. वाटेत पाणीदेखील भरपूर होते. रमतगमत, कधी मध्येच गचपणातून शॉर्टकट घेत आम्ही खूपच लवकर लेण्यांच्या पायथ्याला आलो. लेणीच्या जवळच पठारावरून एक ओढय़ाची वाटदेखील उतरते. तोच हा ओढा. ओढय़ाला थंडगार नितळ पाणी होतं. अंगावर मनसोक्त पाणी उडवून आणि ढोसून लेणीकडे निघालो. जंगलातून मुख्य पायवाटेवरून लेणीकडे नेमकं कोठे वळायचे हेच कळत नाही. आडवाटेला असल्यामुळे पुरातत्त्व खात्याचेपण साफ दुर्लक्ष आहे.
चैत्य आणि विहारांची रचना असणारी ही लेणी आज मात्र पुरती विकल झाली आहेत. पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष, ऊन-पावसाचे तडाखे, काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालेली ही लेणी मात्र ओरखडा उमटवून जातात. पुरातत्त्व खात्याचा संरक्षित फलकदेखील येथेच धाराशायी झाला आहे. अर्थात उर्वरित उद्ध्वस्त अवशेषांवरूनदेखील लेणींच्या मूळच्या भव्यपणाची कल्पना येते. ही लेणी दुसऱ्या शतकात बांधली असावीत अशी माहिती मिळते. लांबवर आम्ही उतरलेली डोंगराची सोंड दिसत होती.
आता आम्हाला किन्हवली गाठायचे होते. तेथून विक्रम (टमटम रिक्षा) मिळतात अशी मौलिक माहिती मिळाली होती. गावातून मागे पाहताना पुन्हा एकदा डोंगररांगांनी फेर धरला. किवणी पठार, त्याच्या डावीकडे कोपऱ्यात तेलबैला, बाजूला सुधागड, आणि एकदम उजवीकडे समोर खजिन्याचा डोंगर. या खजिन्याने मात्र आमचे लक्ष वेधून घेतले. खजिना शब्दामुळे नाही, पण त्याच्या त्या राकट, सरळसोट कडय़ांमुळे आणि त्यातून तयार झालेल्या वैशिष्टय़पूर्ण आकारांमुळे. पुढचा ट्रेक अंधारबन करून खजिन्याला यायचे हे लगेच ठरूनदेखील गेलं. तेवढय़ात थेट ठाण्याची एसटी मिळाल्यामुळे खरंच खजिना गवसला. वळणं घेत एसटी पालीजवळ नाडसूर फाटय़ाला आली तेव्हा दोन दिवस ज्यांच्या खांद्यावर भटकलो ते सारे डोंगर आमच्या मागे आडवे-उभे ठाकले होते आणि काल एका सुळक्यासारखा भासणारा तेलबैला आज आडव्या भिंतीसारखा कोकणाकडे पाहत उभा होता.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2015 रोजी प्रकाशित
ट्रेकर ब्लॉगर -आमची डोंगरयात्रा..
कोकणातून सह्य़ाद्रीकडं पाहिलं की, तो वाट अडवून उभा ठाकलेला, अंगावर येणारा असा वाटतो; पण त्याच्या अंगाखांद्यावर मनसोक्त बागडायला गेलं, की सह्य़ार्दीची अनोखी रूपं अनुभवायला मिळतात..

First published on: 02-01-2015 at 01:30 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahyadri trek