चित्रकला आणि शिल्पकला या दोन्ही दृक् कलांचा एकत्रित उपयोग वास्तुरचनेत केला आहे, अशी उदाहरणे फार क्वचित दिसून येतात. सामान्यपणे भित्तिचित्रांचा म्हणजे म्युरल्सचा समावेश इमारतींच्या दर्शनी भागावर किंवा आतील भागांत केलेला दिसतो. एखादे शिल्प किंवा समूह शिल्प इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी आढळते. मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात महापौर बंगल्याच्या विस्तीर्ण परिसराला लागून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा भव्य वास्तू प्रकल्प आहे. त्या ठिकाणी चित्रकला, शिल्पकला आणि वास्तुकला असा त्रिवेणी कलासंगम जो सहसा कुठे बघायला मिळत नाही, तो या राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात बघायला मिळतो. हा अनोखा कलासंगम साकारण्यामागे विशिष्ट उद्देश आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामगिरीच्या जोखडातून हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी जे झगडले, ज्यांनी प्रसंगी प्राणार्पणही केले अशा शूरवीरांचे, सशस्त्र क्रांतिकारकांचे स्मारक उभे राहावे हा या कलासंगमामागील मानस आहे. भारताच्या भावी पिढय़ा स्वतंत्र हिंदुस्थानच्या प्रगतीसाठी नि:स्वार्थपणे, प्रामाणिकपणे कार्य करायला सिद्ध व्हाव्यात, हा या प्रकल्पापाठीमागचा विशेष हेतू आहे. कै. जयंतराव टिळक आणि कै. पंडितराव बखले यांच्या प्रेरणेतून हा प्रकल्प त्रिवेणी कलासंगमाच्या स्वरूपात साकार झाला आहे.
राष्ट्रीय स्मारकाच्या भव्य इमारतीचा दर्शनी भाग सावरकर मार्गाच्या (पूर्वीचा कॅडेल रोड) बाजूला आहे. या दर्शनी भागात जमिनीपासून सुमारे साडेतीन मीटर उंचीवर चौथरा आहे. अदमासे ४० मीटर लांब व २० मीटर रुंद असा हा फरसबंदी चौथरा आहे. दोन प्रशस्त जिन्यांवरून या चौथऱ्यावर आले की समोरच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा खुर्चीवर बसलेला पूर्णाकृती पुतळा आहे. दोन मीटर उंचीच्या चबुतऱ्यावर अडीच मीटर उंची असलेला पुतळा सजीव असल्यासारखा भासतो. सावरकर जाहीर सभेत भाषण करीत आहेत अशा प्रकारची पुतळय़ाची ठेवण आहे. डावा हात मिटलेल्या छत्रीच्या दांडय़ावर आहे, तर श्रोत्यांच्या मनावर त्यांचे प्रेरणादायी बोल ठसावेत अशा आविर्भावामध्ये पुतळय़ाचा उजवा हात वर केलेला आहे.
या पुतळय़ाला पाश्र्वभूमी आहे सुंदर भित्तिचित्राची, म्हणजे म्युरलची. जवळजवळ पाचशेहून अधिक सिरॅमिक टाइल्सच्या साह्यने हे भित्तिचित्र तयार केले आहे. सात बाय सात मीटर या आकाराच्या भित्तिचित्रात पारतंत्र्याच्या बेडय़ांतून बंधमुक्त झालेली भारतमाता दाखविली आहे. पाच मीटर उंचीची शुभ्रवस्त्रावृता, चतुर्भुजा अशा भारतमातेचे चित्र चित्रकार पाळंदे यांनी तयार केले आहे. या भारतमातेच्या भित्तिचित्राला आणखी एका भित्तिचित्राची पाश्र्वभूमी आहे. रंगीत सिरॅमिक टाइल्सचा वापर करून चित्रामध्ये धगधगते यज्ञकुंड दाखविले आहे. लाल, केशरी रंगांपासून फिकट पिवळय़ा रंगांच्या यज्ञज्वालांतून बंधमुक्त भारतमाता अवतीर्ण झाल्याचे मनोहारी दृश्य साकार झाले आहे. सुमारे ३० मीटर लांब व १८ मीटर उंच असा या भित्तिचित्राचा विस्तार आहे.
भारतमातेच्या भित्तिचित्राच्या लगत डाव्या नि उजव्या बाजूला लहान आकारांच्या भिंती आहेत. डावीकडील भिंतीवर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढून हुतात्मा झालेल्या देशभक्तांना उद्देशून सावरकरांनी केलेल्या इंग्रजी भाषणाचा संक्षिप्त भाग लिहिलेला आहे. उजव्या बाजूच्या भिंतीवर या भागाचे मराठी भाषांतर उद्धृत केले आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला ५० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने सन १९०८मध्ये सावरकरांनी हे भाषण लंडन येथे केले होते.
या दोन भिंतींना लागून जराशा लहान आकाराच्या भिंती आहेत. त्यावर सुमारे एक मीटर व्यासाचे गोल फलक आहेत. डावीकडील फलकावर ‘जयोस्तुते श्री महन्मंगले..’ या स्तुतिगीताच्या पंक्ती कोरलेल्या आहेत. हे स्तुतिगीत १९०३ साली सावरकरांनी पुणे मुक्कामी लिहिले. उजवीकडील फलकावर ‘ने मजसी ने परत मायभूमीला..’ या सावरकरांना १९०९साली इंग्लंडमधील ब्रायटन गावाच्या समुद्रकिनाऱ्यावर स्फुरलेल्या प्रसिद्ध काव्याच्या पंक्ती लिहिल्या आहेत.
दर्शनी भागातील जिन्याच्या पायऱ्या चढून चौथऱ्यावर आले की समोर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा व भित्तिचित्र इत्यादी वर्णन केलेल्या गोष्टी नजरेला पडतातच, याशिवाय चौथऱ्याच्या डाव्या व उजव्या बाजूला पुतळय़ापासून काही अंतरावर दोन समूह शिल्पं आहेत. अदमासे १२ मीटर लांब व साडेतीन मीटर उंच असा या समूह शिल्पांचा विस्तार आहे. त्यातील सर्व व्यक्ती पूर्णाकृती आहेत. चौथऱ्याच्या दक्षिणेला असलेल्या समूह शिल्पात सुरुवातीला दिसते पारतंत्र्यात गांजलेले एक कुटुंब. त्यापुढे सन १८५७ च्या स्वातंत्र्य समरामधील सेनानी दिसतात. बहादूरशहा जफर, नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई- झाँसीवाली, तात्या टोपे इत्यादी. त्यानंतर क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, बिहारचा बिरसा मुंडा अशा निवडक हुतात्म्यांचा समावेश केला आहे. १९०५ साली ब्रिटिशांनी बंगाल प्रांताची फाळणी केली. त्या फाळणीला कडाडून विरोध करणारे बंगाली नागरिक या समूह शिल्पात बघायला मिळतात. हुतात्म्यांच्या संदर्भातील रँडसाहेबासारख्या क्रूर इंग्रज अधिकाऱ्यांची व्यक्तिशिल्पंसुद्धा यामध्ये दाखविली आहेत.
चौथऱ्याच्या उत्तरेला, उजव्या बाजूला, जे समूह शिल्प आहे, त्यामध्ये सन १९०७ नंतर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या निवडक क्रांतिकारकांचा समावेश आहे. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने हिंदुस्थानला स्वातंत्र्यप्राप्ती होईल अशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची धारणा असल्याने दोनही समूह शिल्पांत प्रामुख्याने क्रांतिकारकच दाखविले आहेत. मादाम कामा यांच्यापासून पुढे खुदीराम बोस, ज्याने किंग्जफर्डच्या गाडीवर बॉम्ब फेकला, त्यानंतर शामजी कृष्ण वर्मा, सरदार अजित सिंग, सरदार सिंह राणा, व्ही.व्ही. अय्यर, अनंत कान्हेरे, विष्णू गणेश पिंगळे, सावरकर बंधू असे क्रांतिवीर आहेत, ज्यांचा ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारी संघटनेशी सक्रिय संबंध होता. भगतसिंग, राजगुरू, राजेंद्रनाथ लाहिरी, रोशनसिंग, चंद्रशेखर आझाद बिस्मिल, सूर्यसेन हे क्रांतिवीर आहेत. तसेच उधमसिंग, रासबिहारी बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस, कॅप्टन लक्ष्मी यांच्यादेखील शिल्पाकृती आहेत. अगदी शेवटी इसवी सन १९४७ मध्ये हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याच्या आनंदाने उल्हसित झालेले कुटुंब पाहायला मिळते.
दोन्ही समूह शिल्पांत जवळपास १०० व्यक्तिशिल्पं आहेत. ५० हून जास्त शिल्पं ही त्रिमिती स्वरूपात आहेत. इतर उत्थित शिल्प (रिलीफ स्कल्प्चर) प्रकारातील आहेत. मुंबईतील ख्यातनाम चित्रकार व शिल्पकार सुहास बहुलकर नि त्यांचे सहकारी तरुण शिल्पकार नीलेश ढेरे, दिनेश बर्वे व संजय कुंभार यांनी आपले सारे कलाकौशल्य पणाला लावून सर्व व्यक्तिशिल्पांमध्ये खरोखर जान भरली आहे. या प्रकल्पात समाविष्ट केलेल्या देशभक्तांविषयीचे संशोधन कार्य डॉ. वा.द. दिवेकर व सुधाकर पाटील यांचे आहे. भारतमातेचे भित्तिचित्र व समूह शिल्प यांच्या मांडणीची संकल्पना व रेखाटन बहुलकरांनी केले आहे.
समूह शिल्पांची मांडणी अतिशय कलात्मक आहे. प्रत्येक शिल्पाकृतीची शारीरिक ठेवण, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव हे त्या त्या व्यक्तीच्या क्रांतिकार्यातील प्रमुख घटनेशी सुसंगत असेच आहे. उदाहरणार्थ- झाशीच्या राणीचा इंग्रज अधिकाऱ्याशी झालेला अखेरचा मुकाबला- ज्या त्वेषाने राणी त्या अधिकाऱ्यावर तुटून पडली त्या वेळचे तिचे हावभाव, तिचे घोडय़ाला आवरणे. एडनच्या कारावासातून निसटून हिंदुस्थानकडे येण्यासाठी आतुर झालेले वासुदेव बळवंत किंवा ‘आप मुझे खून दो, मैं आप को आजादी दूँगा’ असे आत्मविश्वासाने भारतवासीयांना आवाहन करणारे सुभाषबाबू. तसेच परवशतेने गांजलेले कुटुंब आणि हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर सामान्य कुटुंबाच्या चेहऱ्यावरील आनंद दर्शविणारे भाव समर्थपणे साकारले आहेत. बहुलकरांची कलाप्रतिभा एवढय़ावरच थांबत नाही. समूह शिल्पांचे त्रिमिती परिमाण अधिक परिणामकारक करण्यासाठी, त्यातील व्यक्तिरेखांचा जिवंतपणा अधिक ठळक करण्यासाठी त्यांनी काही पुतळय़ांचे हात किंवा पाय असे अवयव किंवा त्यांच्यापाशी असलेली शस्त्रात्रे या गोष्टी, एकूण चित्रचौकटीच्या बाहेर आणल्या आहेत. बहुलकरांच्या या कलाप्रतिभेला प्रेक्षकांनी दाद द्यायलाच हवी.
हे झाले चित्र व शिल्प या विषयी. या त्रिवेणी कला संगमातील तिसरा महत्त्वाचा सहभाग आहे वास्तुशिल्पाचा. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मूळ प्रकल्पात सावरकरांच्या पूर्णाकृती प्रतिमेचा अंतर्भाव होताच. वास्तुप्रकल्पाच्या मूळ संरचनेप्रमाणे वास्तूचे बांधकाम सुरू झाले. परंतु आर्थिक अडचणीमुळे ते एका टप्प्यावर येऊन थांबले. पुढे ते सुरू होऊन पूर्ण होत असताना भारतमातेच्या भित्तीचित्राचा आणि समूह शिल्पांचा अंतर्भाव वास्तूच्या दर्शनी भागात करण्याची कल्पना स्मारकाच्या व्यवस्थापकांच्या मनात आली आणि एक अपूर्व असा त्रिवेणी कलासंगम प्रत्यक्षात आला.
या त्रिवेणी संगमात वास्तुशिल्प (आर्किटेक्चर) हे चित्र आणि शिल्प या दोन कलांच्यासाठी पाश्र्वभूमीच्या स्वरूपात वावरत आहे. याचा अर्थ असा नव्हे की वास्तुशिल्प हा घटक दुय्यम स्वरूपी आहे. उलट चित्र व शिल्प या घटकांचे अस्तित्व वास्तुशिल्पाच्या पाश्र्वभूमीच्या मांडणीमुळे अधिक विशेषत्वाने जाणवते. चित्राच्या व शिल्पांच्या कला प्रदर्शनाला या ठिकाणी वास्तुशिल्प प्रोत्साहन देत आहे असे म्हटले तर अयोग्य होणार नाही. या संदर्भात असेही म्हणता येईल, की इथे वास्तूचा सहभाग नाटय़मंचावरील नेपथ्यासारखा आहे. इथल्या त्रिवेणी कलासंगमात वास्तुशिल्पकलेचा सहभाग खूप छान साधला आहे. सावरकर मार्गापासून इमारतीचे अंतर, ज्या फरसबंद चौथऱ्यावर हे कला प्रदर्शन बघायला मिळते त्या चौथऱ्याची भोवतालच्या जमिनीपासूनची उंची, त्याची लांबी, रुंदी त्यावर चढून येण्यासाठी योजलेल्या जिन्याची ठेवण आणि भारतमातेच्या भित्तिचित्राच्या पाठीमागील मुख्य वास्तूच्या भिंतीची लांबी व उंची (अदमासे ३० मीटर x १८ मीटर), हे सर्व योग्य प्रमाणात आहे असे वाटते.
चित्र आणि शिल्प यांना पाश्र्वभूमी असणाऱ्या वास्तुरचनेचे बारकावे म्हणजेच डिटेलिंग आहे. त्याहून अधिक चांगल्या प्रकारे व्हावयास हवे होते असे जाणवते. उदाहरणार्थ- जिना चढून चौथऱ्यावर आले की प्रेक्षक व पुतळा यातील अंतर कमी वाटते. पुतळय़ासमोर असलेली मोकळी जागा आहे त्याहून निदान अडीच मीटर जास्त असती तर पुतळय़ामागील भारतमातेच्या चित्राचा भाग प्रेक्षकांना आता दिसतो त्याहून अधिक दिसला असता. तसा तो दिसणे आवश्यक होते. कारण त्यामुळे पुतळय़ाचा व चित्राचा सौंदर्यानुभव जास्त प्रमाणात प्रेक्षकांना घेता आला असता.
पूर्वी म्हटल्याप्रमाणे सिरॅमिक टाइल्सचा वापर करून भारतमातेचे चित्र सुंदर झाले आहे. पण भारतमातेच्या मुखावरील भाव अजूनही सात्त्विक असायला हवे होते. राजा रविवर्मा यांनी चितारलेल्या लक्ष्मी व सरस्वती यांच्या मुखावरील भाव जसे सात्त्विक आहेत तसे.
पुतळा व भित्तिचित्र या घटकांपासून दोन बाजूला असणारी समूह शिल्पं काहीशी अलग पडल्यासारखी वाटतात. समूह शिल्पांचे पुतळय़ापासूनचे अंतर दीड, दोन मीटरने कमी असते तर एकूण कलारचना जास्त एकत्रित भासली असती. त्यामुळे ती अधिक परिणामकारक झाली असती असे वाटते. सुमारे एक वर्षांपूर्वी या समूह शिल्पांवर आच्छादन छत्र (कॅनोपी) उभारले आहे. या शिल्पांना उन्हापावसापासून संरक्षण मिळेल. परंतु दोन बाजूंच्या या छत्रांमुळे एकूण कलात्मक मांडणी बंदिस्त व मर्यादित झाल्याचे जाणवते.
पुतळा, भित्तिचित्र आणि दोन समूह शिल्पं यांना स्मारकाच्या मुख्य वास्तूच्या विशाल भिंतीची पाश्र्वभूमी आहे. या भिंतीच्या वरच्या बाजूला मध्यभागी सुमारे दोन मीटर व्यासाचा गोलाकार फलक आहे. त्यात मशाल धारण केलेली हाताची मूठ दाखवली आहे. या फलकामुळे कला मांडणीला काहीशी बाधा झाल्याचे जाणवते. प्रेक्षकांचे लक्ष पुतळा व भित्तिचित्र या गोष्टींवर केंद्रित होण्यास यामुळे व्यत्यय येतो असे वाटते.
राष्ट्रीय स्मारकाचे कार्यालय पुतळय़ाच्या खाली तळमजल्यावर आहे. तेथे जाण्यासाठी असलेले प्रवेशद्वार जिन्यांच्या मध्यभागी आहे. हे प्रवेशद्वार संपूर्ण काचेचे आहे. खरं तर पुतळय़ाच्या खालील दर्शनी पृष्ठभाग भरीव (सॉलिड) असायला हवा. तो तसा नसल्याने पुतळा अधांतरी असल्याप्रमाणे दिसतो आणि एकूण कला मांडणीच्या दृश्यपरिणामाला (विज्युअल इफेक्ट) बाधा येते. तो परिणाम निर्बल होऊन जातो. रात्रीच्या वेळी तर हे प्रकर्षांने जाणवते.
या अनोख्या त्रिवेणी कलासंगमाचे दर्शन स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरून व समोरच असणाऱ्या शिवाजी पार्कला लागून असलेल्या पदपथावरून फार चांगल्या तऱ्हेने होऊ शकेल व तसे व्हावयास हवे. पण दुर्दैवाने तसे होत नाही. एक कारण असे की स्मारकातर्फे चालविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे व तेथे होणाऱ्या कार्यक्रमांचे फलक प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूकडील भिंतीवर असतात. त्यामुळे दक्षिण मुंबईकडून म्हणजे प्रभादेवीकडून येताना या कला संगमाच्या दृश्याला अडथळा निर्माण होतो. दुसरे कारण असे, की वास्तुप्रकल्पाच्या हद्दीच्या आत व हद्दीलगतच्या पदपथावर असलेली झाडे आणि वृक्ष. पदपथावर पुतळय़ाच्या अगदी समोर एक मोठा पिंपळ वृक्ष आहे. त्याच्याच रांगेत इतर काही झाडं आहेत. पदपथाला लागून असलेल्या कंपाऊंडच्या आतल्या बाजूला काही झाडं आहेतच. या सर्व झाडांमुळे व फलकांमुळे ही त्रिवेणी कलाकृती रस्त्यावरून दिसण्यात मोठा अडथळा झाला आहे. मुंबई शहरात अनेक सुंदर वास्तू आहेत, स्मारक शिल्पं आहेत. पण त्या वास्तूंच्या प्रांगणातील व समोरच्या पदपथांवरील वृक्षांमुळे त्या वास्तूंचे व स्मारकांचे सौंदर्य रस्त्यावरून अनुभवता येत नाही. शहरांतून व गावागावांतून झाडांचे आणि वृक्षांचे संवर्धन व्हावयास हवे यात संशय नाही, पण देखण्या इमारतींसमोर कोठे व कोणत्या प्रकारचे वृक्ष व झाडे लावायला हवी याचा नीट विचार संबंधित खात्यांनी व अधिकाऱ्यांनी करणे फार गरजेचे आहे.
एका महत्त्वाच्या घटकाचा येथे उल्लेख करायला पाहिजे. तो म्हणजे विद्युत प्रकाशयोजना. पुतळा, भित्तिचित्र व समूह शिल्पं यांच्यावर रात्रीच्या वेळी टाकण्यात येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता योग्य प्रमाणात आहे. पण प्रेक्षकांच्या डोळय़ांवर प्रकाशझोत न येता तो फक्त कलाकृतींवर पडेल अशी दिव्यांची योजना असायला हवी. पुतळय़ाची सावली भित्तिचित्रावर आणि भित्तिचित्राची सावली त्यामागील भिंतीवर पडते, ती तशी पडणार नाही अशी प्रकाशयोजना करायला हवी. पुतळय़ाच्या डाव्या व उजव्या बाजूला असलेल्या भिंतीवर आणि गोल फलकांवरील दिवाळीच्या रोषणाईसारखी असलेली प्रकाशयोजना अप्रस्तुत व रुचीहीन वाटते. प्रकाशयोजनेच्या क्षेत्रामधील तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीने यात सुधारणा करता येईल.
एक महत्त्वाची सोय येथे व्हावी असे वाटते. अपंग व्यक्तीला चौथऱ्यावर येऊन हे त्रिवेणी कला प्रदर्शन पाहता आले पाहिजे. त्यासाठी काही सोय झाली तर उत्तम. असो.
उपरोक्त काही उणिवा असल्या तरीदेखील या आगळय़ावेगळय़ा त्रिवेणी कलासंगमाची गुणात्मक महती कमी होते आहे असे मानू नये. या उणिवा एकाएकी दूर करणे शक्य नाही, पण त्या दूर करणे आवश्यक आहे. मुंबई महानगराच्या नागरी सौंदर्यात मोलाची भर घालणारी अशा प्रकारची ही कलात्मक रचना आहे. तिचा मुंबईकरांना अभिमान असायला हवा. प्रत्येक मुंबईवासीयाने सहकुटुंब एकदा तरी या अप्रतिम प्रकल्पाला भेट द्यायला हवी. सर्व पर्यटन संस्थांनीही त्यांच्या मुंबईतील स्थलदर्शनाच्या कार्यक्रमानुसार पर्यटकांना या ठिकाणी न्यायला विसरू नये असे मनापासून वाटते.
दृक् कलांबाबत वाढती जाण..
चित्रकला बहुतांशी वास्तुपाशी निगडित असते. आपल्या राहत्या घरामधील बैठकीच्या खोलीची, दिवाणखान्याची, शयनगृहाची किंवा भोजनकक्षाची व इतर भागांची शोभा वाढविण्याकरिता एक-दोन चित्रं त्यातील भिंतीवर आपण लावतो. त्यात कधी आपल्या कुटुंबीयांची, मित्र परिवारातील व्यक्तींची छायाचित्रं असतात. सुंदर, मनोहारी निसर्गचित्रं असतात. देवादिकांची सुरेख चित्रं असतात किंवा छानशी दिनदर्शिका असते. आकर्षक अशा हस्तकलेच्या वस्तू मांडलेल्या असतात. प्रत्येक दालनाच्या उपयुक्ततेला व आंतरसजावटीला पूरक ठरतील, अनुरूप असतील अशा तऱ्हेच्या चित्रांची, वस्तूंची आणि शिल्पाकृतींची निवड आपण तिथे लावण्यासाठी करतो. त्यातून राहत्या घराचा आकर्षकपणा व त्याची शोभा वाढवण्याचा प्रयत्न करीत असतो.
अशाच प्रकारे वेगवेगळी कार्यालये, शैक्षणिक संस्था, रुग्णालये तसेच अन्य तऱ्हेच्या वास्तूंमधील चित्रांची व शिल्पाकृतींची निवड आणि मांडणी या गोष्टी आंतरसजावटीचा भाग म्हणून केलेल्या असतात. यातून एक प्रकारचे प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचा उद्देश असतो.
शहरांतील वस्तुसंग्रहालयात किंवा कलादालनात मांडलेल्या चित्रांची व शिल्पाकृतींची गोष्ट वेगळी असते. निरनिराळय़ा काळातील कलाकारांच्या त्यांच्या वेगवेगळय़ा शैलीमध्ये निर्माण झालेल्या कलाकृती कायमस्वरूपी जतन करून त्यांची ओळख सर्वसामान्य जनतेला व्हावी, कलेविषयी त्यांना आवड निर्माण व्हावी हा त्यातील मुख्य उद्देश असतो. कलाविषयाचे अभ्यासक तसेच समाजजीवन व संस्कृती या विषयांच्या अभ्यासकांनादेखील अशा वस्तुसंग्रहालयांची व कलादालनांची मदत होत असते.
आता कलादालनामध्ये मांडलेल्या प्रदर्शनामधील चित्रांची व शिल्पांची गोष्ट जरा वेगळी असते. या प्रदर्शनांची कालमर्यादा काही दिवसांची अथवा काही आठवडय़ांची असते. इथे कलाकृतींची मांडणी कलाकाराने दोन उद्देशांनी केलेली असते. या प्रदर्शनामुळे त्या कलाकाराची व त्याच्या कलाशैलीची ओळख लोकांना होते, हा एक उद्देश. दुसरा उद्देश व्यावसायिक, प्रदर्शनातील कलाकृती लोकांनी पाहून ती विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवावी हा हेतू प्रदर्शन मांडताना कलाकाराचा असतो.
वस्तुसंग्रहालयात (म्युझिअम) किंवा कलादालनात (आर्ट गॅलरी) मांडलेल्या प्रदर्शनाची कालमर्यादा खूपच मोठी असते. तिथे व्यावसायिक दृष्टिकोन नसतो. लोकांनी, पर्यटकांनी जास्तीत जास्त संख्येने तेथील कलाकृती बघाव्यात, पुन्हा पुन्हा बघाव्यात, कलेचा आस्वाद घ्यावा, अभ्यास करावा, सर्वसामान्यांच्या मनात कलेसंबंधी प्रेम व आस्था निर्माण होऊन ती वृद्धिंगत व्हावी हा त्या प्रदर्शनाचा हेतू असतो.
याच विषयासंदर्भात एका मुद्दय़ाकडे वळू या. चित्रकला ही द्विमिती कला आहे. तिला लांबी व रुंदी किंवा जाडी आहे, उंची आहे. अशी दोन मापं आहेत. शिल्पकला ही प्रामुख्याने त्रिमिती आहे. तिला लांबी, रुंदी व जाडी किंवा उंची पण आहे म्हणून शिल्पाकृती सर्व बाजूने म्हणजेच ३६० अंशातून बघता येते. शिल्पाकृतींची मांडणी इमारतीच्या आत करता येते तशीच ती बाहेरही करता येते. शिल्प निळय़ा आकाशाखाली मैदानात, उद्यानात किंवा माळरानावर असू शकते. ते चौरस्त्यात असू शकते. डोंगरमाथ्यावर नाहीतर नदीकिनारी व सागरतीरावर असू शकते. खरंतर बाहेर मोकळय़ावर असलेली शिल्पाकृती प्रेक्षकाला अधिक भावते. कारण तिचे सौंदर्य नैसर्गिक छाया प्रकाशात छान खुलून येते. अर्थात ज्या ठिकाणी एखादे शिल्प बसवायचे त्या मोकळय़ा जागेचा विस्तार, ठेवण, सभोवारचा परिसर, त्यातील इमारती, झाडे, वृक्ष इत्यादी घटकांचा काळजीपूर्वक विचार करून त्या शिल्पाकृतीचे आकारमान ठरवावे लागते.
स्थापत्य रचनेमध्ये चित्रकला किंवा शिल्पकला या दृक् कलांसारख्या मूलभूत घटकांचा समावेश विशिष्ट वैचारिक भूमिकेतून जाणीवपूर्वक केला जातो तेव्हा सर्वसामान्य जनतेचे जीवनमान आपोआप समृद्ध होत जाते. सार्वजनिक ठिकाणी एखादी लक्षवेधक कलाकृती असेल तर ती बघून रोजच्या धावपळीच्या दिनक्रमात जाणवणारा मानसिक व शारीरिक थकवा कमी होण्यास सहज अजाणतेपणे मदत होते. उदाहरणार्थ, रुग्णालयाच्या स्वागत कक्षात किंवा प्रतीक्षाकक्षात असलेले लक्षवेधी चित्र अथवा शिल्प रुग्णांच्या व त्यांच्यासोबत असणाऱ्या आप्तेष्टांच्या मनावरचा ताण कमी करण्यास नकळत मदत करीत असते.
गेल्या एक-दीड दशकात सामान्यपणे लोकांच्या मनामध्ये दृक्कलेविषयी ओढ निर्माण झाल्याचे दिसून येते. कला प्रदर्शनाला भेट देण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा तुलनेने वाढले आहे. निवासी वास्तुप्रकल्प तसेच लहान-मोठी शैक्षणिक, वैद्यकीय, कार्यालयीन, औद्योगिक आणि अन्य प्रकारच्या वास्तुप्रकल्पात चित्रकला व शिल्पकला यांचा उपयोग यांचा उपयोग करून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. एवढेच नाही तर नद्यांवरील धरणे, पूल, महामार्ग यासारख्या अभियांत्रिकी रचनांमध्ये व लहान-मोठय़ा नगररचनांच्या प्रकल्प उभारणीत चित्र व शिल्प या दृक् कलांचा समावेश वाढीस लागलेला दिसतो. नागरी सौंदर्याची जाण वास्तुरचनाकार, प्रकल्प विकासक व उद्योग क्षेत्रामधील लोकांमध्ये वाढते आहे. याचे कारण या मंडळींचे पाश्चिमात्य व पौर्वात्त्य जगातील पुढारलेल्या देशांना कामानिमित्ताने भेटी देण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. साहजिकच तेथे अनुभवलेल्या नागरी सौंदर्याचा प्रभाव त्यांच्या भारतामधील प्रकल्पांमध्ये पडला तर नवल नाही.
दृक् कलांचा उपयोग वास्तुरचनेमध्ये करीत असताना केवळ वास्तूची शोभा वाढविणे हा एकांगी उद्देश मागे पडत आहे. चित्र, शिल्प, लँडस्केपिंग असे दृक् कलेचे सर्व प्रकार वास्तुरचनेचे अविभाज्य घटक आहेत असे मानून वास्तुरचना होऊ लागल्या आहेत. प्रकल्पाच्या आरेखनाच्या प्राथमिक अवस्थेतच या घटकांचा प्रकल्पामध्ये कशा तऱ्हेने समावेश करता येईल याचा विचार होऊ लागला आहे. दृक् कलांच्या निगडित असलेल्या कलाकारांबरोबर व तज्ज्ञांच्या बरोबर याविषयी सविस्तर चर्चा करून प्रकल्पाच्या संरचनेच्या प्रारंभिक अवस्थेतच दृक् कलांचे स्वरूप, त्यांची जागा, मांडणी हे सर्व निश्चित केले जात आहे. एकूणच आता वास्तुरचनाकार, नगररचनाकार, नागरी अभियंते व प्रकल्पविकासक यांच्यात ही जाण निर्माण होऊन ती वाढीस लागल्याचे दिसून येते. ही मोठी जमेची बाजू आहे. हे होत असताना प्रकल्पाच्या सुंदरतेचा दर्जा उच्चप्रतीचा राहील हे मात्र पाहावयास हवे. तशी काळजी घ्यायला पाहिजे.
त्रिवेणी कलासंगमाचे दर्शन स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरून व समोरच असणाऱ्या शिवाजी पार्कला लागून असलेल्या पदपथावरून फार चांगल्या तऱ्हेने होऊ शकेल व तसे व्हावयास हवे. पण दुर्दैवाने तसे होत नाही.