दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी त्याहीपेक्षा महत्त्वाचा सामना होता तो म्हणजे भारत-पाकिस्तान. हा सामना म्हणजे जणू युद्धच. सगळीकडे शुकशुकाट आणि दोन्ही देशांसाठी अभिमान असणारी मॅच. जिंकण्या-हरण्याचे पडसाद काय उमटू शकतात, लोकांच्या भावना (खास करून पाकिस्तानमध्ये) किती तीव्र होऊ शकतात, हे हा सामना पाहिल्यानंतर आपण समजू शकतो.
जेव्हा धोनीने टॉस जिंकला तेव्हाच मिसबाह-उल-हकच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता दिसली. त्याला ठाऊक होते की, या खेळपट्टीवर पहिली फलंदाजी करणे किती महत्त्वाचे होते ते, कारण धावांचा पाठलाग करणे केव्हाही कठीण असते. भारताने सावध व आत्मविश्वासपूर्वक फलंदाजी करत ३०० धावा जमवल्या. विराटने अतिशय संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातले आपले पाचवे शतक ठोकले, तर धवन आणि रैनानेदेखील त्याला उत्कृष्ट साथ दिली. दोघांनाही योग्य वेळी फॉर्म गवसला, ही भारताच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे.
पाकिस्तानी कर्णधार मिसबाह-उल-हकने या सामन्यात अनेक घोडचुका केल्या, म्हणजे युनूस खानला सलामीला पाठवण्याचा निर्णय, त्यानंतर रैना फलंदाजीला आला असताना तेज गोलंदाज न वापरता दोन्ही बाजूने स्पिनर्स चालू ठेवण्याचा निर्णय भलताच अंगलट आला आणि सामना सहजरीत्या गमावला.
आपला दुसरा सामनादेखील तितकाच महत्त्वाचा होता, किंबहुना माझ्या मते पाकिस्तानपेक्षा जास्त महत्त्वाचा. पाकिस्तानविरुद्ध आपल्या प्रेक्षकांच्या भावना जास्त जोडलेल्या असतात. भले स्पर्धा जिंकलो नाही तरी चालेल, परंतु कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानविरुद्ध जिंकले पाहिजे; परंतु दक्षिण आफ्रिका संघ मजबूत संघ म्हणून ओळखला जातो. त्यांच्याकडे स्टेन, मॉर्केलसारख्या जगप्रसिद्ध तेज गोलंदाजांची जोडगोळी आहे, तर फलंदाजीत एक से एक मॅचविनर आहेत. अमला, मिलर, डुमिनी आणि आजच्या घडीचा वनडेचा सर्वात बेस्ट फलंदाज ए.बी. डी’व्हिलियर्स आणि त्यात त्यांचे क्षेत्ररक्षण. या सामन्याच्या कामगिरीकडे बघता असे वाटते की, धोनीने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा योग्य निर्णय घेतला आणि तो शिखर धवन, विराट आणि रहाणेने सार्थ ठरवला. शिखर धवनने तर जणू मागची पाकिस्तानविरुद्धची इनिंग पुढे चालू ठेवलीय असे वाटत होते. स्टेन अथवा मॉर्केल यांचा कुठलाही मुलाहिजा न ठेवता सर्वाची त्याने यथेच्छ पिटाई केली. पहिली विराटबरोबर शतकी भागी करून डाव सावरला. त्यानंतर अजिंक्यबरोबर पुन्हा शतकी भागी करून मॅचविनिंग टोटल स्कोअर बोर्डवर लावला. अजिंक्य रहाणे ६० चेंडूंतच ७९ धावांची ‘सुनामी’ इनिंग खेळला. मला अजूनही प्रामाणिकपणे वाटतेय की, धवनबरोबर रहाणेने सलामीला यायला हवे आणि रोहितला मधल्या फळीत खेळवायला हवे, कारण सुरुवातीच्या १०-१२ षटकांत चेंडू जेव्हा जास्त स्विंग होतो तेव्हा रोहितचे फूटवर्क तेवढे होत नाही; परंतु अजिंक्य तंत्राच्या बाबतीत रोहितपेक्षा उजवा वाटतो आणि मुख्य म्हणजे तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
असो. जेव्हा आपण ३०७ धावा केल्या तेव्हाच जणू अर्धा सामना आपण जिंकलो होतो. सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला आपल्या तेज गोलंदाजांनी काबूत ठेवून दोन विकेट्स मिळवल्या व शेवटपर्यंत दबाव ठेवत एक मोठा विजय संपादन केला. या संपूर्ण सामन्यात तिन्ही क्षेत्रांत (फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण) भारताला १० पैकी १० गुण द्यायला हवेत. भारतीय संघाने आपल्या सगळय़ा रसिक प्रेक्षकांना एक आश्वासक विजय प्राप्त करून दिले आहेत. इथून आपला बादफेरीतला प्रवेश निश्चित आहे.
बाकीकडे पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका हे संघ संघर्ष करतायेत. लागोपाठ दोन्ही सामन्यांवरून पाकिस्तान आणि इंग्लंड संघ बादफेरीत तरी प्रवेश करेल का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आत्तापर्यंतचा सर्वात धक्कादायक निकाल असेल तर तो नवख्या आर्यलडकडून वेस्ट इंडिजचा पराभव. ३०६ धावांचा पाठलाग आर्यलडने चार षटके राखून सहज पार केला आणि आपण भल्या भल्या संघांची भंबेरी उडवू शकतो हे दाखवून दिले.
या आठवडय़ात फलंदाजांनी जरी बाजी (सहा शतके) मारली असेल तरी गोलंदाजांनीदेखील चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शने इंग्लंडविरुद्ध पाच बळी घेतले, तर त्याच सामन्यात इंग्लंडच्या स्टीव फिनने हॅट्ट्रिकसकट पाच बळी घेतले होते; परंतु माझा बोलर ऑफ द वीक होता न्यूझीलंडचा टीम साऊदी. आजही स्विंग गोलंदाज भन्नाट गोलंदाजी करून एकहाती मॅच जिंकून देऊ शकतो हे साऊदीने सिद्ध करून दाखवले आहे. हवामान व न्यूझीलंडमधील खेळपट्टीचा योग्य फायदा घेत केवळ ३२ धावांत ७ बळी घेतले आणि न्यूझीलंडने ११२ धावा केवळ १२ षटकांत पूर्ण करून साहेबांच्या जखमावर मीठ चोळले.
माझा या आठवडय़ाचा मानकरी शिखर धवन आहे. जो माणूस फॉर्मसाठी झगडत होता, ज्याच्यावर प्रचंड टीका होत होती; परंतु धवनने लढवय्या वृत्तीचे प्रदर्शन दाखवून भारताला अत्यंत आश्वासक सुरुवात करून दिली आणि अशा फायटरचे मला कौतुक आहे. पुढचा आठवडा अनेक संघांसाठी महत्त्वाचा असून काही संघांना बॅग पॅक करायलादेखील लावणारा असू शकतो. त्यामुळे आपण वाट पाहू या पुढच्या आठवडय़ाची.
सुलक्षण कुलकर्णी
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2015 रोजी प्रकाशित
वेध विश्वचषकाचा : शिखर नावाचा फायटर…
साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या क्रिकेट विश्वचषक २०१५ चे अगदी दिमाखदार पद्धतीने उद्घाटन झाले आणि पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने पारंपरिक इंग्लंडला धोबीपछाड दिली.

First published on: 27-02-2015 at 01:29 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawan