‘लांग्कावी’ म्हणजे मलेशियाच्या पश्चिमेकडे असलेला निसर्गरम्य द्वीपसमूह. मलेशियन भाषेमध्ये गरुडाला ‘हेलंग’ म्हणतात आणि ‘कावी’ म्हणजे संगमरवर जे इथल्या बेटांवर खूप मिळतं, या दोन्हींचं मिळून ‘लांग्कावी’ झालं. लांग्कावी हा ९९ बेटांचा समूह आहे. यातील फक्त तीन बेटांवरच मनुष्यवस्ती आहे. बाकीची ९६ बेटं ही निर्मनुष्य आहेत, कारण त्यातली बरीचशी बेटं ही संपूर्णपणे दगडाची आहेत, समुद्रातील ज्वालामुखीमुळे तयार झालेली. काही काही बेटं खूपच छोटी आहेत. लांग्कावी म्हणजे दाट जंगले आणि सुंदर समुद्रकिनारे. विषुववृत्ताच्या अगदी जवळ असल्यामुळे इथे कायमस्वरूपी पाऊस असतो आणि त्यामुळे हा प्रदेश गर्द हिरवा आहे.
पूर्वी लांग्कावी बेटं ही समुद्री चाच्यांची आवडती जागा होती. असं म्हणतात की, या बेटांमध्ये त्यांच्या लपायच्या खूप साऱ्या जागा होत्या. आत्ता पण असतील कदाचित.. त्याबद्दल काही कळलं नाही. बेटांच्या पश्चिमेकडे असलेल्या अंदमान सागरात चाचेगिरी करून ते लांग्कावीच्या बेटांमध्ये आसरा घेत असत. या बेटांबद्दलची आणखी माहिती म्हणजे १९०९ च्या ‘अंग्लो-सिअमेस’ कराराप्रमाणे लांग्कावी हे ब्रिटिशांना देण्यात आलं. मलेशिया स्वतंत्र होईपर्यंत लांग्कावीवर ब्रिटिशांचं राज्य होतं.
कौलालंपूरहून आम्ही भल्या पहाटे विमानाने लांग्कावीला निघालो. कौलालंपूरपासून हा साधारण एक ते दीड तासाचा प्रवास. सकाळी साडेआठच्या आसपास आम्ही लांग्कावीच्या विमानतळावर उतरलो. बाहेर खूप सुखद गारवा होता. नजर जाईल तिथे फक्त हिरवा रंगच दिसत होता. शेतांपासून ते डोंगरापर्यंत हिरव्या रंगाच्या अगणित छटा पाहून मन प्रसन्न झालं. इथे यायच्या आधी इंटरनेटवर या जागेबद्दल काही माहिती गोळा केली होती आणि काही छायाचित्रंही आणली होती. पण ‘याचि देही याचि डोळा’ जे पाहिलं ते अतिशय सुंदर आणि नयनरम्य होतं.
विमानतळावरून आम्ही आमच्या हॉटेलकडे जायला निघालो. हा साधारण २०-२५ मिनिटांचा प्रवास होता. ही बेटं प्रेक्षणीय स्थळांपैकी असूनसुद्धा बिलकूल गर्दी नव्हती, ना वाहनांची ना माणसांची. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो आणि तेथील नजारा तर आणखीनच सुंदर होता. आमचं हॉटेल अगदी समुद्रकिनाऱ्यावर होतं. किनाऱ्याला लागून हॉटेलने एक डेक बांधला होता आणि तिथून समोरचं दृश्य विलोभनीय होतं. समोर अनेक बेटं एकामागे एक उभी राहून आमचं स्वागतच करत होती जणू. ते दृश्य पाहत डेकवर अध्र्या तासाची समाधीच लागली.
इथे आपल्याला फिरण्यासाठी दोन-तीन वेगवेगळ्या ट्रिप्स आहेत. एका ट्रिपमध्ये आपल्याला दोन-तीन तासांसाठी बेटांमध्ये तयार झालेल्या खारफुटीच्या जंगलांमधून फिरायला नेतात. त्यात एक तरंगणारे, स्थानिक कोळी गाव तयार केलं आहे. त्यात समुद्रात मिळणारे ‘आर्चर फिश’, ‘स्तिन्ग्रे’, ‘सी अर्चिन’ वगैरे मासे ठेवलेत. या माशांची माहिती दिल्यानंतर त्यांना ‘खायला’ घालणे असा कार्यक्रम असतो. तिथून पुढे एका गुहेकडे नेतात ज्यात मगरींचे प्रजोत्पादन होते. इथे म्हणे मगरी येऊन अंडी घालतात. स्थानिक
लांग्कावीमध्ये येण्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ही विशेषत: पक्ष्यांच्या छायाचित्रणासाठी अफलातून जागा आहे. बोटवाले जिथे बोट थांबवतात तिथे साधारण पाच मिनिटांत २०-२५ ‘ब्राह्मिनी घारी’ आणि गरुडांचा एक मोठ्ठा जथ्था आकाशात दिसायला लागला. बोटीच्या नावाडय़ाने मांस आणि मासे पाण्यात टाकलं. त्यानंतरचा देखावा अप्रतिम होतो. ते पक्षी आकाशातून त्यांचं खाणं हेरत होते आणि मग पाण्यात झेपावून ते उचलून परत आकाशाकडे झेपावत होते. हे कॅमेऱ्यात पकडताना छायाचित्रणाचं कसब पणाला लागतं. कारण पक्षी ज्या तऱ्हेने पाण्यात झेपावतात ते कॅमेऱ्यामध्ये टिपणं, तेही बोट हलत असताना, म्हणजे खरंच कसरतच होती. पण खूपच मस्त अनुभव होता तो. त्या पक्ष्यांचे फोटो काढणे हा एक ‘थरार’ वाटला. या ठिकाणी साधारण २० मिनिटे थांबतात, पण आम्ही त्यांना सांगून जवळजवळ ४० मिनिटे थांबलो.
यानंतर आम्हाला एका गुहेकडे नेण्यात आलं. ती गुहा म्हणजे वटवाघळांची कॉलनी होती. हजारो वटवाघळे त्या गुहेमध्ये होती. तिथे किर्र्र काळोख होता. आम्हाला छोटे टॉर्च देण्यात आले आणि सांगितलं गेलं की आम्ही जो आखून दिलेला रस्ता आहे त्यावरच चालायचं आणि मध्येमध्ये टॉर्च छतावर मारून वटवाघळं पाहायची. जरा अनोखाच प्रकार होता. तशी ही जागा सगळ्यांना आवडत नाही. कारण या गुहेमध्ये एक विचित्र ‘कुबट’ वास येतो तो अनेकांना सहन होत नाही.
या खारफुटी जंगलांच्या सफरीत खूप खासगी यॉट्स दिसले. गाइडला विचारलं असता असे कळले की या यॉट्स/ बोटी काही धनाढय़ लोकांच्या आहेत आणि त्या ते इथे ठेवून (पार्क करून) जातात आणि जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा त्या घेऊन सफारी करतात.
दुसऱ्या दिवशी आम्ही तीन बेटांच्या सफरीवर गेलो. या सफरीत तीन बेटांवर नेतात आणि ते पण इथले कोळी लोक वापरतात त्या स्पीड बोटमधून. या बोटी खूप छोटय़ा असतात. समुद्र शांत असेल तर त्यातून प्रवास करायला काहीच वाटत नाही, पण तो जर खवळलेला असेल तर हा प्रवास म्हणजे एक साहसच असतं. आम्ही लांग्कावीमध्ये होतो त्यावेळी समुद्र खूप खवळलेला होता. सुरुवातीला आम्हाला सगळ्यात मोठय़ा बेटावर नेण्यात आले. त्याचे नाव ‘दयांग बुन्तिंग मार्बल’. याचा अर्थ ‘गरोदर बाईचा तलाव.’ या
तेवढय़ात आकाशात पावसाळी ढगांनी खूपच गर्दी केली होती आणि पाऊस पडायला लागला. वाऱ्याचा वेगही वाढला आणि बोट खूपच हेलकावे घ्यायला लागली. तिथे पाच-सात बोटी होत्या आणि सगळ्यांसाठीच हा कधीही न घेतलेला अनुभव होता, जरा भीतिदायकच होता. कारण आम्ही खाडीच्या मध्ये होतो आणि जमीन खूप लांब होती.
समुद्राच्या-खाडीच्या मध्यात, सोसाटय़ाचा वारा सुटलेला असताना, बोट भीतिदायक पद्धतीने हिंदकळत असणे हे मनाला चर्र करणारं होतं. आमचा नावाडी मात्र अगदी शांत होता आणि त्याने शांतपणे सांगितले की, आता आपल्याला तिसऱ्या बेटाकडे जायचं आहे आणि त्याने तशा वातावरणात बोट सुरू केली आणि जणू काही समुद्रात सगळं आलबेल आहे, अशा थाटात नेहमीच्या पद्धतीने बोट चालवायला सुरुवात केली. सगळ्या बोटींमधल्या पर्यटक मंडळींचं धाबं दणाणलं होतं. सगळे जीव मुठीत धरून किनारा कधी येतो याची वाट पाहत होते. मध्ये मध्ये नावाडय़ाला ‘हळू चालव’ असं इंग्लिशमध्ये किंवा खुणा करून सांगत होते. अनेक वेळा असं वाटलं की खवळलेल्या समुद्राच्या लाटा बोटीमध्ये येणार आणि मग आपलं काही खरं नाही. एव्हाना पावसाने खूपच जोर धरला होता आणि समुद्रही खूपच खवळलेला होता. बोट या सगळ्यांवर मात
एक तास पूर्ण व्हायची वाट पाहत, बोचऱ्या वाऱ्यात वेळ काढला. अखेर आमचा नावाडी आला एकदाचा आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. अजूनही समुद्र खवळलेलाच होता. कधी एकदा किनाऱ्यावर पोचतोय असं झालं होतं. एकंदरीत ही बेटांची सफर म्हणजे एक जगावेगळा अनुभव होता. या सफरीच्या दरम्यान लॅण्डस्केप्स आणि पक्षी अशा दोन्ही प्रकारच्या छायाचित्रणाचा मस्त अनुभव मिळाला.
लांग्कावीबद्दल एक चित्र डोक्यात ठेवून आलो होतो, पण जे काही पाहिलं, चित्रित केलं, अनुभवलं ते इंटरनेटवर पाहिलेल्या माहितीपेक्षा खूप खूप सुंदर होतं, अविस्मरणीय होतं. आपण देशांतर्गत किंवा परदेशात फिरायला जातो तेव्हा सगळे जण जातात त्या ठिकाणी जावंच, पण अशा काही जागांचा शोधसुद्धा घेऊन त्या जागांना पण जरूर भेटी द्याव्यात. सगळे लोक जिथे जातात तिथे साहजिकच खूप गर्दी असते, पण सुट्टीचा खरा आनंद, शांतता अनुभवण्यासाठी ‘लांग्कावी’सारख्या जागांना जरूर भेटी द्याव्यात. इथे आपल्याला स्थानिक लोक, त्यांचे रीतीरिवाज, त्यांचे सण, त्यांचे राहणीमान इत्यादी अनेक गोष्टी पाहायला मिळतात आणि अनुभवायलासुद्धा मिळतात.
तेव्हा ‘लांग्कावी’सारख्या अशाच कुठल्यातरी ठिकाणी आपण भेटू…
संग्रहित लेख, दिनांक 8th Aug 2014 रोजी प्रकाशित
‘लांग्कावी’ – बेटं नव्हे स्वर्ग
लांग्कावीबद्दल एक चित्र डोक्यात ठेवून आलो होतो, पण जे काही पाहिलं, चित्रित केलं, अनुभवलं ते इंटरनेटवर पाहिलेल्या माहितीपेक्षा खूप खूप सुंदर होतं, अविस्मरणीय होतं.
First published on: 08-08-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel special