महाराष्ट्राचा दक्षिण दरवाजा म्हणजे कोल्हापूर. रांगडे, मर्दानी आणि दिलदार लोकांचा प्रदेश. चटकदार मिसळीचा आणि झणझणीत तांबडय़ा-पांढऱ्या रश्शाचा. लाल मातीमधल्या कुस्तीचा आणि पन्हाळा-जोतिबाचा संपन्न, समृद्ध, उद्योगशील असा हा परिसर. करवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या कृपाछत्राखाली असलेला प्रदेश. पंचगंगेच्या काठावरील या समृद्ध प्रदेशावर इ.स. च्या दहाव्या शतकामध्ये बलशाली शिलाहार घराण्याचे राज्य होते. शिलाहार राजवंशाच्या तीन शाखा होत्या, त्यातली ही दक्षिण महाराष्ट्रातली शाखा सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भूभागावर राज्य करीत होती. पर्नालकदुर्ग ऊर्फ पन्हाळा ही त्यांची राजधानी. प्राचीन काळापासून हा प्रदेश उद्योजक, कलाकार, स्थपती, तंत्रज्ञ यांनी संपन्न आहे. कोकणच्या सरहद्दीवरील कोल्हापुरातून कोकणात उतरण्यासाठी वेगवेगळे घाटरस्ते आहेत. सुजलाम् सुफलाम् अशा या परिसराची भटकंती कायमच रम्य अशी होते.

गडिहग्लज-चंदगड
कोल्हापूरच्या दक्षिणेचे गडिहग्लज आणि चंदगड हे तालुके अत्यंत रमणीय निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. सामानगड, कलानंदीगड, पारगड हे किल्ले गाडीरस्त्यामुळे सहज जाण्याजोगे आहेत. कोल्हापूरपासून अंदाजे ७०-८० कि.मी. अंतरावर असलेली ही ठिकाणे तिथल्या संपन्न निसर्गामुळे भेट देण्याजोगी आहेत. तसेच आजरा आणि सावंतवाडी संस्थांचे गिरिस्थान असलेले आंबोली इथून अगदीच जवळ आहेत. कोणत्याही ऋतूमध्ये चंदगड परिसरात गेले तरी उत्तमच. पण धबधबे आणि मुसळधार पावसाच्या अनुभवासाठी खास पावसाळ्यात तिथे जायला हवे. चंदगडजवळ तिलारी नदीवर बांधलेले धरण आवर्जून पाहण्याजोगे आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांनी संयुक्त बांधलेले धरण. यातून गोव्यामध्ये वीजनिर्मिती केली जाते. चंदगडी भाषा ही खास ऐकण्याजोगी आहे. बेळगावी आणि मालवणी भाषेचे मिश्रण असलेली ही भाषा ऐकायला फार मधुर वाटते. मंदिरांचा अभ्यास करणाऱ्या मंडळींसाठी हे दोन तालुके म्हणजे पर्वणी आहे. अनेक जुनी मंदिरे, जुळी जैन मंदिरे, िहगुळा देवीचे मंदिर अशा अनेक गोष्टींची रेलचेल या भागात आहे.

कणेरी मठ
कोल्हापूरपासून बंगळूरूच्या दिशेने जायला लागले की जेमतेम १० कि.मी. वर कणेरीचा फाटा लागतो. तिथे उजवीकडे वळले की ४ कि.मी. वर कणेरी मठ आहे. येथे एक प्राचीन शिवमंदिर असून इथल्या शिविलगाची स्थापना १४ व्या शतकात एका िलगायत धर्मगुरूने केल्याचे सांगितले जाते. या कणेरी मठाचे सिद्धगिरी संग्रहालय अत्यंत देखणे आणि आवर्जून भेट देण्याजोगे आहे. या संग्रहालयाचा मुख्य उद्देश हा की लोप पावत चाललेल्या स्वयंपूर्ण ग्रामजीवनाची आजच्या पिढीला ओळख करून देणे. त्यासाठी इथे पद्धतशीर प्रयत्न केलेले दिसतात. तत्कालीन समाजाच्या सर्व गरजा पूर्ण करणारे बारा बलुतेदार कोण होते, त्यांची ओळख विविध शिल्पांद्वारे या ठिकाणी अतिशय सुरेख पद्धतीने केलेली पाहायला मिळते. ७ एकर एवढय़ा परिसरात पसरलेल्या या संग्रहालयामध्ये ८० विविध देखावे जवळजवळ ३०० पुतळ्यांच्या द्वारे सादर केलेले आहेत. संपूर्ण खेडय़ातील जिवंतपणा, नेमकेपणा या देखाव्यांद्वारे सदर केला आहे. ग्रामजीवनाच्या विविध पलूंचे नेमके दर्शन या संग्रहालयाद्वारे आपल्याला होते. हे संग्रहालय मोकळ्या जागेवर असल्यामुळे पाण्याची बाटली, टोपी आणि गॉगल या गोष्टी लक्षात ठेवून जवळ ठेवाव्यात. सदर संग्रहालय दिवसभर उघडे असून त्याला प्रवेशमूल्य आहे.

गगनबावडा
कोल्हापूरचे थंड हवेचे ठिकाण असलेले गगनबावडा कोल्हापूरपासून ५५ कि.मी.वर आहे. इथून कोकणात उतरायला दोन घाटरस्ते आहेत. एक करूळ इथे जाणारा गगनबावडा घाट, तर दुसरा खारेपाटणला जाणारा भुईबावडा घाट. गगनबावडा ऐन घाटाच्या तोंडावर वसले आहे. हिरवेकंच डोंगर, पश्चिमेकडून येणारा गार वारा आणि निखळ शांतता लाभलेला हा परिसर रमणीय आहे. घाटाच्या तोंडाशी आहे गगनगड किल्ला आणि त्यावर असलेला गगनगिरी महाराजांचा मठ. तिथपर्यंत उत्तम गाडीरस्ता आहे. गगनबावडा एस.टी कॅन्टीनला मिळणारा कट वडा अगदी न चुकता खावा. इतकी भन्नाट चव दुसरीकडे मिळणे केवळ अशक्यच. बॉलीवूडलासुद्धा या प्रदेशाची भुरळ पडली असल्याने अनेक िहदी-मराठी सिनेमांचे चित्रीकरण इथे होत असते.

पळसंबे मंदिरे
तामिळनाडूमधील महाबलीपुरमची एकाश्म मंदिरे (रथ या नावाने ओळखली जातात) पाहायला जगभरातून लाखो लोक येतात, पण महाराष्ट्रातील एकाश्म मंदिरे स्थानिक लोकांशिवाय फारशी कोणाला परिचित नाहीत. कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर कोल्हापूर पासून ४० कि.मी. अंतरावर आसळज गाव आहे. तिथून ४ कि.मी. अंतरावर पळसंबे या गावी एका ओढय़ातच रामिलगेश्वर नावाने ओळखली जाणारी जागा म्हणजेच ही एकाश्म मंदिरे होत. त्या ओढय़ात काही अजस्र शिळा आहेत. त्यांचा खालचा भाग तसाच ठेवून वरच्या अध्र्या भागात कोरीव मंदिर उभारले आहे. तीन वेगवेगळ्या प्रकारची ही खोदीव मंदिरे आहेत. इथे बांधलेल्या पायऱ्यांच्या वाटेने ओढय़ाकडे उतरत जावे. तिथे दाट झाडीत एकाच पाषाणातून कोरून काढलेले मंदिर सामोरे येते. दक्षिण काशी कोल्हापूर आणि पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या सीमेवरील ही मंदिरे आजही दुर्लक्षितच आहेत.

* कोल्हापूर-पळसंबे-गगनबावडा हे एका दिवसामध्ये होऊ शकते. तसेच कोल्हापूर-राधानगरी-दाजीपूर या ठिकाणी २ दिवस तरी द्यावेत. मुक्काम शक्यतो जंगलात दाजीपूरलाच करावा.

* कोल्हापूर-जयसिंगपूर-नरसोबाची वाडी-कुरुंदवाड-खिद्रापूर-कोल्हापूर यासाठी २ दिवस हवेत. मुक्काम नरसोबाच्या वाडीला करावा. खिद्रापूरला मुक्कामाची विशेष सोय नाही.

* कोल्हापूर-आंबा-पावनिखड-कोल्हापूर हा पण एक महत्त्वाचा प्रवासमार्ग. आंब्यामध्ये राहण्याच्या चांगल्या सोयी आहेत.

* कोल्हापूर-गडिहग्लज-चंदगड-पारगड-आंबोली-कोल्हापूर हा प्रवासमार्ग निसर्गप्रेमींसाठी अगदी आवश्यक आहे. मुक्काम गडिहग्लजला करता येईल. आंबोली हे नावाजलेले पर्यटनस्थळ असल्यामुळे इथला मुक्काम खर्चीक आहे. 
या संपूर्ण प्रदेशात खाण्या-पिण्याची रेलचेल आहे. शाकाहारी तसेच मांसाहारी खवय्यांसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

राधानगरी आणि दाजीपूर
कोल्हापूरवरून फोंडाघाटमाग्रे जाणारा रस्ता दाजीपूर आणि राधानगरी या नितांत रमणीय गावांवरून जातो. राधानगरीला भोगावती नदीवर धरण बांधलेले आहे तर दाजीपूर हे गव्यासाठीचे अभयारण्य म्हणून घोषित झाले आहे. कोल्हापूरहून अवघे ५४ कि.मी. असलेल्या राधानगरीला अत्यंत सुंदर निसर्गाचा सहवास लाभलेला आहे. राधानगरी वन्यजीव अभयारण्यात अंजन, जांभूळ, आंबा, किंजल, हिरडा अशा वृक्षांची गर्दी आहे. कमलभरव आणि कालभरव अशी दोन मंदिरे या अभयारण्यात आहेत. गव्यांसाठी संरक्षित केलेल्या या अभयारण्यात खंडय़ा, बुलबुल, वेडा राघू, सातभाई असे विविध प्रकारचे पक्षीदेखील आढळून येतात. वनविभागाचे रेस्ट हाउस, डाक बंगला आणि डॉर्मिटरी राहण्यासाठी मिळू शकतात.
संपर्क : डेप्युटी कॉन्झर्वेटर फोरेस्ट, कोल्हापूर. ०२३१- २५४२७६६.
स्थानिक वनरक्षण समिती राधानगरीतर्फेदेखील तंबू निवासात राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जाते. संपर्क : ०२३१- २०३७१८ भ्रमणध्वनी : ९५४५७०३३२२ /९९६००८६५८५

नरसोबाची वाडी
कोल्हापूरपासून ५१ कि.मी. वर कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर वसले आहे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंहपूर अर्थात नरसोबाची वाडी. दत्तात्रेयांचे अवतार श्रीनृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी १२ वर्षे वास्तव्य होते असे सांगितले जाते. श्रीनृसिंह सरस्वतींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्याबद्दलचे अनेक चमत्कार इथे घडल्याचे सांगितले जाते. श्रीनृसिंह सरस्वतींच्या पादुकांची इथे पूजा केली जाते. ऐन पावसाळ्यामध्ये कृष्णेला पूर येतो, तेव्हा मंदिर पाण्याखाली जाते. पुराच्या पाण्याच्या खुणा त्यानंतरसुद्धा मंदिर परिसरावर दिसत राहतात.
इथूनच पुढे ३ कि.मी. वर कुरुंदवाड आहे. स्वातंत्र्यापूर्वी हे एक संपन्न संस्थान होते. कुरुंदवाडला नदीवर बांधलेला घाट आवर्जून पाहण्याजोगा आहे. इथून खिद्रापूर जेमतेम १५ कि.मी. वर आहे.

खिद्रापूरचा कोप्पेश्वर महादेव
कृष्णेच्या काठी असलेले खिद्रापूर येथील कोपेश्वर महादेवाचे मंदिर मुद्दाम वेळ काढून पाहण्याजोगे आहे. कोल्हापूरपासून अवघ्या ६० कि.मी. वर असलेले इतके सुंदर आणि शिल्पसमृद्ध मंदिर पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्वचितच पाहायला मिळेल. शिलाहार राजवटीमधील स्थापत्याचे हे अत्यंत देखणे उदाहरण आहे. शिलाहारांचे स्थापत्य उत्तर चालुक्य आणि होयसळ स्थापत्याशी मिळतेजुळते आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आणि खिद्रपूरचे कोपेश्वर महादेव मंदिर ही त्याची अत्यंत सुंदर उदाहरणे होत. या मंदिराला असलेला स्वर्गमंडप ही केवळ एकमेवाद्वितीय रचना म्हणावी लागेल. १३ फूट व्यासाचा स्वर्गमंडप, त्याच मापाची त्याखालची रंगशिळा आणि मंदिरावर असलेल्या विविध देवदेवता, सुरसुंदरी, अष्टदिक्पाल यांच्या मूर्ती, गजधर या सर्व गोष्टी डोळे भरून पाहायलाच हव्यात. शिल्पजडित विविध खांब, गवाक्ष या आणि इतर गोष्टी तिथे जाऊनच पाहायला हव्यात. त्याचे शब्दात वर्णन केवळ अशक्य आहे. इतकी सुंदर कलाकृती मात्र बऱ्याचअंशी दुर्लक्षित आहे. याच मंदिरापासून जेमतेम २०० फुटावर अगदी याच शैलीमधील जैन मंदिर आहे. मंदिर स्थापत्य शैली आणि मंदिरावरील मूर्ती अगदी एकाच शिलाहार काळात केल्याचे जाणवते.