गौलकडे प्रयाण केले. ‘गौल’ म्हणजे श्रीलंकेचे दक्षिण टोक. समोर अथांग पसरलेला हिंदी महासागर होता. ‘गौल’ तसं छोटंसं शहर. इथे पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच अशा तीनही राजवटींचा प्रभाव जाणवतो. हे शहर थोडंसं गोव्यासारखं वाटलं.
एव्हाना चांगल्यापैकी पावसाला सुरुवात झाली होती. जयान्था सारखा त्याच्या मित्रांशी फोनवरून पुढच्या रस्त्याबद्दलची माहिती घेत होता. आता सूर्यही अस्ताला जायची वेळ जवळ आली होती. पावसाचा जोर वाढत होता आणि आजूबाजूला ‘किर्र्र’ काळोख दाटू लागला होता. आम्हाला शक्यतोवर अंधार पडायच्या आत तीन ओढासदृश नद्या पार करायच्या होत्या.
पहिल्या ओढय़ाच्या ठिकाणी पोचलो. वाहनांची बरीच रांग लागली होती. नदीवरच्या त्या पुलाला कठडाच नव्हता आणि पाणी साधारण दीड फूट तरी पुलावरून वाहत होतं. आमच्या पुढे एक मोठी गाडी होती आणि तिच्या मागे जाऊ या असं आम्ही जयान्थाला सांगितलं, पण तो बिलकूल तयार नव्हता. काही वेळाने तो तयार झाला. पुलाचे अंतर १०० मीटर असेल. आम्ही साधारण अध्र्यात पोचलो आणि समोरची ती गाडी बंद पडली. वाटलं आता आपण वाहूनच जाणार बहुतेक. पण आम्ही त्या गाडीला ‘ओव्हरटेक’ केलं आणि पुढे निघालो.
नशिबाने पुढे म्हणावा तितका त्रास झाला नाही आणि साधारण रात्री साडेआठच्या सुमारास आम्ही ‘याला’ला पोहोचलो. आम्ही राहणार होतो ती जागा ‘याला नॅशनल पार्क’ला अगदी लागून होती. आम्ही हॉटेलजवळ पोहोचत असतानाच अचानक समोर दोन-तीन जंगली हत्ती समोर आले. गाडीचे दिवे पाहून ते आमची वाट सोडून बाजूला गेले. पुढे हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत ससे, रानडुकरे इत्यादी प्राणीही सामोरे आले.
हॉटेलमधले सगळे सोपस्कार पूर्ण केले. आमच्या खोल्यांकडे जायला निघालो तर हॉटेलवाल्यांनी सांगितले की आम्ही एकटे जाऊ शकत नाही. त्यांचा एक माणूस आम्हाला घेऊन जाईल. कारण हे हॉटेल छोटय़ा छोटय़ा हट्सचे होते आणि तिथे जायच्या वाटांवर अनेक वन्यजीव फिरत असत. त्यांना आपल्यामुळे तसेच आपल्याला त्यांच्यामुळे काही त्रास होऊ नये म्हणून हॉटेलवाले त्यांचा माणूस बरोबर देतात.
आदल्या दिवशी इतके दमलेले असूनसुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाला सगळे जागे झाले आणि सगळे एकदम फ्रेश. आवराआवर करून आम्ही हॉटेलच्या आवारातच फिरण्याचा निर्णय घेतला. सफारीसाठी दुपारची वेळ पक्की केली. हॉटेलच्या परिसरातच एक सुंदर आणि खूप मोठे तळे होते. खूप पक्षी दिसत होते. मी माझा कॅमेरा सरसावूनच होतो. तिथे एक ‘वॉच टॉवर’ बांधला होता, जिथून आजूबाजूच्या विस्तीर्ण परिसराचे दर्शन होत होते. आम्ही तिथे जाऊन मुक्काम ठोकला. त्या तळ्यामध्ये एक बेट तयार झालं होतं. तिथे काही पाण्याजवळ असणारे पक्षी दिसत होते. मी त्यांचे फोटो काढत होतो. थोडय़ा वेळात तिथल्या पाण्यात हालचाल झाली आणि पाहतो तर काय, एक मगर पाण्यातून त्या बेटावर ऊन खायला आली होती. दहा-बारा फुटांची जंगली मगर पाहायची माझी पहिलीच वेळ..
त्या वॉच टॉवरवर आम्ही जवळजवळ दोन तास काढले. आता ‘याला’मध्ये सफारीला जायची वेळ जवळ आली होती. ‘याला’ श्रीलंकेच्या दक्षिण-पूर्वेला आहे. ‘याला नॅशनल पार्क’ हे आशियातील पहिल्या पाच मोठय़ा अभयारण्यापैकी एक आहे. त्याचे पाच भाग केले आहेत. सर्वसाधारण पर्यटक (आमच्यासारखे) त्यातल्या फक्त एकाच भागात जाऊ शकतात. उरलेल्या चार भागांपैकी दोन भाग हे काही ठरावीक लोकांसाठीच आहेत, जसे ‘नॅशनल जिओग्राफिक किंवा या अभयारण्यातील जीव-जंतू, वनस्पती, फुले इत्यादींचा अभ्यास करणारे. उर्वरित दोन भागांमध्ये अभयारण्यातील लोकांशिवाय इतर कोणालाही प्रवेश नाहीये.
आपल्याला ‘बिबळ्या’चे दर्शन व्हावे, फोटो पण काढता यावेत अशी सुप्त इच्छा मनात ठेवून आम्ही सफारीसाठी निघालो. ‘याला’च्या मेनगेटच्या रस्त्यावरच आम्हाला खूप पक्षी पाहायला मिळाले. हॉटेलमधून बाहेर पडता पडता त्या तळ्याकाठी सकाळसारखीच एक मोठी मगर पाहायला मिळाली, आमच्यापासून १०-१५ फुटांवर ती शांतपणे ऊन खात तोंड पूर्ण उघडे ठेवून पहुडली होती. तिच्या आसपास काही छोटय़ा मगरी किंवा पिल्लेही होती.
‘याला’च्या गेटजवळ आमचे स्वागत एका मोराने केले. आमच्या जीपवाल्याकडे पक्ष्यांची माहिती असलेले मस्त पुस्तक होते आणि तो जीप चालवता चालवता आजूबाजूला लक्ष ठेवून होता. पक्षी दिसले की गाडी थांबवून आम्हाला माहिती पण देत होता. आम्ही हळूहळू ‘याला’ जंगलात आत चाललो होतो आणि तेवढय़ात एक नयनरम्य दृश्य दिसले. एक मोर आपला पिसारा फुलवून नाच करत होता. त्याच्या आसपास दोन लांडोरीही होत्या.
आता खरं म्हणजे आमची नजरही पक्ष्यांपेक्षा ‘बिबळ्या’चा शोध घेत होती. वाटेत ग्रीन बीटर्स, स्टोर्क्स, ओपन बिल्ड स्टोर्क्स, टर्न्स, गॉडविट्स, स्टिल्ट्स (ॅ१ील्ल ुीं३ी१२, र३१‘२, डस्र्ील्ल इ्र’’ी िर३१‘२, ळी१ल्ल२, ॅ५्रि३२, र३्र’३२) असे अनेक पक्षी दिसले. पण आता नजर ‘बिबळ्या’चा शोध घेत होती. मध्येच एक हरणांचा कळप दिसला, मुंगुसं दिसली. कॅमेरे त्यांचं काम चोख करत होते.
एका झुडपाजवळ एक मुंगुस दिसले म्हणून मी कॅमेरा सरसावून फोकस करत असताना मला जाणवले, की त्या मुंगुसाने एका मोठय़ा सरडय़ाची शिकार केली आहे आणि तो त्याला खातोय. मी त्या सगळ्या प्रसंगाचे १९ फोटो काढले, ज्यात तो मुंगुस त्या सरडय़ाला कसे खातोय याचे ‘स्टेप बाय स्टेप’ चित्रीकरण करायला मिळाले.
वाटेत अगदी दहा फुटांवरून एक हत्तींचा कळप पाहायला मिळाला. त्यात एक छोटे पिल्लूही होते. आम्ही जसे जंगलात फिरत होतो तसे इतर अनेक लोकही फिरत होते. प्रत्येक गाडीचा चालक एकमेकांशी संपर्क ठेवून होता. एखाद्याला बिबळ्या दिसला तर तो लगेच इतरांना कळवायचा. त्या संध्याकाळी कोणालाच दिसला नव्हता बिबळ्या..
फिरता-फिरता जीपचा चालक अचानक थांबला आणि आम्हाला पण त्याने शांत राहायला सांगितलं. त्याच्या तीक्ष्ण कानांनी बिबळ्याची गुरगुर ऐकली होती.. आम्हाला पण नंतर ऐकू आली. चालक त्याचा पूर्वानुभव पणाला लावून तो कुठे दिसू शकेल याचा अंदाज बांधत जीप हाकत होता. शेवटी आम्हाला त्या संध्याकाळी बिबळ्याची ‘गुरगुर’ ऐकण्यावर समाधान मानत बाहेर पडावे लागले. कारण अंधार पडला होता.
पुढच्या दिवशी सकाळची सफारी होती आणि त्यासाठी आम्हाला सकाळी साडेपाच-सहापर्यंत नॅशनल पार्क गेटजवळ पोचायचे होते. ‘याला’मध्ये सकाळ आणि दुपार अशा दोन वेळेला सफारीसाठी आत सोडतात. त्यातसुद्धा आलेली सगळी वाहने सोडत नाहीत. ठरावीक आकडा झाला की पुढच्या वाहनांना आत सोडत नाहीत. त्यामुळे आत वाहनांची गर्दी होत नाही आणि त्यामुळे आतील प्राण्यांना त्रास होत नाही..
ठरल्याप्रमाणे सहा वाजता गेटपाशी पोचलो. उगवत्या सूर्याचा तांबडा-शेंदरी रंग आणि त्यात काळ्या ढगांचे आवरण कमी करणारे निळे ढग. त्यात स्वच्छ हवा आणि मातीचा सुगंध.. कमी झोप झाली असली तरी सगळी मरगळ लगेच निघून गेली आणि एकदम ताजेतवाने झालो..
आदल्या दिवशीच पाहिलेले पक्षी सकाळच्या कोवळ्या उन्हात अतिशय सुंदर दिसत होते. सगळ्यांचे कॅमेरे फोटो काढण्यात गुंतले होते. फक्त ‘क्लिक’चेच आवाज येत होते. पार्कमध्ये शिरल्या-शिरल्या ‘हुपो’चे दर्शन झाले, अगदी जवळून. इथे पक्षी मनुष्याला सरावल्यासारखे वाटतात, कारण जीप जवळ आली तरी उडून जात नाहीत ते.
आता खरं म्हणजे आमची नजर शोध घेत होती ती ‘बिबळ्या’चा. जीपचालक सतत मागोवा घेत होते. इतक्यात आमच्या चालकाला फोन आला आणि त्याने त्याला कळलेल्या दिशेने गाडी हाकायला सुरुवात केली. आमची जीप जात असता अचानक एक बिबळ्या शांतपणे जंगलातून बाहेर आला. आम्ही आमच्या चालकाला त्याचा खांदा गच्च धरून ते सांगितले. तो क्षणात थांबला आणि लगेच गाडी मागे घेऊ लागला. तोपर्यंत ‘स्वारी’ आमच्या गाडीच्या मागून रस्ता क्रॉस करून पलीकडे जंगलात गेली होती. आम्ही गाडीत बसून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतो. तो क्षण आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला कायमचा मनावर कोरला गेलाय.. कसला ‘रुबाबदार’ प्राणी आहे हा..!!
‘बिबळ्या’ हा ‘कॅट फॅमिली’मधील सगळ्यात ‘धूर्त आणि कनिग’ मानला जातो. तो जितक्या चपळाईने जमिनीवर वावरतो तितक्याच चपळाईने झाडावरही चढतो. त्यामुळे तो आपली शिकार कुठेही जाऊन करू शकतो. असो.. आम्हाला बिबळ्या दिसला त्यातच समाधान होते.
रस्ता क्रॉस करून बिबळ्या एका झाडावर जाऊन बसला. एकीकडे आमचा चालक त्याच्या इतर मित्रांना ही गोष्ट कळवत होता आणि आम्ही त्याचे फोटो काढायचा प्रयत्न करत होतो. तो जिथे बसला होता तिथे खूप झाडे असल्याने अंधारलेलं होतं. गर्द झाडाच्या फांदीवर हे महाशय पहुडले होते. त्याचे आजूबाजूला काय चालले आहे त्याकडे बिलकूल लक्ष नव्हते. एव्हाना सर्व बाजूंनी इतर जीप्सही या ठिकाणी यायला सुरुवात झाली होती. जीपचे इतके आवाज ऐकूनसुद्धा तो आपल्या जागेवर किंचितही हलत नव्हता. जमलेले सर्व लोक त्याचे जमतील तसे फोटो काढायचा प्रयत्न करत होते. एव्हाना बिबळ्या बसला होता त्या ठिकाणी लोकांची खूप गर्दी झाली होती. त्यामुळे आम्ही जरा बाजूला जाऊन थांबलो. जीपचालकाच्या म्हणण्यानुसार लोकांची गर्दी कमी झाली, की तो झाडावरून उतरेल. तेव्हा अजून चांगले फोटो काढता येतील. आम्ही तिथे बराच वेळ थांबलो. लोकांची गर्दी कमी व्हायची चिन्हे दिसत नव्हती. शेवटी आम्ही तिथून इतर काही दिसते का ते बघायला निघालो. ‘याला’मध्ये यायचा एक हेतू पूर्ण झाला होता.
द्विजेंद्र काणे
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2015 रोजी प्रकाशित
पर्यटन विशेष : ‘याला’मध्ये फेरफटका
सतरा डिसेंबर २०१२ च्या रात्री ‘श्रीलंकन’ एअरवेजने मुंबईहून कोलंबोकडे प्रस्थान केले. विमानतळावरूनच ‘याला’ला जायचं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-02-2015 at 01:09 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel special