फेस्टिव्हल्स ऑफ इंडिया
ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीमध्ये केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम्मध्ये मल्याळी समाजातील परंपरांचे दर्शन घडते.

केरळचा पाऊस, तिथल्या हाउस बोटस्, समुद्रकिनारा अशा निसर्गरम्य ठिकाणी जायला पर्यटकांची नेहमीच झुंबड उडालेली असते. केरळ हे रिफ्रेश होण्यासाठीचे उत्तम ठिकाण आहे असेही म्हटले जाते. पण, आणखी ताजंतवानं होण्यासाठी केरळ गाठायचा असेल तर तो ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गाठा असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारणच तसे असते. तिथला ओणम् हा सण. ओणम् हा तिथला महत्त्वाचा आणि आकर्षक सण. महत्त्वाचा यासाठी की या सणापासून तिथल्या नवीन वर्षांची सुरुवात होते आणि आकर्षक यासाठी कारण दहा दिवस चालणाऱ्या या सणात खरेदी, फुलांची रांगोळी, चविष्ट खाद्यपदार्थ, नौकांची स्पर्धा अशा अनेक गोष्टी होत असतात.
केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम् या उत्सवाने सुरू होते. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवातील दहावा दिवस ‘तिउवोणम्’ सगळ्यात धूमधडाक्याने साजरा केला जातो. ओणम् उत्सव मल्याळी भाषेत चिंगम (ऑगस्ट-सप्टेंबर) या महिन्यात येतो. दैत्यराज महाबली या प्रल्हादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा हा उत्सव आहे. या वेळी पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके वगरे कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण केरळ राज्यात केले जाते. या सणादरम्यान नवीन कपडय़ांची खरेदी केली जाते. तसेच खास पारंपरिक पद्धतीचे अनेक खाद्यपदार्थही तयार केले जातात. केरळ राज्यातील सर्वच जाती-धर्माचे लोक हा उत्सव मोठय़ा आनंदात साजरा करतात.
ओणम् या सणाविषयी एक लोककथा सांगितली जाते. महाबली हा दैत्यांचा बलाढय़ राजा होता. त्याच्या पराक्रमामुळे स्वर्गातील देवांनाही परागंदा व्हावे लागले. तो दैत्य असूनही विष्णूचा भक्त होता. स्वर्गातून हद्दपार झालेल्या देवांनी कश्यप ऋषींची पत्नी अदितीकडे महाबलीची तक्रार केली. मग अदितीने विष्णूला त्यात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले, विष्णूने ते मान्यही केले. याच सुमारास महाबलीने एका मोठय़ा मेजवानीचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी येणाऱ्या प्रत्येक अतिथीची मनोकामना पूर्ण केली जाईल असे त्याने जाहीर केले होते. या मेजवानीला विष्णूने ब्राह्मण बटूच्या वामनाच्या रूपात तेथे हजेरी लावली आणि महाबलीकडे तीन पावले जमिनीची मागणी केली. वामनाची विनंती मान्य झाली. त्यानुसार वामनाने आपल्या दोन पावलांत पृथ्वी आणि स्वर्ग पादाक्रांत केला. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी वामनाने महाबलीकडे जागा मागितली. त्यावर महाबलीने तिसरे पाऊल आपल्या मस्तकावर ठेवण्यास वामनाला सांगितले. वामनाने लगेच तिसरे पाऊल महाबलीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात ढकलले. महाबलीची वचननिष्ठा पाहून वामनाने त्यास वर मागण्यास सांगितले. त्यानुसार महाबलीने वर्षांतून एकदा आपल्या राज्यात येऊन प्रजेला भेटण्याचा वर वामनाला मागितला. तेव्हापासून महाबली राजा आपल्या प्रजेला भेटण्यास दरवर्षी येतो असे मानले जाते. महाबली राजाने आपल्या वचनासाठी आपले राज्यच काय पण आपले प्राणही वामनाला देण्यास मागे-पुढे पाहिले नाही. त्याच्या अशा गुणांमुळेच तो लोकप्रिय राजा ठरला, घरोघरी त्याची पूजा होऊ लागली, त्याला देवत्व प्राप्त झाले. ओणम्च्या दिवसात घरोघरी वामनाच्या मूर्तीबरोबरच महाबलीच्या मूर्तीचीही स्थापना केली जाते.
केरळ राज्यातले सण साजरे करण्याची पारंपरिक पद्धती सर्वश्रुत आहेच. ओणम्च्या निमित्ताने केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकली किंवा काडुवकलीचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. ओनसद्या या पक्वान्नाशिवाय ओणम्ची सांगता होत नाही. तसेच तांदळापासून तयार केलेले विविध पदार्थ, डाळीची आमटी, पापड आणि तूप असा जेवणाचा बेत असतो. सांबार, (ओलण), रसम, थोरन, अवियल, पचडी, विविध प्रकारची लोणची आणि मोरू (ताक) यांनाही ओणम्मध्ये महत्त्व आहे. गोडधोडाच्या जेवणासोबतच जेवणात किमान सात वेगवेगळ्या भाज्या करणं आवश्यक असतं.
या उत्सवात नौका स्पर्धाही आयोजित केल्या जातात. ओणम्च्या वेळी पारंपरिक सर्पनौका स्पर्धाचे आयोजन दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी केले जाते. एका नौकेत शंभराहून अधिक लोक असतात. त्यामुळे त्या मोठय़ा असणे खूप गरजेचे असते. फणसाचं लाकूड हे खूप लांब आणि निमुळते असल्यामुळे स्पर्धेसाठी या लाकडाचा वापर केला जातो. त्यात नौका वल्हविणाऱ्यांसह त्यांना मोठय़ा आवाजात साद घालून उत्साह वाढविणारेही अनेकजण असतात. हा सण बघणाऱ्या नवख्या लोकांना या स्पर्धेचे अप्रूप वाटते. एकाच दिशेने, एकाच वेगाने आणि एकाच आवाजात साद घालत जाणारी ही स्पर्धा जितकी चुरशीची असते तितकीच ती अतिशय देखणी असते. कोणती होडी पुढे, कोणती मागे, त्यांना साद घालणाऱ्यांचा मोठा आवाज यामुळे या स्पर्धेची चुरस अधिकाधिक वाढत जाते.
फुलांच्या रांगोळीला या सणात महत्त्व असते. दहा दिवसांच्या या सणामध्ये दहाही दिवस वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची सजावट केली जाते. वैशिष्टय़ म्हणजे, पहिल्या दिवशी एका रंगाच्या फुलांची रांगोळी केली जाते. दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशीच्या रंगाच्या फुलासोबत आणखी एका रंगाच्या फुलाचा समावेश करून रांगोळी काढली जाते. मग तिसऱ्या दिवशी आधीचे दोन आणि तिसऱ्या दिवशीचा एक रंग अशा तीन रंगांच्या फुलांची रांगोळी काढली जाते. असे एकेक रंग वाढवत शेवटच्या दिवशी एकूण दहा रंगांच्या वेगवेगळ्या फुलांची भव्य रांगोळी काढली जाते.
खाद्यपदार्थामधील वैविध्य, भव्य रांगोळ्या, होडय़ांची देखणी स्पर्धा, पारंपरिक नृत्याविष्कार यासह केरळमधे नवीन वर्षांचं स्वागत धूमधडाक्यात होत असते. रूढी-परंपरा जपत आजही ओणम् हा सण आनंदाने आणि मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. भारतभर विखुरलेल्या मल्याळी लोकांच्या दृष्टीने हा सण आपल्या दिवाळीसारखाच महत्त्वाचा असतो. केरळला जाणे शक्य नसले तर ते जिथे असतील तिथे हा ओणम् साजरा करतात. पण इतरांसाठी केरळमध्ये जाऊन ओणम् साजरा करण्यात काही वेगळीच मजा आहे.