दहा हजार वर्षांपूर्वी काढलेली, आजही जशीच्या तशी असलेली, भीमबेटकाच्या गुंफांमधली चित्रं म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवून दिलेला समृद्ध वारसा आहे.

मानवाच्या अभिव्यक्तीचे पहिले साधन कोणते असा विचार करायला गेल्यास स्वाभाविकपणे उत्तर येते ते म्हणजे चित्रे. अंक, लिपी, भाषा यांचा उगम विकास आणि सामान्यीकरण (प्रमाणीकरण) होण्याआधीपासूनच आपल्या भावना, विचार माणसाने चित्ररूपाने संकलित केले. यामध्ये कधी प्राणी होते, कधी निसर्ग, कधी संघर्ष तर कधी सण-उत्सव.. कधी राजे-रजवाडय़ांच्या पालख्या आणि कधी देव-दानवही.. माणसाच्या जाणिवा जसजशा समृद्ध होत गेल्या तसतशा त्याच्या अभिव्यक्तीतही त्या उतरत गेल्या. हजारो वर्षांपूर्वीच्या गुहा, लेणी आणि स्मारके यांच्यावर तत्कालीन माणसाच्या अभिव्यक्तींचे ठसे कायम राहिलेले आजही पाहावयास मिळतात.
मध्य प्रदेशातील भोपाळपासून दक्षिण दिशेला सुमारे ४० किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर आपल्याला अशी भित्तिचित्रे पाहायला मिळतात. ऐतिहासिकदृष्टय़ा या चित्रांना अपरंपार महत्त्व आहेच, पण इतिहासाची दृष्टी नसलेल्या कोणत्याही सामान्य माणसासाठीसुद्धा ही चित्रे अतिशय आकर्षक आणि मोहमयी वाटतात. भीमबेटका येथील गुहांमध्ये ही भित्तिचित्रे आहेत.
नावाची आख्यायिका
महाभारत कालखंडात पांडव १२ वर्षांच्या वनवासात असताना मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणी वास्तव्यास होते असे सांगितले जाते. अशाच एका वास्तव्यकालात पांडवांनी येथेही मुक्काम केला होता. येथील एका देवीच्या मंदिरात महाकाय भीम ध्यानासाठी आणि आराधनेसाठी बसत असे. तेथे भीमाचे आसन, प्राचीन भाषेत बठक आहे. आणि अशी भीमाची बठक म्हणजेच भीमबठिका, अशी या नावाची आख्यायिका सांगितली जाते. मूळ भित्तिचित्रे असलेल्या गुहांपासून साधारण अर्धा किलोमीटर अंतर चालून गेल्यावर ही बठक आपल्याला पाहावयासही मिळते.
भीमबेटकाचा शोध
१८८८ पासूनच भारतीय पुरातत्त्व विभागात या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. मात्र त्यावेळी स्थानिक आदिवासी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक बौद्ध तीर्थक्षेत्र असल्याचा उल्लेख केला गेला. (प्रत्यक्षात तिथे काय खजिना दडला आहे, याचा शोध १९५७ मध्ये ज्येष्ठ भारतीय पुरातत्त्व संशोधक विष्णू श्रीधर वाकणकर यांनी या गुहांचा शोध घेतला.) वाकणकर हे ट्रेनने भोपाळला जात होते. त्यावेळी त्यांना अत्यंत उंच आणि चित्रविचित्र आकार असलेल्या दगडी रचना दिसल्या. ट्रेनमधून प्रवासास निघालेल्या वाकणकरांना त्या रचनांचे फ्रान्स आणि स्पेनमध्ये पाहिलेल्या दगडी रचनांशी साधम्र्य आढळले. कुतूहल चाळविलेल्या वाकणकरांनी दगडी रचनांचा माग घ्यायचे ठरविले आणि त्यांना अतिप्राचीन अश्मयुगीन संस्कृतीचा खजिनाच हाती लागला.

वीकएन्ड ट्रॅव्हलर्ससाठी मध्य प्रदेश टुरिझमच्या नव्या सहली
शनिवार-रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत तीन-चार दिवसांची भटकंती करणाऱ्या पुण्यातील पर्यटकांसाठी मध्य प्रदेश टुरिझम डेव्हलपमेंट कॉपरेरेशनने खास सहली आणि पॅकेजेस जाहीर केली आहेत. त्याची घोषणा करण्यासाठी पुण्यात नुकतेच प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वीकएन्ड पॅकेजमध्ये रोमँटिक मांडू, ज्योतिर्लिग टूर आणि जंगल बुक ट्रेल अशा दोन रात्री आणि तीन दिवसांच्या सहलींचा समावेश आहे. या सहली आखताना नागपूर आणि इंदूर ही दोन शहरे केंद्रबिंदू ठरवण्यात आली आहेत. 
मध्य प्रदेश टुरिझमच्या सरव्यवस्थापक वीणा रामण या संदर्भात म्हणाल्या की, तीन दिवसांची आटोपशीर सफर ज्यांना आवडते त्यांच्यासाठी आम्ही गरजेनुरूप छोटय़ा सहली आखल्या आहेत. पुण्यातील बहुतेक पर्यटकांना त्यांच्या आवडत्या गिरिस्थानांना पुन:पुन्हा जाणे आवडते. असे पर्यटक गुरुवारी रात्री बस किंवा विमानाने मध्य प्रदेशात पोहोचू शकतील आणि तीन दिवसांची सहल पूर्ण करून सोमवारी कामावर हजर राहू शकतील. 
त्यांनी असेही सांगितले की, मोसमी पाऊस सुरू झाल्याने आम्ही पंचमढी आणि भेडाघाट सहलींसाठी खास योजना जाहीर केल्या आहेत. निश्चित प्रस्थान तारखा असलेली ५ रात्री- ६ दिवस मुदतीची किप्लिंग कंट्री ही सहल १ नोव्हेंबर २०१४ आणि ६ डिसेंबर २०१४ रोजी निघणार आहे, तर चार रात्री-पाच दिवस मुदतीची मॅजिकल मांडू ही सहल ८ नोव्हेंबर २०१४ आणि ६ डिसेंबर २०१४ रोजी निघणार आहे. या सहलींमध्ये प्रेक्षणीय मंदिरे पाहणे, वन्यजीवनाचा अनुभव घेणे, केबल कारमधून सफर, नदीकाठांवरील मुशाफिरी, गिरिभ्रमण, इंदूरच्या खाऊगल्लीतील चविष्ट खाद्ययात्रा यांचा समावेश आहे. या सहलींचा पर्यटकांनी आवर्जून विचार करावा.

भीमबेटका येथे आहे तरी काय?
लाखो वर्षांपूर्वी पाण्यामुळे निर्माण झालेल्या सुमारे २४३ गुहा या परिसरात आहेत. या गुहांमध्ये मानवाने वस्ती केली होती किंवा किमान निवारा म्हणून तरी तो या गुहांचा वापर करीत होता, याचे भक्कम पुरावे येथे सापडतात. अत्यंत शांत, (ज्याला भयाण शांतता असे आपण म्हणतो) ती येथे अनुभवावयास मिळते.
येथे माणसाच्या सहजत्स्फूर्त प्रतिसादापासून ते सर्वोत्तम अभिव्यक्तींपर्यंत बऱ्याच गोष्टी येथे दिसतात. सुमारे १५ ठिकाणी येथे भित्तिचित्रे आहेत. इसवी सन पूर्व आठ हजार ते इसवी सन पूर्व १५०० अशा कालावधीत ही भित्तीचित्रे रेखाटली गेली आहेत. साधी चित्रंच तर आहेत िभतींवरची. त्यात एवढं कौतुक ते काय असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो. .. विशेषत: घरात इतिहासप्रेमी व्यक्ती संख्येने कमी असल्या की हमखास हा प्रश्न विचारला जातो. पण त्याचे उत्तर जाणीवपूर्वक भारतीय पुरातत्त्व खात्याने देऊन ठेवले आहे.
चित्रे मग ती कागदावरची असोत किंवा िभतींवरची त्यांची काही आयुर्मर्यादा असते. साध्या गेरूसारख्या रंगांनी काढलेली किंवा पांढऱ्या रंगात काढलेली चित्रे तब्बल दहा हजार वष्रे (इसवी सन पूर्व आठ हजार आणि आताची २०१४ मिळून एकूण १० हजार वष्रे) टिकून राहू शकणे हे आश्चर्यकारक नाही का? किंबहुना हेच दाखविण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाने एक गंमत केलेली आहे, असं किमान तेथील मार्गदर्शक (गाईड) सांगतात. गंमत अशी की त्या भित्तिचित्रांचे क्रमांक, सांकेतिक क्रमांक हे ऑईल पेंटने लिहिलेले आहेत. थंडी, ऊन, वारा, पाऊस या नसíगक आक्रमणांचा मारा पचवताना हे क्रमांक काही वर्षांमध्ये धूसर होतात.. पण तंत्रज्ञान फारसे प्रगत नसताना किंवा अगदी अप्रगत असतानाही १० हजार वर्षांपूर्वी काढलेली ती चित्रे मात्र आपल्या पुढे सहज मोठय़ा दिमाखात आणि बऱ्यापकी ठळकपणे उभी राहिलेली दिसतात, म्हणून ती चित्रे पाहिलीच पाहिजेत. भारतीय म्हणून आणि माणूस म्हणूनही आपल्याला किती समृद्ध वारसा लाभला आहे, हे कळावे म्हणून ती चित्रे पाहावयास हवीत.
ही चित्रे आहेत तरी कसली?
दुसऱ्या क्रमांकाच्या गुहेत एका लहान मुलाच्या हाताचा पंजा उमटवलेला आहे. साधारण लव्हेंडर (पारवा) रंगाचा हा पंजाचा ठसा आकर्षक आहेच, पण त्याच्या बाजूलाच काही प्राण्यांची अगदी लहान मुलाने काढलेली वाटावीत इतकी साधी चित्रे आहेत. तिथून थोडंसं पुढे गेलं चालत, की एक मोठा खड्डा नजरेत भरतो. उत्खननाची प्रक्रिया कशी चालते हे स्पष्ट करणारा तो खड्डा आहे. तेथे हजारो वर्षांपूर्वी पुरलेला एका मृतदेहाचा सांगाडा आणि त्याबरोबरीने काही साहित्य आढळले होते. माणसाच्या मृत्यूनंतरच्या काल्पनिक आयुष्यात त्याला असलेल्या सर्व गरजांची पूर्तता व्हावी या हेतूने माणसानेच मृतदेह पुरताना केलेल्या सोयी तेथे उलगडून दाखविण्यात आल्या आहेत.
तसेच साधारण ८ मीटर उत्खननात तब्बल पाच विभिन्न संस्कृतींचे अवशेष कसे सापडले याचे सप्रमाण विवेचन तिसऱ्या क्रमांकाच्या गुहेत करण्यात आले आहे.
जसजसे आपण पुढे-पुढे सरकू लागतो तसतसे आपल्या मनांत प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते. ही चित्रं माणसाने कशी काढली असतील, त्यात रंग कसे भरले असतील, ती इतकी सहस्रकं टिकावीत असं त्यावेळी माणसाला वाटलं असेल का, तेव्हा अभिव्यक्ती इतकी सोपी कशी काय होती, त्यावेळच्या चित्रकारांची निरीक्षणशक्ती इतकी सूक्ष्म आणि तीव्र कशी काय, असे सगळे प्रश्न आपल्याला पडू लागतात. मध्य प्रदेश सरकारचे प्रशिक्षित मार्गदर्शक आपल्या प्रश्नांना प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने उत्तरं देत जातात.
पुढील गुहांमध्ये प्रकाशाची केवळ छोटीशी तिरीप येताना आपल्याला पाहावयास मिळते. अशा ठिकाणी माणसाने विरुद्ध बाजूनं प्राण्यांची चित्रे काढली आहेत. हत्ती, रानगवा, गुरं अशी जनावरं कधी एकमेकांशी झुंजताना, तर कधी एकमेकांसह संचार करताना माणसाने चितारले आहे.
सात, अकरा आणि १४ व्या क्रमांकाच्या गुहांमध्ये विलक्षण चमत्कृती पाहावयास मिळते. एकावर एक असे तीन वेगवेगळ्या काळातील चित्रांचे थर आपल्याला स्पष्ट पाहावयास मिळतात. हे अलौकिक आहे.
म्हणजे सुमारे १० हजार वर्षांपूर्वी काढलेली चित्रे पांढऱ्या रंगात, त्या चित्रांवरच ती पुसली जाणार नाहीत अशा बेताने सुमारे सात हजार वर्षांपूर्वी काढलेली गेरूच्या रंगातील मानवी सणांची- सण साजरे करतानाची चित्रे आणि त्या चित्रांच्यावर सुमारे चार ते साडेचार हजार वर्षांपूर्वी काढलेली पुन्हा एकदा पांढऱ्या रंगातील देवदेवतांची चित्रे पाहायला मिळतात.

येथे कसे जायचे?
मुंबईहून भोपाळला जाण्यासाठी अनेक रेल्वेगाडय़ा उपलब्ध आहेत. किंवा दिवसातून दोनदा विमान फेऱ्याही आहेत. जुन्या भोपाळहून (नवे भोपाळ म्हणजेच भोपाळ हबीबगंज) भीमबेटका अधिक जवळ आहे. राज्य पर्यटन विभागातर्फे काही बसेस तसेच विशेष गाडय़ाही माफक दरात आपल्याला येथे नेतात. मात्र राज्य पर्यटन विभागातर्फेच इंडिका किंवा इनोव्हा अशी सदस्यसंख्येच्या अनुषंगाने गाडय़ांची निवड करून ९ ते १३ रुपये प्रतिकिलोमीटर दराने आपल्याला अधिकृत बिलासह ही सहल करता येते. येथील सर्व चित्रे पाहणे, त्यांची पाश्र्वभूमी समजावून घेणे आणि काही माफक छायाचित्रे काढणे यासाठी किमान तीन ते चार तास लागतात. येथे कुठेही चित्रे काढण्यास मनाई नाही.

एका कलाकाराची मूळ कलाकृती न मारता त्यावर स्वतंत्र शैलीत आपली कलाकृती रेखाटणे आणि निसर्गाच्या सर्व आव्हानांवर मात करीत हजारो वष्रे ती कलाकृती जशीच्या तशी पाहायला मिळणे हे आपले भाग्यच म्हणावेसे वाटते.
या चित्रांमध्ये शंकराचे त्रिशूळधारी चित्र आहे, देवीचे – अंबेचे शस्त्र धारण केलेले चित्र आहे. मानवी सोहळ्याची चित्रे आहेत. शिकारीची चित्रे आहेत. एकिशगी गेंडा आणि रानगवे यांची चित्रे आहेत. हत्ती, घोडे, पायदळ यांच्यासह फेरफटका मारणाऱ्या राजाची चित्रे आहेत. नाचणाऱ्या समूहाची चित्रे आहेत. महिलांची चित्रे आहेत, पुरुषांची, लहान मुलांची चित्रे आहेत आणि प्रत्येक चित्रं आपल्याशी सहज संवाद साधणारं आहे. कोणतीही विशेष पाश्र्वभूमी नसलेली व्यक्ती सहजपणे त्या चित्रांचा आनंद घेऊ शकते. म्हणून ही चित्रे पाहायला जाणं गरजेचं आहे.
लाखो वर्षांपूर्वी पाण्यामुळे या गुहा निर्माण झाल्याचे येथील मार्गदर्शक सांगतात. त्यासाठी आवश्यक ते रचनात्मक पुरावेही ते आपल्याला दाखवतात. दगडाला आलेले आकार आणि कातीव कडे यावरून ते सहज कळू शकतं. सुमारे एक लाख वर्षांपूर्वी दगडावर उमटलेले तीन ठसेही येथे जपून ठेवले गेले आहेत. प्रत्येक गुहेचे, चित्राचे आणि तेथील कालावधीचे तपशील िहदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये स्पष्ट आणि वाचता येतील, अशा बेताने देण्यात आले आहेत. अधिक माहिती हवी असल्यास येथे गाईडही उपलब्ध आहेत. तीनशे रुपयांत ते उत्तम माहिती देतात. त्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्र असल्याने त्यांना ओळखणे सोपे जाते.
येथे जाताना शक्यतो उन्हाचा मौसम टाळावा. कारण भोपाळमध्ये प्रचंड कडक उन्हाळा असतो. साधारणत हिवाळा म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत जाणे अधिक श्रेयस्कर ठरू शकेल. आíथक गणितांची जुळवाजुळव करायची झाल्यास मध्य प्रदेश राज्य पर्यटन विभागाचे कार्यालय मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आहे. तेथे अप्रतिम नियोजन आणि माहिती दिली जाते. साधारण तिघा जणांच्या कुटुंबासाठी भोपाळ जाणे-येणे आणि तीन दिवसांचा निवास धरता (रेल्वेच्या थ्री टीयर एसी प्रवासासह) १५ ते १६ हजारांपर्यंत खर्च येतो.
भोजपूर
भोपाळ शहराचे मूळ नांव भोजपाल असे होते, असे काही इतिहासकार सांगतात. राजा भोज या शिवभक्त राजाने हे शहर वसविले. भीमबेटका येथून भोपाळकडे येताना अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर भोजपूर नावाचे गाव आहे. तेथील शिवमंदिर पाहाण्याजोगे आहे. येथील दंतकथेप्रमाणे हे शिवमंदिर आजही अपूर्णावस्थेत असून राजा भोज याच्या आज्ञेनुसार ते अवघ्या एका रात्रीत बांधणे अपेक्षित होते. एका रात्रीत जेवढे बांधून झाले तेव्हढेच ते कायम राखण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शिवमंदिरात सुमारे दीडशे फूट उंचीचे आणि सव्वा दोन मीटर व्यासाचे शिविलग आहे. परिसरात अन्य ऐतिहासिक ठेव्याचे अनेक दाखले विखुरलेल्या अवस्थेत आढळतात. येथे दर्शन घेणे हा सुखद अनुभव ठरावा. फक्त येथे जाताना काळजी घ्यायची ती प्लास्टीकच्या पिशव्या न नेण्याची. कारण परिसरात माकडे फार असून आपल्याकडील प्लास्टीकच्या पिशव्या त्यात खाद्यपदार्थ असतील या आशेने ते हल्ले करतात. तेव्हा ही काळजी अत्यावश्यक आहे. अत्यंत निसर्गरम्य अशा वातावरणात आपल्याला शिवदर्शन घेता येते.