सध्याचा काळ हा अभयारण्य निर्मितीचा काळ आहे. गावाजवळच्या राखीव जंगलांना अभयारण्याचा दर्जा दिला जातो आहे तर असलेल्या अभयारण्याची हद्द वाढवून त्यांना व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला जातो आहे. जंगलांची व्याप्ती वाढवून तेथील जैवविविधता टिकविण्याचा प्रयत्न स्तुत्य असला तरी ज्या प्रकारे अभयारण्याचे नियोजन केले जात आहे ते पाहून वन्य प्राण्यांना अभय देण्यापेक्षा त्यांचे प्रदर्शन मांडून जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीच या अभयारण्याची आणि व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली गेली असावी असे वाटते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील दशकात ज्याप्रमाणे बिल्डर लॉबी सामान्य माणसाची स्वत:च्या घराचा सोस जाणून सक्रिय झाली आणि थोडय़ाच काळात राजकारणापासून समाजकारणापर्यंत त्यांचा प्रभाव जाणवू लागला त्याचप्रमाणे याच काळात सामान्य माणसांचा ओढा पर्यटनाकडे वाढला. मध्यमवर्गीय कुटुंबेही सुटीच्या काळात पर्यटनासाठी बाहेर पडू लागली. याचा पुरेपूर फायदा पर्यटन उद्य्ोगाने उचलला. बिल्डर लॉबीप्रमाणेच पर्यटन उद्योगानेही स्वत:च्या मर्जीप्रमाणे त्यांना फायद्याचे होईल असे कायदे करवून घेतले. अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पांचे नियोजन पर्यटन उद्योगातील मातब्बर व्यक्तींच्या मर्जीप्रमाणे बदलले.

जंगलातला वाघ हा सर्वात महत्त्वाचा प्राणी. जंगलातील वाघांच्या अस्तित्वामुळे त्या जंगलातील एकूण जैवविविधतेचा अंदाज करता येतो. पण हा प्राणी मुळातच अत्यंत लाजाळू आहे. सहसा वाघ माणसांच्या समोर येत नाही. माणसाला टाळतो. जी नवीन अभयारण्ये नुकतीच तयार झाली तेथील वाघांच्या बाबतीत हा अनुभव येतो. हे वाघ सहसा समोर येत नाहीत. वाहनांचा आवाज ऐकताच पळतात. पण पर्यटकांसाठी त्यांना जंगलाच्या रस्त्यांच्या कडेला आणणे आवश्यक होते म्हणून रस्त्यालगतच पाण्याचे टाके बांधले गेले. उन्हाळ्यात प्रत्येक वन्य प्राण्याला पाण्याची आवश्यकता असते. वाघ तर सायबेरियासारख्या प्रदेशातून भारतात आल्यामुळे त्यांना पाणी अत्यंत प्रिय आहे. म्हणून ते बहुतेक वेळा पाण्याच्या टाक्यात बसलेले दिसतात. अशा रीतीने पर्यटकांना वाघ जवळून बघण्याची सोय केली गेली. पण या उपद्व्यापामुळे वाघांचा नैसर्गिक स्वभाव आपण बदलतो आहोत याकडे वन विभागाचे लक्ष नाही. अनेक अभयारण्यात, व्याघ्र प्रकल्पात वाघ पर्यटकांच्या वाहनाभोवती आरामात वावरत असतात.

हमखास वाघ दाखविणे यासाठी जे जे होईल ते ते पर्यटन व्यवसायिकाकडून केले जाते.

वाघ हा एकलकोंडा प्राणी आहे. मादीला पिल्ले झाल्यावर ती मोठी होईपर्यंत ती इतर वाघांपासूनही त्यांचे संरक्षण करते. पण आता व्याघ्र प्रकल्पात मादी वाघांच्या पिल्लांसोबत मादीबरोबर नर वाघही दिसू लागला आहे. हे वाघांच्या नैसर्गिक स्वभावाच्या विरुद्ध आहे.

अभयारण्यात, व्याघ्र प्रकल्पात पॉलिथिन फेकणे हा गुन्हा आहे. परंतु उन्हाळ्यात वन्य प्राण्यां साठी पाण्याची सोय व्हावी यासाठी तेथे जाड पॉलिथिन शीट टाकून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली गेली. टँकरने तेथे पाणी टाकले जाते. परंतु गवा, सांबर यांसारखे प्राणी उथळ टाक्यात उतरून पाणी पितात. त्यांच्या खुरांनी पॉलिथिन फाटते व पसरते.

आता तर अनेक अभयारण्यांत, व्याघ्र प्रकल्पात बोअर वेल खोदून त्यावर सोलर पंप लावले आहेत. वास्तविक बोअर वेल खोदणे हे पर्यावरण तत्त्वाच्या विरुद्ध आहे. कारण यात पृथ्वीच्या आतील तळ पाणी वर काढले जाते. खरे तर जास्तीत जास्त पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे हे अभयारण्याचे कार्य आहे.

अभयारण्यांची निर्मिती ही वन्य प्राण्यांना वास्तव्यासाठी आदर्श वातावरणनिर्मिती करून देणे ही आहे. त्यासाठी अभयारण्यात, व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांचा कमीत कमी वावर असणे आणि वन्य प्राण्यांना आवश्यक नैसर्गिक जंगल व्यवस्था कायम ठेवणे आवश्यक आहे.

(लेखक भंडारा येथे मानद वन्यजीव रक्षक आहेत.)

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vachak lekhak