यापुढेही असेच संग्राह्य अंक प्रसिद्ध होतील ही अपेक्षा व त्यासाठी आपल्या टिमला हार्दिक शुभेच्छा.
– निळकंठ नामजोशी, पालघर.
प्रसाद लाड यांचा ‘अनाकलनीय विकेट’ हा लेख क्रिकेट बोर्डाच्या सद्य:परिस्थितीवर बरंच काही सांगून गेला. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड, मग अध्यक्ष कुणीही असो, दालमिया, पवार, श्रीनिवासन अथवा शशांक मनोहर, सारे जण हलक्या कानाचे, सभोवताली चमचे घुटमळत असतात. पैशाच्या जोरावर आपण काही करू शकतो, आपले कुणी काहीही बिघडवू शकत नाही, असा अतिआत्मविश्वास. जरा कुणी कुणाविरुद्ध कान फुंकले की पुढचामागचा विचार न करता तेथल्या तेथे सोक्षमोक्ष केला जातो. मला आश्चर्य वाटले ते सहयोगी समालोचक व्यक्तींचे, एकानेही क्रिकेट बोर्डाविरुद्ध आवाज उठवला नाही. पण जेव्हा सुप्रीम कोर्टाने आयपीएलला महाराष्ट्राबाहेरचा रस्ता दाखवला, त्या वेळी सर्व जण वृतपत्रांत बोर्डाच्या बाजूने उभे राहिले. त्यांना साधे एवढेसुद्धा भान राहिले नाही की आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान करीत आहोत. साऱ्या क्रिकेटपटूंना मिंधे करून ठेवले आहे. सारा पैशाचा खेळ आहे. नुकतीच बातमी वाचली, पुढची आयपीएल परदेशी खेळवण्याचा घाट घातला जातो. सरकारने एकच करावे, जेणेकरून बोर्डाची आर्थिक नाकेबंदी होईल. भारतीय जाहिरादारांना, जाहिराती देण्यास मज्जाव करावा. जाऊ दे खुशाल परदेशी.
– प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे, वेसावे, मुबंई.
‘लोकप्रभा’च्या १५ एप्रिल २०१६च्या अंकात श्री. संजय सावरकर यांचा ‘नास्तिकांचं जग’ हा लेख वाचला. मी एक ७६ वर्षांचा सर्जन आहे. त्यांच्या लेखाशी मी पूर्णतया सहमत आहे. मीदेखील नास्तिकच आहे. पण त्यांनी केलेल्या नास्तिकाच्या व्याख्येपर्यंत (जगाची निर्मिती आणि नियंत्रण कुणी सर्वशक्तिमान, अलौकिक शक्ती करते हे नाकारणारा तो नास्तिक) जाण्यास मला जवळजवळ ५० वर्षांचा अभ्यास करावा लागला. जरी गेल्या अर्धशतकापासून मूर्तिपूजा, देवपूजा मी करत नसलो तरी, या जगाचा निर्माता, ती चित्शक्ती कोण आहे, आत्मा-पुनर्जन्म आहेत किंवा नाहीत, या सर्वाचा उलगडा मला माझ्या अथक केलेल्या अभ्यासानंतर झाला आहे आणि तो मी ‘माझी आध्यात्मिक वाटचाल – गुढाकडून वास्तवाकडे’ या माझ्या पुस्तकात दिला आहे. लेखक म्हणतात त्याप्रमाणे कोणीही कोणाच्या सांगण्यावरून नास्तिक होत नसतो. तो स्वत:च घडत असतो. दुसरे म्हणजे ‘नास्तिक म्हणजे दुराचारी’ हेही अत्यंत चुकीचे निदान आहे. शरद बेडेकर यांनी लोकसत्तामधील मानव- विजय या सदरात ‘नास्तिक म्हणजे दुर्जन’ हा गैरसमज पूर्णपणे खोडून काढला आहे. त्यांच्या या लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात सदाचारी, चांगला नास्तिक म्हणून माझे उदाहरण दिले आहे. गेली ५० वर्षे मी दोंेडाईचा (जि. धुळे) या गावात सचोटीने वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. माझा स्त्रीरोग चिकित्सक मुलगा – जो नास्तिक आहे, अत्यंत सचोटीने व्यवसाय करीत आहे.
– डॉ. रवींद्रनाथ टोणगांवकर, दोंडाईचा, जि. धुळे.
एक एप्रिलच्या अंकामधील इतके सगळे आले कोठून?, पण बोलणार कोण हे लेख वाचले. पूर्ण देशाला हादरून सोडणारा संपत्तीचा बाहुबली, दहा तोंडाने भ्रष्टाचार करून देशाची करोडोंची संपत्ती स्वाहा करून आता प्रकृतीच्या नावाखाली इस्पितळात दाखल झाल्याचे सर्वानी पाहिले आहे. हा संपत्तीचा कुंभ एका रात्रीत तर भरला नाही, तेव्हा शासनव्यवस्था, कायदेनियम आयकर विभाग काय करीत होते. देशाचे उदरभरण करणाऱ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. नोकरदार मंडळी, कारखानदार व्यापारी, हॉटेल, दुकानदार, जकात, नोंदणी शुल्क, स्टँप डय़ुटी ह्य सर्व मार्गानी सरकारी तिजोरीत भरणा होत असतो. पण भुजबळ, कृपाशंकर सिंग, मल्ल्या यांसारखे अनेक या संपत्तीवर डल्ला मारून गिळंकृत करतात. यापुढे साक्षी, पुरावे, जामीन, सुटका, मग थातुरमातुर शिक्षा, दंड होऊन सर्व पुन्हा आलबेल होईल. ही सर्व संपत्ती सरकारी तिजोरीत पुन्हा येईल तो सुदिन.
– अनिल पाठक, विरार.