– सुनिता कुलकर्णी

टाळेबंदीच्या काळात लोक घराबाहेर पडण्याचे जेवढे उपाय शोधताना दिसतात, तेवढ्याच कल्पक उपायांनी त्यांनी घरातच रहावे यासाठी प्रशासन प्रयत्न करताना दिसते आहे. त्यात त्यांना मोठी मदत होते आहे ती ड्रोनची. लोकांच्या हालचाली कॅमेऱ्यात टिपून त्यांची दृश्ये ड्रोन पाठवत असल्यामुळे पोलिसांना प्रत्येक ठिकाणी जावं लागत नाही. एका जागेवर थांबून ते त्यांना अपेक्षित असलेल्या परिसरातील हालचाली टिपू शकतात. ड्रोनवर लावलेल्या लाऊडस्पीकरवरून त्या त्या परिसरातील घराबाहेर पडलेल्या लोकांना घरात जाण्याचं आवाहन करू शकतात. कमी मनुष्यबळात जास्तीत जास्त परिसरातील टाळबंदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना ड्रोन तंत्रज्ञानाची मदत होताना दिसते आहे.

घराबाहेर पडून लोक गर्दी करतात का यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलीस ५५ ड्रोन्सची मदत घेत आहेत. साडेचार किलो वजनाचे, पूर्णपणे भारतात तयार केलेले हे ड्रोन दोन किलोमीटर परिसरात २०० मीटर उंचावरून टेहळणी करते. त्यावरचा कॅमेरा ४ किमी परिसर झूम करून बघू शकतो. ते ३० मिनिटं उडू शकते. लॅण्ड झाल्यावर त्याची बॅटरी बदलली जाते. ती बॅटरी चार्जेबल असते. ड्रोन फेडरेशन, आयडिया फोर्ज यात मुंबई, ठाणे, भिवंडी पोलिसांना मदत करत आहेत.

तामिळनाडू पोलीस घराबाहेर पडणाऱ्या लोकांना शोधून त्यांना परत घरात पाठवण्यासाठी ड्रोनचा कसा कल्पक वापर करत आहेत याची चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर फिरताना दिसते आहे. तामिळनाडूमधील कोंगुनाडू मधील तिरूपूर येथे दोन पोलीस आणि ऑपरेटर रस्त्यावर उभे राहून ड्रोन पाठवत आहेत. एका झाडाखाली जमून कॅरम खेळत असलेल्या तरूण मुलांची या ड्रोनला पाहून पळता भुई थोडी होते, गावातील वस्तीमध्ये देखील लोक घोळका करून उभे आहेत आणि ड्रोन येताच ते धावत सुटतात आणि आपापल्या घरी जाऊन लपतात ही दृश्ये अनेकांनी समाजमाध्यमांवर पाहिली असतील.

गुजरात पोलिसांनी जवळपास २०० ड्रोन तैनात केले आहेत. या ड्रोन्सनी टाळेबंदी झुगारून गच्चीमध्ये पकोडा पार्टी करणारे, मैदानांवर व्हॉलीबॉल खेळणारे तरूण पोलिसांना पकडून दिले आहेत. ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांनी आजवर दिवसाला १० ते १२ असं करत आजवर सात हजार लोकांवर कारवाई केली आहे. देशातल्या बहुतेक राज्यांमध्ये पोलिसांना टाळेबंदी राबवण्यासाठी ड्रोनची मदत होते आहे.

अर्थात जगभर सगळीकडेच ड्रोनचं तंत्रज्ञान पोलिसांना टाळेबंदीत साह्यकारी ठरताना दिसत आहे. रवांडामध्ये रेडिओवर मुलाखत द्यायला चालले असं सांगणारी एक महिला चर्चमध्ये गेली होती हे ड्रोनमुळे कळल्यावर तिला अटक करण्यात आली. अन्नपदार्थ पुरवठा करायला चाललो आहे असं सांगणारा माणूस चक्क दारूचा पुरवठा करायला गेला होता हे ड्रोनमुळे कळल्यावर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

टाळेबंदीत उपयोगी पडलेलं हे तंत्रज्ञान भविष्यकाळात फक्त अशा प्रकारच्या टेहळणीसाठीच नाही, तर इतरही अनेक गोष्टींसाठी वापरले जाण्याची पडण्याची शक्यता आहे.