राज्यातील एकमेव नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत भटक्या कुत्र्यांचे नियोजन मात्र सपशेल फसलेले आहे. त्यामुळेच मागील दहा वर्षांत शहरातील एक लाख पाच हजार नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी दंश केला आहे. दिवसाला हजार- दीड हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण होणे आवश्यक असताना केवळ चारशे कुत्र्यांवर ही शस्त्रक्रिया केली जात असल्याने या कुत्र्यांच्या संख्येत दरवर्षी प्रचंड वाढ होत आहे. नवी मुंबईत पालिकेच्या लेखी २९ हजार भटकी कुत्री आहेत. मात्र पाच वर्षांपूर्वी केलेल्या या प्राणिगणनेत कमालीची वाढ झाली असून ही संख्या ५० हजारांच्या घरात गेलेली आहे. ग्रामीण, शहरी आणि झोपडपट्टी अशा तीन भागांत वाढणाऱ्या या शहरातील भटक्या कुत्र्यांवर वेळीच उपाययोजना न केल्यास गंभीर समस्येचे स्वरूप धारण केले जाणार आहे. नवी मुंबईतील भटक्या कुत्र्यांना पालिकेने मोकळे रान ठेवलेले असताना नवीन शहर निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या पनवेल पालिकेतही वेगळे चित्र नाही. या ठिकाणी वीस हजार भटक्या कुत्र्यांची संख्या असून दररोज पन्नास नागरिकांना या कुत्र्यांच्या दहशतीचा सामना करावा लागत आहे. उरण तालुक्यातील भटकी कुत्री आणि त्यांच्यावरील उपाययोजना तर राम भरोसे असून पालिकेने एकाही कुत्र्याचे निर्बीजीकरण केल्याची नोंद नाही. त्यामुळे उरण शहरातही भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. लोकसंख्येने मर्यादित असलेल्या या शहरात पाचशे ते सहाशे भटकी कुत्री असून महिन्याला २५ ते ३० नागरिकांना हे कुत्री दंश करीत आहेत. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्रात कुत्र्यांच्या वाढणाऱ्या संख्येवर अंकुश ठेवण्यासाठी एक सामूहिक कार्यक्रम आखण्याची आवश्यकता आहे.

उदरभरण होणाऱ्या ठिकाणी कुत्र्यांची पैदास मोठय़ा प्रमाणात होते असे आढळून आले आहे. निर्बीजीकरणाची कासवगतीने चालणारी प्रक्रिया यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या मर्यादित न होता ती झपाटय़ाने वाढत आहे. नवी मुंबई पालिकेला या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविणे अतिशय सोपे होते. भौगोलिक रचनेत मुंबईची तुलना होणाऱ्या या शहरात ४६ टक्के मोकळी जागा आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांवर पालिकेने पहिल्यापासून नियंत्रण मिळविले असते तर ही वेळ आली नसती. कोपरी येथे सिडकोने बांधलेल्या एका इमारतीत हे निर्बीजीकरण पूर्वी चालत होते. मात्र ती इमारत जर्जर झाल्यानंतर हे निर्बीजीकरण तुर्भे येथील क्षेपणभूमीच्या एका कोपऱ्यात केले जात आहे. त्या ठिकाणी आता वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. निर्बीजीकरण करणाऱ्या संस्थेतील कार्यकर्त्यांना क्षेपणभूमीवर दरुगधीमुळे विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे येथील निर्बीजीकरण वेग कमी आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर असल्याचे पालिका प्रशासनाला वाटत नसल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. बेलापूर येथे पारसिक हिल किंवा आम्रपाली उड्डाण पुलाच्या खाली नवीन निर्बीजीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार केला जात आहे. मात्र पालिकेत शासन विरुद्ध प्रशासन वाद सुरू झाल्याने त्यालाही मुहूर्त लाभलेला नाही. कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्याचे केंद्र भरवस्तीत नको असे नागरिकांचे म्हणणे आहे. कुत्र्यांची कोल्हेकुई नकोशी वाटत असल्याने त्याला विरोध केला जात आहे. हा प्रकार रात्रीच्या वेळी दुचाकीवरून अथवा पायी प्रवास अनेक चाकरमान्यांना धडकी भरविणारा वाटतो. त्यामुळे खिशाला परवडला नाही तरी रिक्षा प्रवास करावा लागत असतो. भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त असलेल्या या शहरात कुत्रे पाळणाऱ्यांची संख्याही लक्षवेधी आहे. चार हजार पाळीव प्राणी शहरात असल्याने त्यांच्या होणाऱ्या अस्वच्छेतेवर पालिकेने नुकतेच काही र्निबध लावले आहेत. नवी मुंबईतील वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबरच वाढणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे पालिकेला तूर्त कठीण झाले आहे. पनवेल पालिकेची तीन महिन्यांपूर्वी स्थापना झाली आहे. या शहराचा नव्याने विकास आराखडा तयार होणार आहे. त्यात या समस्येवरील उपाययोजनेचा विचार आतापासून करण्याची आवश्यकता आहे. शहरात सध्या वीस ते २५ हजार भटकी कुत्री असून दीड हजार कुत्र्यांवर निर्बीजीकरण केले जात आहे. त्यात ५० ते ६० श्वानदंशाची संख्या आहे. इतकी वर्षे दुर्लक्षित असलेली उपाययोजना करण्यास नगरपालिकेने घेतली आणि निर्बीजीकरण कंत्राटाला शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या आचारसंहितेचा खोडा बसला आहे. यापूर्वी कधीही निर्बीजीकरण करण्यात न आल्याने येथील संख्याही वाढली आहे. त्यामुळे महामुंबई नावाच्या तिसऱ्या मुंबईतही भटक्या कुत्र्यांची संख्या सारखीच आहे.
विकास महाडिक – response.lokprabha@expressindia.com