– जय पाटील
तिला पावसात भिजायला आवडतं आणि मी परभणीचा…
तिला सरळ बोलणारी माणसं आवडतात आणि मी पुण्याचा…
करोना चीनमधून भारतात आला पण तिचा होकार अजून नाही आला…
टाळेबंदीच्या कोऱ्या दिवसांत धमाल रंग भरणाऱ्या सोशल मीडिया ट्रेण्डसमध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे. दोन दिवसांपासून ‘#छोट्याप्रेमकथा’ हा ट्रेण्ड तुफान व्हायरल झाला आहे. उपरोध आणि विरोधाभासाचे मासलेवाईक नमुने त्यात दिसतायत.
तू आधी तुझ्या घरी सांग, मी तयारच आहे! किंवा तुला माझ्यापेक्षा खूप चांगली मुलगी मिळेल किंवा तू खूप चांगला आहेस रे, फक्त तुझं पॅकेज कमी आहे. अशा टिपिकल वाक्यांच्या छोट्या प्रेमकथा पोस्ट करत अनेकांनी ट्रेण्ड फॉलो केला आहे. कोणी ‘उपवन की गोराई?’ असा थेट प्रॅक्टिकल प्रश्न करतंय.
राजकीय छोट्या प्रेमकथांनी तर बहार आणली आहे. त्यात सर्वाधिक लोकप्रिय झाले आहेत अजित पवार. ‘आयुष्याचा फडणवीस करून अजित दादासारखी ती निघून गेली’ अशा शब्दांत कोणी स्वतःच्या प्रेमकथेचं वर्णन केलंय, तर कोणी ‘छोटी प्रेमकथा’ म्हणून अजितदादा आणि फडणवीसांच्या शपथविधीचा फोटो शेअर केला आहे. कोणी एक छोटी पण अत्यंत दुखःद प्रेमकथा सांगत, ‘थोडं ऐकतोस का? माझ्याकडे १०५ आहेत आणि मला तुझ्या ६३ जणांच्या पाठिंब्याची गरज आहे,’ असं म्हटलं आहे. मोदी ट्रम्प यांच्या फोटोसह ‘तू आधी का नाही भेटलास मला?’ असं विचारणारं मिम व्हायरल होतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटोखाली ‘मी सिंगल आहे, आदित्य सिंगल आहे का?’ असा प्रश्न केला आहे.
ट्रेण्ड चांगलाच गाजत असल्यामुळे, तो सुरू करणारा दिग्दर्शक अक्षय इंडिकर याचा इनबॉक्स ओसंडून वाहू लागला आहे. ‘छोट्या प्रेमकथा माझ्या इनबॉक्सला पाठवून काहीच साध्य होणार नाहीये. ती योग्य व्यक्तीच्या इनबॉक्सला गेली तरंच मजा आहे. तशी ती न गेल्यामुळेच आज तुमच्यावर ही वेळ आली आहे, याचा विचार व्हावा,’ असं आवाहन त्याने फेसबुकवर केलं आहे.